Monday, November 25, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘आघात’ नेमका कुणावर?

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘आघात’ नेमका कुणावर?

संदीप जाधव | 9225320946

राज्य नाट्य स्पर्धेत नाटक प्रभावीपणे सादर करावयाचे असेल तर त्यास लेखन संहिताही तितकीच दमदार असायला हवी. मात्र, लेखनातच अनेक त्रुटी असल्याने नाटक पार पाडण्याची अवघड जबाबदारी कलाकारांवर पडते. असेच सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेतील ‘आघात’ या नाट्यात दिसले. नाटकाचा विषय उत्तम होता, पण अनेक प्रसंगांतील अनावश्यक संवादांमुळे नाटक पहिल्या अंकात भलतेच रेंगाळले. मात्र, ती उणीव दुसर्‍या अंकाने भरून काढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

रंगोदय प्रतिष्ठानने सादर केलेल्या व सागर खिस्ती यांनी लिहिलेल्या ‘आघात’ या नाटकाचे दिग्दर्शन ज्योती खिस्ती यांनी केले.

पडदा उघडताच एका हिंदी सिनेमावर मनमुराद नृत्य करणारी तरुणी दिसते. ती आबासाहेब व सावित्रीबाई या दाम्पत्याची मुलगी. साहील हा तिचा मोठा भाऊ. त्या दोघा भावंडांमध्ये खूप प्रेम असते. अशातच एका अपघातात साहील जखमी होतो. त्याचा स्मृतीभ्रंश होतो. तो आई-वडिलांना आणि बहिणीलाही ओळखत नाही. हे पाहून सायलीच्या मानसिकतेवर जबरदस्त ‘आघात’ होतो. साहीलची स्मृती परत यावी यासाठी डॉक्टर अघोरी उपाय सूचवितात. ‘साहीलचा पुन्हा अपघात घडवून आणायचा’ असे ठरते. हा उपाय यशस्वी होतो आणि साहीलची स्मृती पुन्हा येते. असे छोटेसे कथानक असलेले हे कथानक.

तसे पाहिले तर नाटकाचा विषय गंभीर होता. मात्र, ही गंभीरता नाटकात सादर करता आला नाही. मात्र, दुसर्‍या अंकातील वेगवान घडामोडींमुळे नाटकाने जरासा वेग घेतला आणि शेवट प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेला.

आबासाहेब कारखानीस या कारखानदाराला अ‍ॅड. प्रा. सुनील कात्रे यांनी रंगमंचावर आणले. त्यांच्या अभिनयाला हावभावांची चांगली जोड होती. मात्र, डॉक्टरांसोबतच्या संवादात त्यांची देहबोली निराशा दाखविणारी असायला हवी होती.

आबाासाहेबांची पत्नी सावित्रीबाई या नवख्या कलाकाराने आपली भूमिका आत्मविश्वासाने चांगली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे पुस्तकी भाषेतील संवाद अनेक प्रसंगांत कृत्रिम वाटले. त्यांच्याकडून दिग्दर्शिकेने जास्त तयारी करून घेणे गरजेचे होते.

नाटकात सर्वांत जास्त नैसर्गिक अभिनय वाटला तो सायली कारखानीसची भूमिका साकारणार्‍या समृद्धी खिस्ती हिचा. तिच्या डान्सने झालेली एन्ट्री प्रेक्षकांना भावली. तिचे समर्पक हावभावही छान वाटले. तिची भूमिका नाटकात उजवी ठरली.

साहील कारखानीसची भूमिका सागर खिस्ती यांनी केली. स्मृतिभ्रंश झाल्यानंतरचे त्यांचे बालीश संवाद अगदीच बालीश वाटले. काही प्रसंगात त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटला.

डॉ. पाटील यांची भूमिका अर्जून डावरे यांनी साकारली. पेशंटच्या चिंतेने भलतेच चिंताग्रस्त झाल्याचे दिसले. खरंतर डॉक्टरांनी पेशंटच्या पालकांना धीर द्यायला असतो. मात्र, तेच स्वतः एवढे चिंतीत का झाले, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. वाट्याला आलेले संवाद त्यांनी चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र केला.

करिष्मा कदमची छोटी भूमिका असलेले पात्र करिष्मा आंग्रे हिने रंगमंचावर आणले. तिचा अभिनय अगदीच कसलेला वाटला. तिने धीटपणे आणि आत्मविश्वासाने आपली भूमिका पार पाडली. तिच्या वाट्याला आणखी प्रसंग यायला हवे होते.

छोटी सायली वेदश्री जोशीने आणि छोट्या साहीलला अमोल वडलाकोंडा याने साकारली. फ्लॅशबॅकमधल्या प्रसंगांत त्यांची एन्ट्री झाली. ते दोघेही छानपैकी सहज रंगमंचावर बागडले.

प्रकाश योजनेची जबाबदारी साईशेखर वाघ यांच्याकडे होती. काही प्रसंगांवर त्यांनी चांगले स्पॉट टाकले. डॉक्टर व लहान सायली-साहीलच्या पहिल्या एन्ट्रीवेळी लाईट उशिराने पडले.

संगीत योजना ओन दानवे यांच्याकडे होती. गंभीर प्रसंगात संगीताची फार गरज असते, ती कमी पडल्याचे दिसले. मात्र, सायकलीला बालपण आठवते त्या वेळी दिलेले संगीत समर्पक वाटले.

नेपथ्याची जबाबदारी निलेश मेढे यांनी उचलली.सुखवस्तू घर व हॉस्पिटलचे आयसीयू चांगल्या प्रकारे दाखविले गेले. मात्र, नेपथ्य सांभाळताना अनेक चुकाही झाल्या. पाण्याचा ग्लास, वृत्तपत्र, चहाचे कप अनेक प्रसंगात जागेवरच दिसले. सायलीचे दप्तरही टिपॉयवरच राहिले. पहिल्या मजल्यावरील खोली दाखविण्याची संकल्पना आवडली.

रंगभूषा व वेशभूषा करण्याची जबाबदारी वंदना सैंदाणे यांच्याकडे होती. सायलेची वेशभूषा समर्पक होती. मात्र, सावित्रीबाईंचा मेकअप जास्त वाटला. त्यांची केशरचनाही शेवटपर्यंत एकच होती. मुलाच्या अपघातानंतर वेशभूषेत बदल करायला हवा होता. एका प्रसंगातच छोट्या साहीलच्या डोळ्याला चष्मा दिसला.

रंगमंच व्यवस्था श्रद्धा थोरात व मीला बेलेकर यांनी पाहिली. दिग्दर्शिका ज्योती खिस्ती यांनी नाटक सादरीकरणासाठी कलाकारांकडून चांगली तयारी करवून घेण्याचा प्रयत्न केला. नवख्या कलाकारांकडे त्यांनी जास्त लक्ष देणे गरजेचे होते. सायली, करिष्मा व आबासाहेब यांच्या भूमिका चांगल्या वाटल्या. भूमिकेला योग्य न्याय द्यायचा असेल तर पात्रनिवडही तितकीच महत्त्वाची. साहील व त्याची आई यांच्यातील अंतर खटकत होेते. पहिल्या अंकात नाटक रेंगाळण्याचा ‘आघात’ प्रेक्षकांवर झाला असला तरी दुसर्‍या अंकात नाटकाने जराशी पकड घेतली आणि शेवट सकारात्मक झाल्याने प्रेक्षक सुखावले !

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या