संदीप जाधव | 9225320946
भ्रष्टाचाराने बटबटलेल्या व्यवस्थेत अनेकजण सामील असतात. काहीजण त्यात भरडले जातात. वैद्यकीय सेवेसारख्या पवित्र कार्यातही वाढता भ्रष्टाचार गंभीर रूप धारण करत आहे. सर्वसामान्यांची लूट करत लाचखोरी करणारी मोठी साखळी सरकारी रुग्णालयात कशी काम करते, तसेच पैशांच्या मोहापायी नकळतपणे स्वतःचाच कसा घात होतो, याचे चित्रण राज्य नाट्य स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ‘धन्वंतरी’ प्रयोगात प्रभावीपणे पाहायला मिळाले. अहमदनगर फिल्म फाउंडेशनने सादर केलेल्या या नाट्यकृतीचे लेखक सुहास ज्ञाते आहेत. या कथानकाला दिग्दर्शक अजय लाटे यांनी रंगमंचावर रोखठोकपणे मांडत सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार अधोरेखित केला. पैशासाठी रुग्णांची अडवणूक, हेळसांड, एका डॉक्टर-नर्सचे नाजूक संबंध, त्याचबरोबर प्रामाणिक डॉक्टरांची गळचेपी अशा अनेक मुद्द्यांना हात घालत प्रेक्षकांना सरकारी व्यवस्थेतील गचाळपणाचे प्रातिनिधीक स्वरूप दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला.
पडदा उघडताच एका सरकारी रुग्णालयाचे दर्शन होते. रुग्णांची लगबग, कर्मचार्यांचा बेरकीपणा, तसेच लालसी डॉक्टर यांच्या प्रसंगातून नाटक पुढे-पुढे सरकत जाते. रुग्णांकडून पैसे उकळून ते आपसात वाटून घेण्यासाठी मोठी साखळी कार्यरत असते. हेही या नाटकातून दाखविण्यात आले. एका दिवशी रुग्णालयात एका बेवारस महिलेला दाखल करण्यात येते. आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना तिची हेळसांड सुरू होते. एका व्यापारी रुग्णासाठी तिला जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात येते. दरम्यानच्या काळात त्या महिलेला संपविण्याची सुपारी वॉर्डबॉयला मिळते.
दारूच्या नशेत वॉर्डबॉय त्या महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून एक प्रामाणिक डॉक्टर त्याला विरोध करतो. पोलीसांना सोबत आणून डॉक्टरसह अन्य कर्मचार्यांचा पर्दापाश करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यालाच महिलेच्या मृत्यू प्रकरणात अडकवण्यात येते. या कट कारस्थानात रुग्णालयाचा प्रमुख डॉक्टरही सहभागी असतो. कालांतराने त्या बेवारस महिला रुग्णाची ओळख पटते. त्या प्रमुख डॉक्टरचीच मुलगी असते. सासरच्या मंडळींनी तिला जाळलेले असते. हे समजूनही तो हतबल डॉक्टर काहीही करू शकत नाही. तो वेडापिसा होतो. असे या नाटकाचे कथानक.
सरकारी रुग्णालयातील लाचखोरीवर या नाटकाने लख्ख प्रकाश टाकला. अर्थात सर्वच कर्मचारी-डॉक्टर तसे नसतात. विषयाला प्रभावीपणे मांडण्यात दिग्दर्शक लाटे यांनी मोठी मेहनत घेतल्याचे दिसले. कलाकारांनीही आपापली भूमिका रंगविण्याचा चांगला प्रयत्न केला.
डॉ. कोटनीस या पात्राला अनिकेत देऊळगावकर यांनी रंगविले. त्यांची देहबोली एखाद्या डॉक्टरसारखीच वाटत होती. एका प्रसंगात मात्र त्यांचे संवाद रिपीट झाले. शेवटच्या प्रसंगातील अभिनय मात्र प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेला. त्यांच्या अभिनयाला हावभावांची योग्य झालर होती.
प्रामाणिक डॉ. जोशी यांना मोहित मेहेर यांनी रंगमंचावर आणले. जराशा वेंधळ्या वाटणार्या या डॉक्टरचा ठामपणा त्यांनी छान टिकवला. त्यांचा अभिनय अगदी नैसर्गिक वाटला. एका प्रसंगात त्यांनी ज्योतिबाच्या श्रीमुखात त्यांनी खरीखुरी लगावली!
डॉ. गायकवाड यांची भूमिका मोनिष ढाळे यांनी चांगली केली. ज्योतिबा या वॉर्डबॉयच्या भूमिकेला गणेश लिमकर यांनी चांगला न्याय दिला. त्यांचा रंगमंचावरील सहज वावर त्यांच्यातील कसदारपणाची साक्ष देत होता. त्यांची देहबोली त्यांच्या पात्राला समर्पक वाटली.
सखाराम व हवालदारची भूमिका अजय लाटे यांनी केली. तरुणाची भूमिका किरण डिडवानीया यांनी केली. पात्राचे बेअरिंग त्यांनी शेवटपर्यंत सोडले नाही. इन्स्पेक्टर शिंदे यांना अमोल तोडकर यांनी निभावले. इस्पेक्टरची भूमिका ते आणखी प्रभावीपणे करू शकले असते.
अॅनाची भूमिका शिवानी कुर्हे यांच्या वाट्याला आली. कायमच हिंदीत बोलणारी स्वार्थी अॅना छान वाटली. तिच्या भाषेत मराठीमिश्रीत शब्द टाकता आले असते. नाटकाच्या पहिल्याच प्रसंगात कुत्रा चावलेला रुग्ण राहुल उजागरे यांनी चांगला सादर केला. त्यांच्या वाट्याला आणखी भूमिका यायला हवी होती.
याशिवाय प्रशांत जठार, सोहम दायमा, एकदंत कुलकर्णी, प्रियंका राठोड, वसी खान यांनीही नाटकात भूमिका केल्या.
नेपथ्याची जबाबदारी अंजना मोरे यांनी केली. रंगभूषा स्नेहल सौंदणकर यांनी केली. जळीत रुग्ण, अॅना यांची रंगभूषा चांगली वाटली. वेशभूषा वसी खान यांनी सांभाळली. इन्स्पेक्टरच्या पायातील शूज, शर्टाबाहेर आलेली पिस्तूल खटकली. तेजस अतितकर यांनी खणखणीत संगीत दिले. प्रकाश योजना मयूर पाटील व सोहम दायमा यांनी व्यवस्थित सांभाळली. मात्र, कोटनीस डॉक्टरांच्या केबिनमधील ट्यूबलाईट ऐवजी दुसरा पर्याय निवडता आला असता.
स्पर्धेच्या शेवटच्या नाटकात ‘धन्वंतरी’ने चांगला रंग भरला. व्यवस्थेत असणार्या भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्तींवर ठळकपणे बोट ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले. त्यांना कलाकारांच्या दमदार अभिनयाची जोड मिळाली. स्पर्धा संपली, आता उत्सूकता निकालाची…