Monday, November 25, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा 2022 : तो क्षण

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : तो क्षण

सर्व काही अलबेल असताना व्यसनापायी झालेली जराशी क्षणैक चूक कौटुबिक सुख कसे हिरावून घेते, हे दर्शविणारे नाटक गुरुवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाले. जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रीडा ग्रामीण शैक्षणिक मंडळाने साद केलेल्या ‘तो क्षण’ या नाटकाचे लेखक संजीव कोलते आहेत. दिग्दर्शक संजय लोळगे यांनी या कथानकाला इतर कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणाच्या साह्याने चांगलेच फुलविले. गंभीर विषय मांडतानाच दर्जेदार विनोदाचे फवारेही उडाले. दिग्दर्शन करतानाच लोळगे यांनी नाटकात चांगली भूमिकाही केली. ही दुहेरी जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली.

मैत्री-मंदार या उच्चशिक्षीत दाम्पत्याला 8 वर्षे होऊनही अपत्य नसते. या चिंतेने मैत्रीला ग्रासलेले असते. त्यांच्या घरी बंंदूक नावाचा अंध नोकर असतो. एके दिवशी मैत्रीला बाहेरगावी जावे लागते. त्या दरम्यान तिच्या मैत्रीणीची नणंद म्हणजेच सलोनी तिच्या घरी राहायला येते. लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर व्यसनामुळे शुद्ध हरवलेल्या मंदार आणि सलोनीचे संबंध येतात. याचे शल्य त्या दोघांनाही सकाळी बोचत राहते. सलोनी गेल्यानंतर मैत्री घरी येते. सुमारे चार महिन्यांनंतर मैत्री गर्भवती राहते. मातृभावनेच्या केवळ कल्पनेनेच ती आनंदून जाते. मैत्री काही चाचण्या करण्यासाठी डॉक्टरांकडे जाते. इकडे मंदारला मैत्रीच्या मैत्रिणीचा फोन येतो. सलोनी मृत्यू पावल्याची बातमी ती सांगते. या चिंतेत असतानाच मैत्री दुःखी पावलांनी घरी येते. त्याबाबतचे कारण विचारले असता मंदारवर मोठे आभाळ कोसळते. मैत्रीच्या गर्भाला एड्स झाल्याचे ती सांगते. म्हणजेच सलोनीमुळे मंदारला, मंदारमुळे मैत्रीला आणि तिच्यामुळे गर्भाला या गंभीर आजाराची लागण होते. अशा या गंभीर घटनेच्या उलगड्याने नाटकाचा करूण शेवट होतो.

- Advertisement -

मोठी जनजागृती करूनही अनेकजण एड्सच्या आहारी जातात. या विषयावर सहसा कोणी उघडपणे बोलत नाही. मात्र दिग्दर्शक संजय लोळगे यांनी ही संहिता स्पर्धेसाठी निवडण्याचे धाडस केले. अनेक प्रसंगांतील विनोदांमुळे प्रेक्षकांत खसखस पिकली. मैत्री या पात्राला चैताली बर्डे हिने आपल्या करूण हावभावांच्या आधारे उत्तम अभिनय केला. तिच्या संवादात विलक्षण आत्मविश्‍वास दिसला.

मंदारची भूमिका दिग्दर्शक संजय लोळगे यांनी केली. अनेक प्रसंगात त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटला. त्यांची देहबोलीही भूमिकेला साजेशी होती. एका प्रसंगात मंदार फोन आल्याचे सांगतो आणि नंतर फोनची रिंग वाजते. येथे टायमिंग चुकला. मात्र, दिग्दर्शन करून स्वतः नाटकात भूमिका करताना लोळगे यांनी मोठी कसरत केल्याचे दिसले.

नाटकात सर्वांत जास्त विनोद पिकविणारे पात्र म्हणजे बंदूक. ही भूमिका क्षितीज देशमुख यांनी केली. अंध व्यक्तीची भूमिका त्यांनी अगदी हुबेहूब केली. हजरजबाबीपणा आणि मिष्किल संवादांनी प्रेक्षकांना चांगलेच हसवले. एका संवादात मात्र ते शालूला चुकून शांताबाई म्हणतात. बोल्ड बिनधास्त सलोनी हे पात्र तनिष्का देशमुख हिने साकारले. तिची देहबोलीही पात्राला शोभून दिसली. तिची एन्ट्री प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेली.

मोलकरीण शालूला मृणाल कुलकर्णी हिने रंगमंचावर आणले. तिच्या वाट्याला जास्त भूमिका आली नसली तरी तिने ती ठीकपणे पार पाडली. गौरव ठिपसे यांनी नेपथ्य केले. हॉल, बेडरूम, किचन छान वाटले. एका प्रसंगात मंदार लँडलाईन फोन उचलतो तेव्हा त्याच्या रिसिव्हरची केबल निसटते. प्रकाश योजना सोहम दायमा यांनी सांभाळली. प्रसंगानुरूप त्यांनी समर्पक लाईट दिले. स्पॉटही उत्तम.

प्रसंगांत भावूकता, गंभीरता आणण्यासाठी प्रतीक्षा वेळापुरे यांचे संगीत कामी आले. पावसाच्या प्रसंगावेळी पावसाचा आवाज त्यांना देता आला असता. मंदारच्या एका संवादावेळी संगीताचा आवाज मोठा वाटला. रंगभूषा अक्षय लाटे यांनी केली. सलोनीची रंगभूषा छान केली. वेशभूषेचा जबाबदारी चैताली बर्डे यांनी केली. सलोनी, मंदार आणि मैत्रीचे ड्रेस चांगले वाटले. मात्र, मैत्रीचा साडीतील गेटअप मात्र खटकला. साडी व्यवस्थित नेसलेली नव्हती.

रंगमंच व्यवस्था सचिन इंदलकर, सुनील वनवे, राजेश आगुंडे, आकाश बोरकर यांनी पाहिली. पात्रांची योग्य निवड दिग्दर्शक लोळगे यांनी केली. कलाकारांनीही आपापले पात्र छानपैकी रंगवले. बंदूक आणि मैत्रीचे पात्र सर्वांत जास्त प्रभावी वाटले. दिग्दर्शकाने कलाकारांकडून त्यांनी चांगली तयारी करून घेतली. या नाटकामुळे स्पर्धेतील उत्सुकता वाढली हे मात्र नक्की.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या