संदीप जाधव | 9225320946
जन्माला येणार्या प्रत्येक जीवाचा मृत्यू हा अटळ. मृत्यू हे एक चिरंतन शाश्वत सत्य आहे, तरीही स्वार्थासाठी अनेकजण अनैतिक कृत्यांमुळे पापाचे धनी होतात. वाईट कर्माची फळे वाईटच. या तत्त्वावर आधारीत नाटक शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाले. श्रीरामपूरच्या होप फाउंडेशनने सादर केलेल्या ‘सातेरं’ या दोन अंकी नाटकाचे लेखक सुनील राऊत आहेत. चांगल्या कथानकाला दिग्दर्शक किशोर पराते यांनी नाट्यकृतीच्या माध्यमातून उत्तमपणे सादर करण्याचा प्रयत्न केला. कलाकारांच्या साथीने दिग्दर्शकाने नाटकातील गंभीरपणा वाढविला. वेळोवेळी निर्माण होणार्या सस्पेन्सने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. दुसर्या अंकात पात्रांचे संवाद जरासे लांबले.
मृत्यू ही अटळ सत्य हे माहीत असूनही माणूस त्यापासून धडा घेत नाही. राग, लोभ, द्वेष, मत्सर, भीती आदी गुणांचे प्रतिनिधित्व करणार्या पाच पात्रांची सांगड नाटकात घालण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कालिमातेच्या मंदिरात पाचजण आश्रय घेतात. सलग अनेक दिवस धो-धो बरसणारा पाऊस धोक्याची घंटा देतो. मंदिरात असणारी म्हातारी भविष्यातील भयानक संकटाबाबत माहिती देते. मृत्यूबाबतची संकल्पना पटवून देण्यासाठी म्हातारी महर्षी व्यासांच्या शिष्याच्या जीवनातील प्रसंग सांगते. या वेळी तो प्रसंग कलाकारांनी छानपणे उभा केला. विनाशकारी संकटापासून वाचण्यासाठी सर्वांनी मंदिराच्या दीपमाळेजवळ पापांची कबुली द्यावी, असे म्हातारी सांगते व गायब होते.
जीवाच्या आकांताने भयभीत झालेल्या सर्व पाचजण मग दीपमाळेजवळ जाऊन आपल्या पापांची कबुली देतात. आपण केलेल्या चोर्यांची कबुली हंबीरराव देतो. आपल्याच मुलीवर अतिप्रसंग केल्याचे साहेब हे पात्र सांगते. गुलाबचंदने आपली कामवासना भागविण्यासाठी भावजयीचा वापर करून घेतो. अरूंधतीने पैशांच्या हव्यासाापोटी पतीचा खून केलेला असतो. या चारहीजण पापाची कबुली देतात. मात्र, त्यांच्यावर वीज पडत नाही. त्यामुळे पावसाच्या संकटात आपला मृत्यू होणार नाही, अशी त्यांची खात्री होते.
मोहनने आता पापांची कबुली द्यावी, यासाठी ते चौघेही त्याच्यावर दबाव आणतात. मात्र वामनने दिलेल्या कबुलीनंतर विजांच्या कडकडाटात मोठे संकट येते आणि त्यात हंबीरराव, साहेब, गुलाबचंद आणि अरूंधती यांच्यावर दगडांचा वर्षाव होतो. त्यात त्यांचा मृत्यू होतो. निष्पाप असणारा मोहन वाचतो. मात्र, इतरांच्या मृत्यूमुळे त्याला कमालीचा दुःख होते. तितक्यात म्हातारी अवतरते. जणू ती देवीचे रूप धारण करून आलेली असते. मृत्यू या संकल्पनेबाबत माहिती देऊन गंभीर प्रसंगाने नाटक संपते.
सुहास शिरवळकर यांच्या अनुभव या कादंबरीतील कथेचे स्वैर नाट्य रूपांतर करून सुनील राऊत यांनी संहिता लिहिली. चांगल्या कथानकाला दिग्दर्शक किशोर पराते यांनी योग्य दिशा दिली. रंगमंचावरील कलाकारांसोबतच तांत्रिक कलाकारांच्या साथीने नाटकातील भयानकता प्रेक्षकांना अचंबित करून गेली.
मोहन हे पात्र कृष्णा वामने याने उभारले. भेदरलेल्या त्याच्या अभिनयाला हावभावांची साथ मिळाली. पहिल्या अंकापेक्षा दुसर्या अंकातील त्याचा अभिनय चांगला वाटला. एका प्रसंगात त्या वापरलेला ‘नगण्य’ हा शब्द समर्पक वाटला नाही.
साहेब हे पात्र प्रदीप रासकर यांनी सादर केले. पापाची कबुली देताना त्यांचा अभिनय कमालीचा नैसर्गिक वाटला. त्यांना देहबोली आणखी परफेक्ट ठेवता आली असती.
गुलाबचंदला जयदेव हेंद्रे यांनी साकारले. त्यांच्या संवादापेक्षा चेहर्यावरील हावभावच खूप काही बोलू जात होते. व्यापारी असणार्या गुलाबचंदला ते आणखी रंगवू शकले असते. त्यासाठी संवादावर त्यांनी आणखी भर द्यायला हवा होता.
हंबीररावला रोहन रायकवाड यांनी रंगमंचावर आणले. हावभावांवर त्यांनी आणखी मेहनत घ्यायला हवी होती. त्यांचा रंगमंचावरील वावर मात्र सहज वाटला.
अरूंधती या पात्राला सायली नरवणे हिने रंगविण्याचा प्रयत्न केला. संवादात ती कुठेही अडखळली नाही. मात्र, तिच्या संवादांत असणारी गंभीरता चेहर्यावर प्रभावीपणे दिसली नाही. अनेकदा ती प्रेक्षकांकडे पाहून संवाद म्हणत होती.
नाटकात सर्वांत जास्त सस्पेन्स निर्माण करणार्या म्हातारी या पात्राला विद्या जोशी यांनी उत्तमरित्या सादर केले. हसण्याची वेगळी लकब त्यांनी छान जुळवली. त्यांनी आत्मविश्वासाने आपली भूमिका ठळकपणे वठवली.
नेपथ्याचा जबाबदारी प्रदीप रासकर यांच्याकडे होती. दीपमाळ मंदिराचे अस्तित्व सांगत होती. खांबही चांगले. मात्र, बाकडे जरासे जुनकट असायला हवे होते.
प्रकाश योजना प्रिया ढाळे यांनी पाहिली. त्यांनी दिलेल्या लाईटमुळे प्रसंग प्रभावीपणे झाले. विजाही चांगल्या चमकल्या. नाटक गंभीरता आणणारे संगीत यश पावसे यांनी दिले. पाऊस, वीज, वारा हे सर्वच आवाज त्यांनी उत्तम दिले. रंगभूषा व वेशभूषा संध्या पावसे यांची होती. म्हातारीला त्यांनी अगदी छान रंगवले होते. दिग्दर्शक किशोर पराते यांनी कलाकारांच्या भूमिकेवर चांगली मेहनत घेतल्याचे दिसले.