संदीप जाधव | 9225320946
सामान्य मुलांचा सांभाळ करतानाच कित्येक पालकांची दमछाक होते. मात्र, मतिमंद मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळणारेही पालकही समाजात आहेत. अशा मुलांच्या भावना अगदी तीव्र असतात. मानसिक बुद्धीमत्ता खुंटली असली तरी त्यांची शारीरिक गरज मात्र सामान्य असते. मतिमंदांच्या या दुर्लक्षित प्रश्नााबत कुठेही बोलले जात नसले तरी नाटकाच्या माध्यमातून ही ज्वलंत प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न मंगळवारी राज्य नाट्य स्पर्धेतील ‘एका उत्तराची कहाणी’ या नाट्यकृतीने केला.
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘परफेक्ट बायको कशी शोधावी?’
नगरच्या रंगकर्मी प्रतिष्ठानने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक अरविंद लिमये आहेत. सामाजिक समस्येवर आधारीत असलेल्या या नाट्याचे दिग्दर्शन अनुभवी नानाभाऊ मोरे यांनी केले.
योगेश-नीता या मध्यमवर्गीय दाम्पत्याला दोन मुली. एक विशाखा जी मतिमंद असते. तेजू ही दुसरी मुलगी. ती बाहेरगावी नोकरी करत असते. नीता विशाखाची मनापासून काळजी घेते. मात्र, योगेशला विशाखाचं मतिमंदत्व हा जणू एक प्रश्न वाटतो. तिला एखाद्या मतिमंदांच्या संस्थेत दाखल करण्याचा योगेशचा विचार नीताला खिन्न करतो. अशातच अधून-मधून घरात येणारा लाँड्रीवाला सिद्धू हा मुलगा विशाखाशी लगट करण्याचा प्रयत्न करत असतो. एके दिवशी तो घरी आल्यावर विशाखा त्याला शारीरिक ओढीतून जवळ घेण्याचा प्रयत्न करते.
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘चाणक्य विष्णूगुप्त’
हे पाहून घरातले सर्वचजण चिंताग्रस्त होतात. विशाखाला संस्थेत ठेवण्याला विरोध करणारी नीता नंतर मात्र विचार बदलते. विशाखाला मुंबईतील एका संस्थेत दाखल करते. त्या संस्थेच्या चालकाचाही मुलगा मतिमंद असतो. विशाखाची शारीरिक गरज भागविण्यासाठी नीताने हे पाऊल उचलले असते. असे कथानक असलेल्या या नाटकात मतिमंदांची ज्वलंत समस्या दाखविण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शकाने केला. काही पात्रांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. पहिल्या अंकात संवादांच्या भडीमारामुळे संथ वाटणारे नाटक नंतर मात्र, क्लायमॅक्स साधत नाटक शेवटाकडे जाते. पात्रनिवडही चांगली होती. काही चुकाही झाल्या.
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘आघात’ नेमका कुणावर?
योगेश या पात्राला शैलेश देशमुख यांनी उभे केले. चिंताग्रस्त अभिनयही त्यांना छान जमला. पत्नी नीताशी संवाद साधत असताना त्यांची हतबलता नैसर्गिक वाटली. एका प्रसंगात ते टीव्ही लावतात आणि पेपर वाचतात हे मात्र खटकले.
नीताची भूमिका रेणुका सूर्यवंशी यांनी साकारली. प्रेमळ आई त्यांनी चांगली रंगवली. अनेक प्रसंगांत त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी अगदीच नैसर्गिक वाटले.
तेजूची भूमिका दीप्ती क्षीरसागर हिने केली. स्पष्ट उच्चारामुळे तिचे संवाद प्रभावी वाटले.
पानसे काकू या पात्राला पूजा पठाडे यांनी दोनदा नीताच्या घरात आणले. भांडखोर संवादावेळी त्यांच्या हातवारे अगदीच संथ होते. त्यासाठी त्यांनी आणखी तयारी करायला हवी होती.
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : रेंगाळलेलं ‘समांतर’
सिद्धू हे पात्र श्रावण शिंदे याने छानपैकी वठवले. लाँड्रीवाला असणारा सिद्धू जेव्हा विशाखाशी लगट करतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली चीड त्याच्या चांगल्या अभिनयावर शिक्कामोर्तब करते. खाली पडल्यानंतर भेदरलेला अभिनयही त्याने आत्मविश्वासाने केला.
विशाखा या मतिमंद मुलीची अवघड भूमिका सिद्धी कुलकर्णी हिने अगदी सहजतेने केली. त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली असावी. हाता-पायाचे व्यंगत्व तिने शेवटपर्यंत टिकवून ठेवले. हसरे, भेदरलेले अन् रडवे हावभाव तिने अगदी नैसर्गिकपणे केले. तिच्या अभिनयाला सर्वांत जास्त टाळ्या मिळाल्या.
नेपथ्याची भूमिका धनश्री खोले यांच्याकडे होती. सुखवस्तू कुटुंबाचा फ्लॅट त्यांनी छानपैकी दाखविला.
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : छान ‘खेळ मांडियेला’
संगीत संयोजन आशितोष मेनसे व स्नेहल गुनकी यांनी पाहिले. सुरुवातीलाच दाखविलेले गीत खूप आवडले. नीता मुंबईवरून आल्यानंतर निर्माण झालेला क्लायमॅक्सवेळी गंभीरता दर्शविणारे संगीत देता आले असते.
प्रकाश योजना विनेश महादेव लिमकर यांनी सांभाळली. सुरुवातीच्या गीतात दाखविलेले फ्लोरोसंट फुले व फुलपाखरू खूपच सुबक वाटले. नंतरच्या काही प्रसंगातील स्पॉटही चांगलेच.
रंगभूषा व वेशभूषा शीतल देशमुख यांनी केली होती. रंगमंच व्यवस्था सुनील वनवे, सचिन इंदलकर, राजेश आगुंडे, आकाश बोरकर यांनी पाहिली.
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : भावनांचा कल्लोळ अनाथ
मतिमंद मुलांच्या शारीरिक गरजेचा प्रश्न मांडणारी संहिता दिग्दर्शक नानाभाऊ मोरे यांनी विचारपूर्वक निवडल्याचे दिसते. कारण अशा समस्यांवर जास्त चर्चा होत नाही. कलाकारांनीही आपापली भूमिका नीटपणे सांभाळली. त्यांच्याकडून चांगली तयारी दिग्दर्शकाने करून घेतली. योगेश-नीताची केमिस्ट्री आणखी जुळवता आली असती. विशाखाच्या पात्राने नाटकात खूपच गंभीरता आणली. एका ज्वलंत सामाजिक प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी सादर केलेली ही कहाणी प्रेक्षकांना भावनाविवश करून गेली, हे मात्र नक्की.
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : मी पण नथूराम गोडसेच बोलतोय…