संदीप जाधव | 9225320946
सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावरत असताना अनेकजण सामाजिक मूल्ये जपतात. पूर्वी हे प्रमाण जास्त होते. या मूल्यांच्या जोपासणेमुळे समाजात मिळालेली प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतलेले निर्णय कधीकधी अंगलटही येतात. अशाच एका राजकीय नेत्याने घेतलेल्या निर्णयाचे त्याच्या कुटुंबावर प्रतिकूल परिणाम होतात हे दर्शविणारे ‘कन्यादान’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी पाहायला मिळाले. येथील नाट्य आराधना संस्थेने सादर केलेल्या या नाट्यकृतीचे लेखक विजय तेंडुलकर आहेत. नाटकाचे दिग्दर्शन अनंत जोशी यांनी केले.
साधारण 1970च्या दशकातील कथानक असलेल्या या भावनिक नाटकाला दिग्दर्शक जोशी यांनी कलाकारांच्या साथीने फुलविण्याचा चांगला प्रयत्न केला. नाथ व सेवा देवळालीकर हे सामाजिक-राजकीय क्षेत्रात वावरणारे दाम्पत्य. समाजवादाचा पगडा असलेल्या नाथ-सेवा यांचे प्रेमविवाह झालेला. ज्योती व जयप्रकाश ही त्यांची दोन अपत्ये. अल्पावधीतच प्रेम जडलेल्या अरुण या दलित युवकाशी लग्न करण्याचे ज्योती ठरविते. याबाबत घरी सांगितल्यानंतर आई सेवा काळजीत पडते. मात्र, वडील नाथ यांचा या लग्नाला विरोध नसतो. लग्नापूर्वी घरी आलेल्या अरुणच्या स्वभावातील क्रूरता ज्योती अनुभवते. मात्र, त्याला दिलेला लग्नाचा शब्द व नंतर त्याच्या वागणुकीत बदल होईल या आश्वासकतेवर ज्योतीचा विवाह अरुणशी होतो. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ज्योतीचा छळ सुरू होतो. पोटात बाळ असूनही अरुण ज्योतीला मारहाण करतो. अरुणच्या या विकृती वागणुकीवर ज्योतीचे कुटुंबीय व्यथित होतात.
पण ज्योती अरुसोबतच राहण्याचे ठरवते. पुढे अरुणने लिहिलेल्या आत्मचरित्रावरील चर्चासत्रात बोलण्यासाठी नाथ यांना निमंत्रण येते. प्रथम हे निमंत्रण नाकारणारा नाथ नंतर मात्र आपल्या मुलीला त्रास नको म्हणून निमंत्रण स्वीकारतो. कार्यक्रमात भरभरून अरुणची स्तुती करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेली ज्योती नंतर घरी येऊन याबाबत वडिलांना जाब विचारते. सामाजिक मूल्य जपण्यासाठी दलित अरुणशी आपल्या मुलीचा विवाह आनंदाने लावून देणार्या नाथला ज्योती सुनावते. स्वतःच्या आयुष्याच्या नुकसानीबाबत ज्योती वडिलांनाच दोषी धरते. चुकीच्या निर्णयाचे कन्यादान केल्याचा पश्चात्ताप नाथला होतो आणि नाटकाचा पडदा पडतो. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या या नाटकात अनेक बाबी अधोरेखित केल्या गेल्या. दिग्दर्शक जोशी यांनी सादर केलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना विचारात पाडले. अनेक प्रसंगांना प्रेक्षकांनी टाळ्या दिल्या. काही हलके-फुलके विनोदही घडले. कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचला.
नाथ देवळालीकर ही भूमिका श्रेणिक शिंगवी यांनी केली. त्यांच्या प्रगल्भ अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. धीरगंभीर हावभाव व मिश्कील संवादांमुळे त्यांनी आपले पात्र फुलविले. शेवटच्या प्रसंगांतील व्याकूळता अगदी नैसर्गिक वाटली. सेवा देवळालीकर हे पात्र तेजा पाठक यांनी निभावले. ज्योती देवळालीकर हे मध्यवर्ती पात्र सिद्धी कुलकर्णी यांनी मोठ्या आत्मविश्वासाने रंगवले. प्रसंगानुरूप साकारलेले हावभाव व आवाजातील चढउतार यामुळे तिचा अभिनय कसलेला वाटला. तिचा देहबोलीही कमालीची सकारात्मक होती. ज्योती या पात्रात तिने चांगलाच रंग भरला. शेवटच्या प्रसंगांत तिच्या व्यथित संवादांनी अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. जयप्रकाश देवळालीकर हे पात्र मोहित मेहेर यांच्या वाट्याला आले. उच्चार स्पष्ट असले तरी आवाजात आणखी चढउतार असायला हवे होते. गंभीर हावभाव त्यांना छान जमले.
अरुण आठवले हे पात्र तेजस अतितकर यांनी रंगमंचावर आणले. हावभावावरूनच विकृत अरुणच्या स्वभावाची कल्पना प्रेक्षकांना आली. बेरकी भाषा आणि असंस्कृत शब्दांचा मारा असलेल्या संवादांना योग्य हावभावाची साथ मिळाली. कविता सादर करतानाचा प्रेमळपणा व दारूच्या नशेत विकृत वागणारा हे दोन्ही अभिनय त्याने उत्तमपणे साकारले. वामनराव नेऊरगावकर हे छोटे पात्र घेऊन प्रसाद भणगे, तसेच हंबीरराव कांबळ्यांच्या रूपात अनंत रिसे एकाच प्रसंगात रंगमंचावर आले. वाट्याला आलेली छोटी भूमिका त्यांनी पार पाडली. नेपथ्य अनंत रिसे यांचे होते. जुनाट तांब्याची भांडी, टेलिफोन या बाबी कालदर्शक होत्या. अरुण-ज्योतीची खोलीही चांगली वाटली. प्रकाश योजना गणेश लिमकर यांची होती. अनेक प्रसंगांत त्यांनी केलेली प्रकाश योजना प्रभावी ठरली. स्पॉटही उत्तम दिले. पार्श्वसंगीत शितल देशमुख यांचे होते.
सुरुवातीपासूनच दिलेले संगीत नाटकाच्या रहस्यमता व गंभीरता दर्शवित होते. एका प्रसंगात मात्र चुकून दुसरे संगीत लागले गेले. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांची होती. ज्योतीची रंगभूषा समर्पक होती. वेषभूषा मैथिली जोशी यांनी सांभाळली. सेवाच्या साड्या, वामनराव नेऊगावकर व हंबीरराव कांबळे यांची वेषभूषा उत्तम वाटली. रंगमंच व्यवस्था राजा देशमुख, विराज अडगटला, महादेव गाडे, अनिल जोशी यांनी पाहिली. समीर पाठक, शशिकांत नजन हे नाटकाचे सूत्रधार होते. पहिल्या अंकात संथ वाटणार्या नाटकाने नंतर पकड घेतली. कलाकारांच्या अभिनयामुळे नाटकाच्या विषयातील गंभीरता शेवटपर्यंत टिकून होती. या नाटकामुळे आता स्पर्धेत चुरस वाढण्यास सुरुवात झाली आहे.