संदीप जाधव | 9225320946
आई-वडील आपल्या मुलांचे चांगले संगोपन करतात. त्यांनी कायम सुखात राहावे यासाठी अनेक कष्ट झेलतात. त्यांना शिकवतात, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी खंबीरपणे मागे उभे राहतात. आई-वडिलांच्या जीवावर मोठी झालेली ही मुले नोकरी-लग्नानंतर मात्र पुरती बदलून जातात. मुलांच्या मायेला, प्रेमाला मुकलेल्या आई-वडिलांची अवस्था तुटलेल्या पतंगासारखी होऊन जाते. अशाच एका कुटुंबाची कहाणी दर्शविणारे नाटक मंगळवारी (10 डिसेंबर) राज्य नाट्य स्पर्धेत ‘बसं इतकंच…’ या नाटकात पाहायला मिळाले.
श्रीरामपूरच्या कर्णेज अॅकेडमीने सादर केलेले हे दोन अंकी नाटक डॉ. दिनेश कदम यांनी लिहिले आहे. सध्या बहुतेक घरांना भेडसावणार्या समस्येवर परखडपणे बोट ठेवणार्या या नाटकाचे दिग्दर्शन प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर व डॉ. वृषाली भुजबळ-वाघुंडे यांनी केले. आई-वडील आपल्या मुलांमध्येच सुख पाहतात. मात्र, लग्नानंतर याच मुलांना आपले आई-वडील ‘डस्टबीन’ वाटायला लागतात. घुसमट होणार्या ज्येष्ठ मंडळींची हतबलता व त्यांना होणार्या मानसिक वेदना हा गंभीर विषय या नाटकाने प्रेक्षकांसमोर भावूकतेने मांडला. अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. काही चुका मात्र टाळता आल्या असत्या.
पडदा उघडताच एक स्त्री आपले स्वगत मांडते. आपली मुले कशी असतील, ते आपल्याला कधीही दुःखी करणार नाही, कायम प्रेम देतील, सांभाळतील अशी आशा व्यक्त करते. या सर्व अपेक्षा पूर्ण होतात की नाही याचे चित्रण नाटकात पाहायला मिळते. आण्णा-माई हे वृद्धत्वाकडे झुकलेले दाम्पत्य. त्यांना दोन मुले. दिनू थोरला, तर श्याम धाकटा. मनिषा ही दिनूची पत्नी. अपघातामुळे अधू झालेली माई यातना सहन करत असते. वडिलांनी दिनूला किराणा दुकान दिलेले असते.
मनिषाच्या माहेरच्यांनी दुकान विस्तारासाठी मदत केलेली असते. दिनू व मनिषाचे आण्णा-माईशी कायम वाद होत असतात. दिनूला दुकान दिल्याचे सांगून आण्णा व सांभाळ करत असल्याचे सांगून दिनू उपकाराची भाषा करतो. धाकटा मुलगा श्याम संसार व नोकरीत मश्गूल झालेला. बदलत्या परिस्थितीनुसार आण्णा-माईंना दुसरीकडे राहायला जावे लागते. तिथे त्यांना काळजी करणारा अनाथ सदाशिव भेटतो. इकडे दिनू व मनिषाचा आण्णांच्या गावाकडच्या जमिनीवर डोळा असतो. ती विकावी म्हणून दोघेही आण्णांसमोर तगादा लावतात. पण आण्णा-माईंचा विरोध असतो. त्यामुळे दिनू आई-वडिलांबरोबरचे नाते तोडतो. आधीच खंगलेल्या माई मरणाची इच्छा व्यक्त करतात. या मरणयातना सहन न झाल्याने आण्णा माईचे जीवन संपवतात व स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करतात. हा खून नसून माईला मुक्ती दिल्याचे आण्णा कोर्टात सांगतात. कोर्टातील हा प्रसंग प्रेक्षकांना कमालीचा भावूक करतो. या वेळी आण्णांच्या संवादात वृद्ध आई-वडिलांची व्यथा, व्यवस्थेतील भ्रष्टाचार यावर नेमकेपणे बोट ठेवले जाते. मालकीची जमीन सरकारने जमा करून त्याजागी मुलींची शाळा उभारावी व त्या शाळेला पत्नी पार्वतीचे नाव द्यावी ही माफक इच्छा अण्णा कोर्टाला करतात. डोळ्यात अंजन घालणार्या शेवटाने नाटकाचा पडदा पडतो.
डॉ. दिनेश कदम यांच्या भावनिक संहितेला ठळकपणे सादर करताना दिग्दर्शकांना कलाकारांनी चांगली साथ दिली. काही त्रुटीही जाणवल्या. नाटकातील श्याम हे पात्र एका प्रसंगांत केवळ आवाजाद्वारे दर्शविण्यात आले. या पात्राचा एखादा तरी प्रवेश दाखवायला हवा होता. प्रवेश संपतावेळी लाईट पूर्णपणे बंद होण्यापूर्वीच पात्रांची हालचाल खटकली. आण्णा हे पात्र प्रा. अशोक कर्णे यांनी उभे केले. त्यांचे संवाद व हास्य अगदी नैसर्गिक वाटले. त्यांची निराश देहबोलीही प्रसंगानुसार होती. त्यांच्या भूमिकेत चांगला आत्मविश्वास दिसला. एका प्रसांगत गोळ्या कुठे ठेवल्या हेच त्यांना समजले नाही. शेवटच्या प्रसंगांत दोनदा पॉज घेतल्याने ते संवाद विसरले की काय असे प्रेक्षकांना वाटले. पण त्यांच्या व्याकूळ हावभावांनी प्रेक्षकांना विचार करायला लावले. माई हे पात्र आकांक्षा गर्जे यांनी रंगवले. स्वगताच्या प्रसंगांत त्यांनी केलेला अभिनय प्रभावी ठरला. नंतर आजारपणातील यातना सहन करताना चेहर्यावरील करूण व चिंतातूर हावभाव भावले. त्यांच्या रडवेल्या संवादांनी अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आणले. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला.
दिनू हे पात्र गणेश करडे यांनी केले. संवाद स्पष्ट असले तरी आवाजातील चढउतार आणखी असायला हवे होते. आई-वडिलांना ओरडताना मात्र त्यांचा अभिनय हुबेहूब वाटला. मनिषा हे पात्र काजोल गायकवाड यांनी साकारले. सासू-सासर्यांवर ओरडणारी व कावेबाजपणे पतीचे कान भरणारी सून त्यांनी दर्शविली. मोठ्या आवाजातील संवादांनी त्यांनी सभागृह दणाणून सोडले. त्यांचा हा अभिनय पाहून अनेकांना आपली सून आठवली असेल…! सदाशिव हे पात्र अक्षय खंडागळे यांनी पेलले. वेगवान हातवारे करून त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. गावराण ढंगाच्या संवादात ‘अगतिकता’ हा शब्द मात्र खटकला. श्याम हा तर दिसलाच नाहीे.
अॅड. प्रसन्न बिंगी निर्मितीप्रमुख असलेल्या या नाटकाची प्रकाश योजना नवनाथ कर्डिले व प्रकाश ढोणे यांनी पाहिली. माईच्या स्वगताचा व आण्णांचा कोर्टातील प्रसंग चांगला वाटला. संगीत देण्याची जबाबदारी मयूर वाकचौरे व किरण उबाळे यांच्याकडे होती. अनेक प्रसंगांत भावूकता दर्शविण्यासाठी त्यांनी समर्पक संगीत दिले. नेपथ्य प्रा. अशोक कर्णे व संदीप कदम यांचे होते. बेड व खिडक्या याशिवाय नेपथ्याला काही वाव नव्हता. रंगभूषा सुनीता कर्णे यांची होती. माईची रंगभूषा समर्पक वाटली. वेशभूषा आर्वी व्ही. आर. व सौरभ संकपाळ यांनी पाहिली. रंगमंच व्यवस्था राहुल वाघुंडे, अर्जून तिरमखे व प्रतीक मोढे यांनी सांभाळली. या सर्वांना अजय घोगरे यांनी मार्गदर्शन केले. नाटकाचा गंभीर विषय मांडताना दिग्दर्शकांनी मेहनत घेतल्याचे दिसले. मात्र, नाटक आणखी प्रभावीपणे सादर करताना कलाकारांकडून आणखी तयारी करून घ्यायला हवी होती. नाटकाचा विषय मात्र सहजपणे प्रेक्षकांना कळला आणि त्यांना विचारही करायला लावले हे मात्र खरे.