संदीप जाधव | 9225320946
अनेकजण आपल्या साहित्यिक छंदाने झपाटलेले असतात. मात्र, प्रतिकूल परिस्थिती आणि जबाबदारीचे ओझे याखाली अनेकांना आपले छंद अर्धवट सोडावे लागतात. अशाच एका नाट्यलेखकाची झालेली घुसमट राज्य नाट्य स्पर्धेत मंगळवारी सादर झालेल्या ‘दुसरा अंक’ या नाटकात पाहायला मिळाली. घोडेगावच्या समर्थ युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक रविशंकर झिंगरे आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन संदीप येळवंडे यांनी केले. गंभीर आणि वास्तववादी विषयाला वाहिलेल्या या नाटकाने अनेकदा रसिकांना गंभीर केले.
पूर्वी नाट्यलेखनात प्रसिद्ध असलेल्या उल्हास कोळी या वृद्ध कलाकाराला भेटण्यासाठी दोनजण येतात. गावात नाट्य संमेलन होणार असल्याने त्यासाठी काढण्यात येणार्या स्मरणिकेत कोळी यांची मुलाखत या तरुणांना हवी असते. मात्र, अनुभवांनी खचलेल्या कोळींना आपले तरुणपण आठवते आणि नाटक फ्लॅशबॅकमध्ये जाते. उल्हास हा बँकेतील नोकरी सांभाळून नाट्यलेखनही करत असतो. अशाच एका नाटकाचे पहिला अंक तो लिहितो. मात्र, दुसरा अंक लिहिण्यात त्याला अनेक अडचणी येतात. नेत्रा ही त्याची पत्नी. त्यांना मूलबाळ होणार नसते. त्यामुळे पतीने लिहिलेल्या नाटकांनाच ती आपली बाळ मानते. पुढे नेत्राचे आजारपण व बँकेची सुटलेली नोकरी या दुहेरी संकटात उल्हास सापडतो. नेत्राच्या उपचारासाठी हवे असलेली रक्कम आणायची कुठून या विवंचनेत सापडलेल्या उल्हासला त्याचा मित्र नाथा एक मार्ग दाखवतो. उथळ मालिकांसाठी लिखाण करण्याचे सूचवतो.
सुरुवातीला नकार तो नकार देतो मात्र पैशाच्या अपरिहार्यतेमुळे ते काम स्विकारतो. दरम्यान, त्याचा दुसरा मित्र जयराम हा मात्र त्याच्या या लिखाणाने नाराज होतो. उल्हासच्या पहिल्या अंकाचा उत्तरार्ध कधी पूर्ण होईल याची वाट पाहत असलेली नेत्रा आजारपणामुळे प्राण सोडते. तिच्या जाण्यामुळे व्यथित झालेला उल्हास दारुच्या आहारी जातो. पैसा भरपूर मिळतो. मात्र, नाटकापासून दूर जात असल्याची खंत आणि नेत्राचे रितेपण यामुळे उल्हास आणखी व्यथित होतो. नेत्राच्या इच्छापूर्तीसाठी दुसरा अंक लिहिण्याचे ठरवतो. मात्र, पहिला अंक मित्र नाथाने आधीच एका संस्थेला विकलेला असतो. उल्हास दुःखी होतो. फ्लॅशबॅकमधून नाटक पुन्हा मूळ प्रसंगात येते. वृद्धावस्थेतील उल्हास आठवणींमुळे व्याकूळ होतो आणि प्राण सोडतो. असे या नाटकाचे कथानक.
दिग्दर्शन करताना नाटकात मध्यवर्ती भूमिका करणार्या संदीप येळवंडे यांनी नाटकात अनेकदा उत्सूकता निर्माण केली. प्रसंगांची जुळवाजुळवही चांगली जमली. अलांकारिक शब्दांमुळे काही संवाद कृत्रिम वाटले. कथानक व्यवस्थितपणे फ्लॅशबॅकमध्ये आणण्यात व पुन्हा मूळ प्रसंगात नेण्यात दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगला वाटला. पण संवादावर आणखी काम करायला हवे होते. वृद्ध उल्हास कोळी सुरेश चौधरी यांनी रंगमंचावर आणला. त्यांचे हावभाव अतिगभीर होते. नाटकात त्यांची छोटी भूमिका त्यांनी व्यवस्थित केली. तरुणपणातील उल्हासला संदीप येळवंडे यांनी रंगविले. भावनाविवश, व्यथित, चिंतातूर आदी हावभाव त्यांच्या चेहर्यावर पहिल्यापासूनच दिसले. त्यांची देहबोलीही प्रसंगानुरूप होती. मात्र, काही प्रसंगातील त्यांचे संवाद अनैसर्गिक वाटले. नशेत झिंगलेला अभिनय त्यांना छान जमला. प्रशांत जाधव व विश्वजीत जोशी या तरुणांची भूमिका आदिनाथ बडे व राज वैरागर यांनी केली. वाट्याला आलेली छोटी भूमिका त्यांनी उत्तम निभावली. नेत्रा हे पात्र डॉ. भावना रणशूर यांनी केले. त्यांच्या स्पष्ट संवादांना उत्तम अभिनयाची जोड मिळाली. नाटकात असलेले एकमेव स्त्रीपात्र त्यांनी सहजपणे वठवले. त्यांची भूमिका कमालीची परिपक्व वाटली.
नाथा ही भूमिका मोहन औटी यांनी केली. त्यांना संवादावर आणखी भर देता आला असता. मात्र त्यांची देहबोली सकारात्मक, आत्मविश्वासू होती. जयराम हे पात्र योगेश रासने यांनी पार पाडले. नाट्यप्रेमी असलेला जयराम एका प्रसंगात संवाद विसरल्याचे जाणवले. मात्र नंतरची भूमिका त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली. नेपथ्याची जबाबदारी राजेंद्र पाटोळा यांच्याकडे होती. कोळी यांचे सुखवस्तू घरातील वस्तू, खिडकीबाहेरील बगिचा अधिक भावला. मात्र, फ्लॅशबॅकमधील प्रसंग आणि मूळ प्रसंग यातील नेपथ्यात बदल करता आला असता. प्रकाश योजना निरज लिमकर यांची उत्तमपणे सांभाळली. नेत्रा-उल्हासचा बागेतील प्रसंगाच्या वेळी दिलेले लाईट भाव खाऊन गेले. वेळोवेळी त्यांनी छान स्पॉट दिले. संगीत विशाल बोरूडे यांनी दिले. तरुण उल्हासच्या काही प्रसंगात दिलेले करुण संगीत चांगले वाटले. पहिल्याच प्रसंगात संगीताची उणीव जाणवली.
रंगभूषा स्नेहल सैंदाणे यांची होती. वृद्ध उल्हास व नेत्राची रंगभूषा आवडली. मात्र आजारपणातील नेत्रा दर्शविताना काळजी घेता आली असती. वेशभूषा डॉ. सुनील वैरागर व संतोष इखे यांच्याकडे होती. वृद्ध व तरुण उल्हास यांचा पोषाख, नेत्राच्या साड्या अनेक प्रसंगात शोभून दिसल्या. नाथाचीही वेशभूषा समर्पक. दोन-तीन प्रसंगात तरुण उल्हासचा एकच पोशाख होता. रंगमंच व्यवस्था तुकाराम गवळी, प्रवीण अरण, ओमकार आढागळे, सागर जाधव, विष्णू कुल्हाडे यांनी पाहिली. नेत्रा-उल्हासचा बागेतील प्रसंग कुड्यांमुळे बहरला. नाटकाचे सूत्रधार बहिरूनाथ वाघ व डॉ. दिव्या पाटील होते.
व्यथित व गंभीर नाटकाला सादर करताना दिग्दर्शक येळवंडे यांनी स्वतःच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. अलंकारिक संवादामुळे अभिनयाकडे जरासे दुर्लक्ष झाल्याचे वाटले. पण नाटकातील गंभीर विषयाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवले. नाटकाचा विषय प्रेक्षकांना सहजपणे उमगला हे त्यांचे दिग्दर्शकाचे यश. काही चुकाही झाल्या. नेत्राच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतरही तिच्या बेडवरचे ब्लँकेट, ग्लास तसाच होता. स्वतःच्या भूमिकेसोबतच इतर कलाकारांच्या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेले कष्ट दुर्लक्षून चालणार नाही.