Monday, November 25, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा 2022 : तयार नसलेली ‘भूमिका’

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : तयार नसलेली ‘भूमिका’

संदीप जाधव | 9225320946

स्पर्धा म्हटली की प्रतिस्पर्धी आलेच. त्यामुळे दुसर्‍यापेक्षा आपण कसे रसस राहू याचा विचार करूनच प्रत्येक स्पर्धक तयारी करत असतो. यासाठी योग्य मार्गदर्शकही गरजेचे असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन न मिळालेला व तयारी न केलेला स्पर्धक कसा गांगरून जातो. तसेच काहिसे दृश्य सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाला. श्रीरामपूरच्या अपंग सामाजिक संस्थेने सादर केलेले ‘भूमिका’ हे दोन अंकी नाटक रंगलेच नाही. प्रेमाच्या त्रिकोणाचा विषय असूनही दिग्दर्शकाला तो फुलविता आला नाही. काही पात्रांनी चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

प्रल्हाद जाधव यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन संदीप कदम यांनी केले. नाटकातील भूमिका करताना त्यांचे दिग्दर्शनाकडे दुर्लक्ष झाले असावे. पात्रनिवडीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे होते. काही प्रसंग मात्र प्रेक्षकांना बरे वाटले.

सुहास व राघव हे दोघे पत्रकार बंधू. एका खुनाच्या बातमीचा पाठपुरावा केल्याने गुंड राघववर अ‍ॅसिड हल्ला करतात. त्यात तो विद्रूप होतो. एके दिवशी त्याच्या वाचनात ‘मैत्री’ संबंधी जाहिरात येते. ती एका तरुणीने दिलेली असते. त्यानुसार तो सहज म्हणून आपल्या आलंकारीक काव्यभाषेत पत्र पाठवितो. त्याला उत्तरही मिळते. या पत्रोत्तरातूनच दोघांची जवळीक होते. ती एके दिवशी राघवला भेटायला येणार असते.

मात्र, आपल्या विद्रूप चेहर्‍यामुळे राघव धास्तावतो. आपल्या भावाला म्हणजेच सुहासला तो राघवची भूमिका करायला लावतो. मग चारू ही तरुणी भेटल्यावर सुहासलाही ती हवीहवीशी वाटली. मात्र, राघवचा तो उल्लेखही करत नाही. दोघांच्या प्रेमाच्या कात्रीत अडकलेल्या चारूला खरे सत्य समजल्यावर ती निघून जाते. अशा आशयाच्या या कथानकाला दिग्दर्शकाने सादर केले.

सुहास या पात्राला मुनीर सय्यद यांनी निभावले. रंगमंचावर ते शेवटपर्यंत होते. कमी पात्र असले की नाटकाची मोठी जबाबदारी पात्रांवर असते. ही जबाबदारी पेलताना सय्यद जरासे कमी पडले. त्यांचा हावभावरहीत अभिनय कृत्रिम वाटला. त्यांच्या हालचालीही अतिशय संथ होत्या. त्यांचे पाठांतर मात्र चांगले होते.

राघव ही भूमिका दिग्दर्शक संदीप कदम यांनी केली. रंगमंचावर त्यांचा वावर सहज होता. त्यांचा अभिनयही ठीक वाटला. संवादफेकीतील चढउताराकडे त्यांनी आणखी लक्ष द्यायला हवे होते.

चारू या तरुणीला आकांक्षा गर्जे यांनी रंगमंचावर आणले. त्यांचे आत्मविश्वासपूर्वक संवाद ही नाटकातील जमेची बाजू. आधी हळू आवाजातील त्यांचे संवाद नंतर मात्र खणखणीत वाजले.

नाटकात एकाच प्रसंगात आलेला गुंड सौरभ संकपाळ यांनी उभा केला. त्यांच्या वाट्याला आलेले तीन-चार वाक्य त्यांनी अगदी ‘भाईगिरी’त म्हटले.

संजय साळवे या नाटकाचे निर्मितीप्रमुख होते. नेपथ्याची जबाबदारी नानासाहेब कर्डिले व गणेश ससाणे यांच्याकडे होती. घरात आणखी वस्तू असायला हव्या होत्या. प्रकाश योजना शुभम केनेकर व अमोल चिलखा यांनी सांभाळली. रंगीबेरंगी स्पॉट चांगले वाटले. मात्र, चारूच्या पहिल्या प्रसंगात तिचा अंधारात होता.

संगीत देण्याची जबाबदारी अतुल गोपाळे व सागर डोखे यांच्याकडे होती. काही प्रसंगांत परिणामकारक आणण्यासाठी त्यांनी चांगले लाईट दिले. नाटकात आणखी संगीताचा वापर करता आला असता.

रंगभूषा परिक्षित मोरे यांची होती. वेशभूषेची जबाबदारी प्रिया मोरे यांनी केली. संपूर्ण नाटकात सुहास व राघवचा एकच पोषाख होता. चारूचे मॉड ड्रेस मात्र छान वाटले. रंगमंच व्यवस्था संचित आदिक, गणेश मगरे व गणेश करडे यांनी पाहिली.

स्पर्धेत उतरण्यासाठी दिग्दर्शकाची तयारी कमी पडल्याचे दिसले. नाटकात विनोद क्वचितच होते. प्रसंगांतील गंभीरताही जाणवली नाही. स्पर्धा पाहणारे रसिक नाटकाकडून मोठी अपेक्षा घेऊन पाहायला येत असतात. दर्जेदार नाटकांच्या रांगेत येऊन बसायचे असेल तर तयारी चांगलीच करायला हवी ना.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या