Tuesday, March 25, 2025
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : खसखस… खळखळ अन् धमाल 'आता कसं करू ?'

राज्य नाट्य स्पर्धा : खसखस… खळखळ अन् धमाल ‘आता कसं करू ?’

संदीप जाधव | 9225320946

आजकाल कर्मकांडात अडकणार्‍यांची संख्या वाढत चाललीय आहे. श्रद्धा आणि कर्मकांड या दोन वेगवेगळ्या बाबी. मात्र, आजही अनेकजण कर्मकांडालाच श्रद्धा समजण्याची गल्लत करतात. माणसात धार्मिकता जरूर असावी मात्र, हव्यासापायी कर्मकांडाच्या मार्गाला जाऊ नये असा संदेश देणारी ‘आता कसं करू’ ही कलाकृती रविवारी राज्य नाट्य स्पर्धेत रसिकांना पाहायला मिळाली. पूर्णपणे हास्य-विनोदाला वाहिलेल्या या नाटकाच्या उत्तरार्धात एक चांगला संदेश दिला.

- Advertisement -

अहिल्यानगरच्या नाट्य मल्हार प्रतिष्ठानने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक संदीप दंडवते आहेत. कलाकारांकडून त्यांची कला अलगदपणे काढून घेण्यात हातखंडा दंडवते यांच्यात आहे. नाटकातील पहिल्या प्रसंगापासूनच उडालेले हास्यतुषार उत्तरार्धातही खाली आले नाहीत. दमदार संहितेला मेहनती कलाकारांच्या साथीने रंगमंचावर उतरवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाल्याचे दिसले. यंदाच्या स्पर्धेत कधी नव्हे एवढी रसिकांची गर्दी सभागृहाने अनुभवली. जागा न मिळाल्याने अनेक प्रेक्षकांनी पायर्‍यांवर बसून नाटकाचा आस्वाद घेतला. मोबाईलचा त्रास इतरांना होऊ नये हे संदेश पडदा उघडण्यापूर्वीच देण्यात आला. नाटकाचे संपूर्ण कथानक नंदन या पात्राभोवती फिरते. नंदन या तरुणाची आई कमालीची धार्मिक असते. पती व मुलानेही धार्मिकच असावे हा तिचा आग्रह वजा हट्ट. आईच्या प्रत्येक शब्दाला ‘होय आई, बरं आई‘ असं म्हणणार्‍या नंदनमध्ये आईला देवत्व दिसते. त्याला संन्यास देण्याइतपर्यंत तिची इच्छा असते. मात्र, यात अडकण्याची नंदनची इच्छा नसते.

तरुण असणार्‍या नंदनला स्त्रीस्पर्शाची म्हणजेच लग्नाचा इच्छा होते. पण आईला सांगायचे कसे हा त्या पडलेला प्रश्न मित्र बॉबी सोडवितो. त्यासाठी दोघे मिळून योजना आखतात. त्यानुसार रात्री झोपेत वडिलांशीच लगट करण्याचा प्रयत्न चंदन करतो. नंंदनची ही सहन न झालेली कृती वडील आईसमोर मांडतात. मग आई चंदनच्या लग्नाला तयार होते. मुलगीही पाहिली जाते. लग्नही होते. मात्र पत्नी अनिताच्या स्पर्शासाठी उतावीळ झालेल्या नंदनसमोर नवीन अडचण समोर येते. पूजेचा मुहूर्त 21 दिवसांनंतर असतो. पती-पत्नी जवळ येऊ नये यासाठी आई तांदूळ या भाच्याला बोलावते. पूजेशिवाय पत्नीला स्पर्श करायला मिळणार नसल्याने नंदन-बॉबी नवी योजना आखतात. त्यानुसार स्वप्नात येऊन देवीने आपल्याला पत्नीसह दर्शनासाठी बोलावल्याची बतावणी करतो. त्यास सर्वजण तयार होतात. तिकडे दोघेही एकत्र येतात. आपल्याला देवीने दिलेला दृष्टांत हे ढोंग असल्याचे पत्नीला सांगतो.

दोघेही फिरून पुन्हा घरी येतात तेव्हा तर नवीनच अडचण समोर येते. नंदनच्या कुटुंबासह इतर अनेकजण नंदनला ‘स्वप्नाळू बाबा’ समजून देवत्व बहाल करतात. त्यामुळे पत्नीच्या स्पर्शापासून तो मुकतोे. पत्नीही नकार देते. बाबांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागते. त्यातच आपल्या वडिलांच्या आजारपणात झालेला फायदा बाबांमुळेच झाल्याचे सांगत स्वतः पत्रकार असल्याची ओळख लपवून आलेली निमिशा ही एक तरुणी बाबांची सात दिवस सेवा करण्याची इच्छा व्यक्त करते. स्पर्श करू न देण्याच्या निर्णयापासून पत्नीला परावृत्त करण्यासाठी निमिशाला स्पर्श करण्याचे ढोंग नंदन करतो. पण काहीच उपयोग होत नाही. सप्ताह सेवेच्या शेवटी निमिशा बाबांना दुग्धाभिषेक करणार असते. मात्र, आपल्या पतीला परस्त्रीने हात लावू नये असे पत्नी अनिताला वाटते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अनिता व नंदन स्वप्नातील दृष्टांत हे केवळ नाटक असल्याचे सांगतात. मग सर्वांना याचा उलगडा होतो. भावनाविवश झालेला चंदन कर्मकांड व श्रद्धा यांतील फरक सांगतो. मग आईला आपल्या चुकांचा पश्चात्ताप होऊन तिचे मनपरिवर्तन होते. शेवटी नंदनची मिलनाची इच्छा पूर्ण होेते. असे या नाटकाचे कथानक.

विषयाची मुद्देसूद मांडणी, कल्पकतेने मांडलेले बारकावे टिपत दंडवते यांनी लिहिलेल्या या संहितेला उत्कृष्टपणे सादर करण्यात कलाकारांचे जुळलेले योग्य टायमिंग कारणीभूत ठरले. प्रत्येक प्रसंगांने रसिकांना खळखळून हसवले. एक चांगला संदेशही नाटकाने दिला. आईची भूमिका श्वेता पारखे यांनी कसदारपणे केली. देवभोळी आई त्यांनी छान रंगवली. वडिलांची भूमिका राहुल सुराणा यांनी केली. त्यांच्या विनोदी संवादांना हावभावांची चांगली जोड मिळाली. नंदन हे पात्र अथर्व धर्माधिकारी यांनी साकारले. प्रसंगानुरूप हावभावांच्या छटांमध्ये कमालीची विविधता आणण्यात ते यशस्वी झाले. काही प्रसंगात त्यांचे आत्मविश्वासू विनोदी हावभाव अशोक सराफ यांच्याशी मिळतेजुळते वाटले. देहबोलीही उत्तम. बॉबी हे पात्र पवन पोटे यांनी पार पाडले. सलग व वेगवान संवादांनी त्यांनी नाटकात रंगत आणली. अनिता हे पात्र अंतरा वाडेकर यांनी निभावले. त्यांच्या वाट्याला संवादांपेक्षा हावभावच अधिक आले. ते त्यांनी योग्यप्रकारे केले. तांदूळ हे पात्र प्रदीप वाळके यांनी रंगमंचावर आत्मविश्वासाने आणले. विनोदी हावभाव व मिश्कील देहबोलीने विनोदाची कमालीची खसखस पिकविली. सर्वांत जास्त धमाल या पात्राने उडवून दिली. याबरोबरच संकेत आभाने, प्रमोद जगताप, अपूर्वा काळपुंड, पूजा जगदाळे, समर्थ जोशी, अनिकेत फुंदे, रोहीत पोफळे यांनी नाटकात आपापला वाटा उचलला.

प्रकाश योजना ऋतुराज दंडवते यांची होती. प्रसंगानुरूप त्यांनी योग्य लाईट्स दिले. भटजींच्या एका प्रसंगांत उशिराने लाईट लागली. स्पॉट उत्तम वाटले. प्रसंगानुरूप दणक्यात वाजलेले संगीत आशुतोष नेमसे यांचे होते. प्रभावी संगीतामुळे सिनेमा हॉलचा भास निर्माण झाला! नेपथ्य अंजना मोरे व प्रमोद जगताप यांचे होते. धार्मिकता दर्शविणारे देवांचे फोटो, बेडरूम, सुंदर. रंगभूषा रितेश डेंगळे यांची होती. धार्मिक आई, अनिता, तांदूळ यांची रंगभूषा चांगली वाटली. वेशभूषा गौरी देशपांडे यांनी सांभाळली. देवभोळी गृहिणी आई, नंदन, तांदूळ व अनिता यांची वेशभूषा आकर्षक व समर्पक वाटली. रंगमंच व्यवस्था समर्थ जोशी व संकेत आभाने यांनी पाहिली. ध्वनिमुद्रण ऋतुध्वज कुलकर्णी यांचे होते. दमदार संहिताला दिग्दर्शक दंडवते यांनी कलाकारांच्या साथीने बहारदारपणे सादर केले. कलाकारांनी रसिकांना मनोमन हसवले. बाबा-बुवांच्या अनाठायी वाढत असलेल्या प्रस्थावर अचूकपण बोटही या नाटकाने ठेवले. नंदन व तांदूळ या दोघांची भूमिका लक्षवेधी ठरली. स्पर्धेत सादर झालेले सर्वांत विनोदी नाटक असे या प्रयोगाबाबत म्हणावे लागेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...