Monday, November 25, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘तू भ्रमत आहसि’

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘तू भ्रमत आहसि’

संदीप जाधव | 9225320946

जन्म-मृत्यू अटळ आहे. त्यामधला प्रवास म्हणजे एक माया. या मायेच्या भ्रमात आपण सर्वचजण जगत असतो. बदलत्या जीवनशैलीचा कमालीचा परिणाम नात्यांवर झाला आहे. प्रत्येकाने या नात्यांना सुदृढ करून जीवनाच्या शेवटपर्यंत आनंदीच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश देणारे नाटक मंगळवारी राज्य नाट्य स्पर्धेतील ‘तू भ्रमस आहसि’ या नाटकात पाहायला मिळाले. एक चांगला विचार असलेल्या कथानकाला कलाकारांनी चांगले फुलवले. आपण स्वतःभोवतीच फिरत असतो. मात्र, आपल्याला स्वतःची भेट कधीच घेता नाही. त्यासाठी स्वतःला भेटा व आनंदी व्हा असा संदेशही या नाटकाने दिला.

- Advertisement -

आनंदम संस्थेने सादर केलेली ही नाट्यकृती. डॉ. समीर मोने यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन कल्पना सावंत-नवले यांनी केले. वैचारिक विषयांवरील नाटक सादर करणे तसे अवघड. मात्र, नवले यांनी नाटकाच्या सादरीकरणासाठी मोठी मेहनत घेतल्याचे दिसले. कलाकारांनीही तितक्याच ताकदीने नाटक तडीस नेले.

डॉक्टर असलेला विश्वंभर हा पत्नी व वडील सदानंद यांच्यासोबत राहत असतो. वासंती ही त्याची आई कॅन्सरमुळे काही दिवसांपूर्वीच वारलेली असते. ती येऊन आपल्याशी बोलत असल्याचा भास विश्वंभरला होत असतो. वृद्धत्वाकडे झुकलेले त्याचे वडील म्हणजेच सदानंद यांना कुटुंबाकडून अपेक्षित प्रेम न मिळाल्याची खंत असते. दरम्यानच्या काळात इच्छा मरणाची चळवळ चालविणारा त्यांचा मित्र वामन त्यांना भेटतो. चळवळीत सहभागी होण्यासाठी आग्रही असतो. मात्र, सदानंद त्याच्या या विचारांना विरोध करतात. अशातच एकदा त्यांना पत्नी वासंतीचा भास होतो. त्यात ती त्यांच्याशी संवाद साधते. काही दिवसांनी सदानंद मरण पावतात. मात्र, जाताना त्यांनी दिलेला आनंदी राहण्याचा सल्ला प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो.

दिग्दर्शिका कल्पना सावंत-नवले यांनी कलाकारांच्या भूमिकेकडे चांगले लक्ष दिल्यासे दिसले. स्वतःही त्यांनी चांगली तयारी केली. अनेक प्रसंगातून फुललेले विनोद प्रेक्षकांचा ताण कमी करण्यास उपयोगी पडले.

विश्वंभरची भूमिका देवीप्रसाद सोहोनी यांनी केली. एक हुशार डॉक्टर आणि वडिलांची काळजी घेणारा मुलगा त्यांनी रंगमंचावर आणला. त्यांच्या संवादाला आत्मविश्वासाची झालर होती. वासंतीची भूमिका कल्पना सावंत-नवले यांनी केली. त्यांचे हावभाव समर्पक वाटले.

वयोवृद्ध सदानंद यांची भूमिका प्रवीण कुलकर्णी यांनी केली. आपल्या वाट्याला आलेली भूमिका त्यांनी अनुभवाच्या जोरावर चांगली फुलविली. संवाद खणखणीत होते. वृद्ध व्यक्तीची लकबही त्यांनी चांगली केली. वामन हे पात्र डॉ. विजय जोशी यांनी रंगवले. दरोडेखोराच्या वेशात आलेला त्यांचा प्रसंग परिणामकारक वाटला.

आनंदम संस्थेचे विशाल लाहोटी या नाटकाचे सूत्रधार, तर केतन नवले निर्माता होते. डॉक्टरची रूम, बेडरूम व बगिचा असे नेपथ्य असणारे घर गौरवी नवले यांनी चांगले सजवले. संगीत श्रुती कुलकर्णी यांनी दिले. प्रसंगानुरूप त्यांनी दिलेले संगीत छान वाटले. प्रकाश योजना तेजस परसपाटकी व भारती लिमकर यांनी केली होती. शेवटच्या प्रसंगातील चंद्र-तार्‍यांचा प्रसंग भाव खाऊन गेला. रंगभूषेची जबाबदारी सुलभा कुलकर्णी यांनी केली. वासंतीला आणखी वृद्ध दाखवायला हवे होते. वेशभूषा अंजली महाजन यांनी केली.

रंगमंच व्यवस्था प्रसाद भणगे, सृषटी कुलकर्णी यांनी पाहिली. नाटकात संवादाचा भडीमार असला तरी नाटक कुठेच रेंगाळले नाही. दिग्दर्शिका नवले यांनी कथानकाला छानपैकी सादर केले. नाटकाचा विषय कलाकारांनी उत्तम सादरीकरणाने प्रेक्षकापर्यंत पोहोचला. प्रसंगानंतर होत असलेले काव्य निवेदनही उत्तम वाटले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या