मराठी भाषेतील उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांत एक मोलाची भर म्हणजे डॉ. युवराज परदेशी यांचे स्टार्टअप रोडमॅप हे पुस्तक. आजच्या युगात तरुणाई स्टार्टअपच्या दिशेने वळते आहे, पण त्यांच्या वाटचालीसाठी योग्य दिशादर्शकाची कमतरता जाणवते. हीच पोकळी भरून काढण्याचे कार्य हे पुस्तक अत्यंत प्रभावीपणे करते. ज्याचं मन स्टार्टअपची स्वप्नं पाहतंय, पण ज्याला ‘कुठून सुरुवात करावी?’ हा प्रश्न भंडावत आहे. त्याच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक मार्गदर्शक आहे. या पुस्तकाचं सगळ्यात अफलातून वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाविष्ट केलेला एआय चॅटबॉट.
तुम्ही जेव्हा वाचता, तेव्हा तुम्हाला मनात येणारे प्रश्न कुणालाही विचारायला जावं लागत नाही, तर पुस्तकाचा चॅटबॉट तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत एक मार्गदर्शकाची भुमिका निभवतो. ग्रंथ हे आपले गुरू असतात, असं आपण शाळेत शिकतो. पण आजची तरुण पिढी केवळ वाचणाऱ्यात नाही ती संवाद करणारी, प्रश्न विचारणारी, सतत शोध घेणारी पिढी आहे.
या नव्या युगातील नव्या वाचकांसाठी एक अभिनव प्रयोग झाला आहे . स्टार्टअप रोडमॅप हे केवळ मार्गदर्शक पुस्तक नाही, तर ते संवादात्मक अनुभव देणारी एक संकल्पना आहे. या पुस्तकाला जोडलेला एआय चॅटबॉट म्हणजे एक डिजिटल सल्लागार जो वाचकाच्या शंकांना तत्काळ उत्तर देतो.
वाचकाने पुस्तक वाचून झाल्यावर, त्यातील कोणतीही संकल्पना स्पष्ट न झाल्यास जसे की: मार्केट रिसर्च कसा करायचा? बिझनेस मॉडेल म्हणजे काय? MVP म्हणजे काय असतं? फंडिंग कोणाकडून घ्यावं? तर तो या चॅटबॉटला थेट प्रश्न विचारू शकतो, आणि काही क्षणांत उत्तर मिळवू शकतो!
हे वैशिष्ट्य अधिक महत्त्वाचं ठरतं कारण हा भारतातील पहिलेच मराठी पुस्तक आहे ज्यामध्ये एआय चॅटबॉट जोडलेला आहे. त्यासाठी ना कुठले वेगळे ॲप डाऊनलोड करायची गरज, ना कुठले टेक्निकल ज्ञान… केवळ एक क्यूआरकोड स्कॅन करून तुम्ही या चॅटबॉटशी संवाद सुरू करू शकता. मराठीतून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मराठीतच मिळतात, हे या प्रयोगाचे खास वैशिष्ट्य!
हा एआय चॅटबॉट केवळ तांत्रिक माहिती देत नाही, तर तो एक मेंटॉरसारखा वागतो. वाचकाच्या प्रश्नांना समजून घेतो, त्यावर आधारित सुचवलेले उत्तर देतो, आणि गरज असेल तर पुढचे पर्याय देखील देतो. एक विद्यार्थ्याला जर “स्टार्टअपसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? कायदेशीर नोंदणी कशी करावी? स्टार्टअप यशस्वी कसे होते? असे प्रश्न पडत असतील तर हा चॅटबॉट त्याला उत्तरे देवून योग्य मार्गदर्शन देखील करतो. या प्रयोगामुळे वाचन केवळ एकतर्फी राहात नाही. वाचक एक अॅक्टिव्ह लर्नर बनतो. पुस्तकात दिलेली माहिती थेट अॅप्लिकेशनमध्ये कशी वापरायची हे शिकायला मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे, वाचक स्वतःची वाट शोधू लागतो. या संकल्पनेमुळे स्टार्टअप रोडमॅप हे केवळ एक पुस्तक नाही, तर ते तुमचं वैयक्तिक मार्गदर्शक बनतं, जे २४x७ तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तयार आहे. ग्रामीण भागातील एखादा तरुण यामधून स्वतःची दिशा शोधू शकतो, शहरी भागातील स्टार्टअप मनाच्या तरुणाला वैचारिक गती मिळू शकते आणि मराठी भाषेतून हे सर्व शक्य होतं हे विशेष!
या पुस्तकात स्टार्टअप म्हणजे काय, बिझनेस आणि स्टार्टअपमधील मूलभूत फरक, यशस्वी स्टार्टअप उभारण्यासाठी कोणते टप्पे महत्त्वाचे आहेत याची सविस्तर माहिती मिळेल. मार्केट रिसर्चची गरज आणि प्रक्रिया, फंडिंग मिळवण्याचे मार्ग, योग्य को-फाऊंडर कसा शोधावा. यासह इन्क्यूबेटर्स, एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपॅटलिस्ट आदी संकल्पना साध्या आणि सोप्या भाषेत उलगडून दाखविण्यात आल्या आहेत. लेखक डॉ. युवराज परदेशी हे स्वत: एका स्टार्टअपचे को-फाऊंडर असून अनेक स्टार्टअपचे मेंटॉर देखील आहेत. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा पुरेपुर वापर हे पुस्तक लिहितांना केलेला दिसतो.
ज्ञान हे वाचनातच नाही, संवादातही असतं. आणि ‘स्टार्टअप रोडमॅप’ने हे सिद्ध करून दाखवलं आहे. ही केवळ सुरुवात आहे. पुढचं भविष्य, संवादात्मक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साथीने घडणारं आहे. आणि मराठीचं हे पहिले पाऊल त्यातलं एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
स्टार्टअप रोडमॅप हे पुस्तक तुम्ही खालील लिंकवर क्लिककरून विकत घेऊ शकता.
१. दीपस्तंभ प्रकाशन
२. Amazon India
३. Flipkart