संदीप जाधव | 9225320946
जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे. जोगतिणी या प्रथेतील लोकसंस्कृतीचे उपासक मानले जातात. जोगतिणी या देवदासी वर्गात मोडत असल्या तरी देवदासी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतरही ही प्रथा बंद झाली नाही. देवीला सोडलेल्या महिलेला गावात ना मान ना सन्मान. गावात तिची कायम हेळसांड होते. जोगवा मागून उदरनिर्वाह चालविते. गावातील अनेकांच्या वखवखलेल्या नजरांना तिला सामोरे जावे लागते. कुणाच्या तरी संबंधातून तिला होणारे अपत्यही त्याच नगरयातना भोगते. अशाच एका जोगतिणीच्या मुलीच्या जीवनावरील कहाणी राज्य नाट्य स्पर्धेत केडगावच्या कल्पद्रुम फाउंडेशनने सादर केलेल्या ‘अमाशी’ या नाटकात पाहायला मिळाले. सामाजिक कुप्रथांवर लिखाण करणार्या प्रा. डॉ. चं. वि. जोशी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन प्रदीप रासकर व विद्या जोशी यांनी केले. वास्तववादी लिखाणाला दिग्दर्शकांनी चांगल्या प्रकारे सादर केले. कायमच अवहेलना झेलणार्या जोगतिणीच्या मुलीसंदर्भात एक सकारात्मक संदेश या नाटकाने दिला. तांत्रिक बाजू व कलकारांचा अभिनय यामुळे कथानक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.
पडदा उघडताच वडाच्या झाडाखाली असलेल्या देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. दगडाचा पार, भिंती पाहून नाटक एका खेड्यातले असल्याचे लक्षात येते. त्याच गावात देवाला सोडलेली सुंदर जोगतिण चर्चेत असते. कुंभार, शिंपी, गुरव, भटजी हे सर्वचजण तिच्या मादकतेवर भाळतात. पुढे तिच्या कुणाच्या तरी संबंधातून मूल होते. ते मूल देवीसमोर ठेवून ती परागंदा होते. हे मूल गावचे पाटील सांभाळतात. अमावस्येला जन्मलेल्या त्या मुलीचे नाव अमाशी ठेवले जाते. देवीच्या जत्रेच्या वेळी अंगात देवी येत असलेली रखमी अनेक मागणी करत असते. मात्र, नंतर तिच्या अंगात देवी येऊनही ती काहीच मागत नाही. हा प्रकार म्हणजे गावावर येणार्या संकटाची नांदी असल्याचे गावकरी सांगतात. त्याच गावात दुष्काळ पडतो. जनावरे मृत्यूमुखी पडतात, पटकी आजार बळावतो. या संकटांना जोगतिणीची ती मुलगी ‘अमाशी’च जबाबदार असल्याचा आरोप गावकरी करतात. पण गावच्या पाटलांना हे मान्य नसते. तिला अमाशीचा लळा असतो. मात्र, गावकरी तिला संपविण्यासाठी कट आखतात. मग अंगात देवी आल्याची बतावणी करून नरबळी देण्याचे रखमा सांगते. त्यासाठी अमाशीचा बळी देण्याचे ठरते. गावकरी अमाशीचा बळी देतात असा भास त्याला होतो. मात्र, त्या अमाशीला वाचवून तिचा पुढेही सांभाळ करण्याचे पाटील ठरवतो. या गोट शेवटाने नाटकावर पडदा पडतो.
समाजात आजही अनेक कुप्रथा आहेत. देवीच्या नावाने सोडलेल्या जोगतिणीच्या संकल्पनेवर या नाटकाने परखडपणे भाष्य केले आहे. लेखक प्रा. चं. वि. जोशी यांची ही संहिता व त्याचे सादरीकरण चांगल्या प्रकारे झाले. पाटील ही भूमिका सागर खिस्ती यांनी केली. आत्मविश्वासू देहबोलीमुळे त्यांनी अनेक प्रसंग उठावदारपणे केले. भावनाविवशताही त्यांना छान जमली. निरपराध हा शब्द बोलताना मात्र ते अडखळले. त्यांची टोपी दोनच प्रसंगात डोक्यावर होती. अनेक प्रसंगांत ती तशीच खुंटीवर लटकली होती. अमाशीवर असणारे प्रेम त्यांच्या डोळ्यातून दिसत होते. शरीरयष्टीही पाटलाला शोभेल अशीच होती. आवाजातील चढउतार योग्य वाटले. पाटलीणीचे पात्र संध्या पावसे यांनी केले. सुस्पष्ट आवाजातील संवाद आणि त्याला लाभलेली हावभावांची जोड यामुळे त्यांचे पात्र खुलले. भिवा या गड्याचे पात्र अनिकेत जोशी यांनी चांगल्या रितीने साकारले. तात्या हे पात्र प्रदीप रासकर यांनी पार पाडले. विठाचे वर्णन करताना त्यांनी चांगले हातवारे केले.
देहबोलीही सकारात्मक वाटली. कृष्णा वामने यांनी भट साकारला. कावेेबाजपणाचा अभिनय त्यांनी चांगला केला. दामू हे पात्र अमोल तोडकर यांनी रंगविण्याचा चांगला प्रयत्न केला. गणपा हे पात्र साई चासकर यांनी केले. अपर्णा देशेट्टी यांनी उभी केलेली भिमाक्का हुबेहूब ग्रामीण वाटली. रखमी हे पात्र दिग्दर्शक विद्या जोशी यांनी केले. अंगात येण्याचा अभिनय त्यांनी उत्कृष्ट केला. कसलेला अभिनय त्यात दिसला. प्रशांत उबाळे यांनी उत्तम संबळ वाजविला, तर ओम गणगले याने गोंधळ्याची भूमिका उत्तम केली. सौंदर्यवान विठाला अश्विनी वसगडेकर यांनी चांगला न्याय दिला. मुरडण्याचा अभिनय उत्तम वाटला. अमाशी हे पात्र सायली नरवणे हिने उत्तमरित्या उभे केले. अबोल असूनही केवळ हावभावांच्या आधारे तिने या पात्राला उंचीवर नेऊन ठेवले. रडण्याचा, हसण्याचा व वेंधळेपणाचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला. याशिवाय रोहित डोंगरे (तरुण), प्रियांशू वसगडेकर (साहेबा) व स्मित रासकर (मुलगा) यांनीही प्रसंगांत साथ दिली.
संगीत संयोजनाची जबाबदारी विनायक पावसे यांच्याकडे होती. नाटकातील रहस्यमयता त्यांच्या संगीताने जाणवत होती. नेपथ्य अंजना मोरे यांचे होते. वडाचे झाड, देवी मूर्ती, पार, पाटलाचा वाडा समर्पक वाटले. रंगभूषा आणि वेशभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी सांभाळली. विठाचा मेकअप जास्त वाटला. पण अमाशी, भट, पाटील, पाटलीण यांची रंगभूषा उत्तम वाटली. दामू, गणपा, रखमी, भिमाक्का, पाटील यांची वेशभूषा भावली. मध्यंतर होताना रखमीच्या अंगातील साडी दुसरा अंक सुरू होताना मात्र बदलल्याचे दिसले! प्रकाश योजना गणेश लिमकर यांची होती. रंगीबेरंगी स्पॉटचा कल्पकतेने वापर केल्याने वातावरणनिर्मिती चांगली झाली. रंगमंच व्यवस्था गायत्री वामने यांनी सांभाळली. नाटकासाठी भिंगारच्या रूपेश पसपुल डान्स अँड फिटनेस स्टुडिओ व प्रा. सुनील राऊत यांचे सहकार्य लाभले. नाटकाच्या वास्तववादी संहितेला रंगमंचावर सादर करताना दिग्दर्शकांनी बारीकसारीक गोष्टींकडेही चांगले लक्ष देण्याचा प्रयत्न केला. प्रसंगांची जुळवाजुळवही चांगली वाटली. कलाकारांची मोठी फौज घेऊन सादर केलेले नाटक प्रेक्षकांना भावले, आवडले.