Tuesday, March 25, 2025
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : मानवतेचे ‘मर्म’ भावले

राज्य नाट्य स्पर्धा : मानवतेचे ‘मर्म’ भावले

संदीप जाधव | 9225320946

जातीयवाद, धर्मवाद याने बरबरटलेली सामाजिक स्थिती राष्ट्राला घातक असते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी मानवतावाद हाच एक शाश्वत मार्ग आहे. कोणत्याच धर्माची मूल्ये नकारात्मक नसतात, असा सामाजिक संदेश ठळकपणे देणारी ‘मर्म’ नाट्यकृती बुधवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाली. वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील रंगमुद्रा युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या या सामाजिक नाटकाचे लेखन प्रा. रवींद्र काळे यांनी केले. देशाच्या अखंडतेला मारक असलेल्या धर्मवादावर बोट ठेेवणार्‍या या नाटकाने भरभरून टाळ्या घेतल्या. प्रा. काळे व रियाज पठाण यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना सतीश लोटके यांनी मार्गदर्शन केले. नाटकातील मध्यवर्ती भूमिकाही प्रा. काळे यांनी केली.

- Advertisement -

मानव हा या नाटकाचा केंद्रबिंदू. कला, साहित्य व सामाजिक कार्यासाठी जीवन झोकून दिलेल्या मानवला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागते. प्रा. गगन व भूमी हे त्यांचे विद्यार्थी. अ‍ॅड. सन्मित्र हा मानवचा मित्र वजा कायदेशीर सल्लागार. तरुणवयात प्रेमभंग झाल्यामुळे अविवाहित राहिलेला मानव शोषित महिला, अत्याचार यांच्या विरोधात आवाज उठवतो. वेश्या वस्तीत जाऊन महिलांचे प्रश्न समजावून घेत असतो. एका मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याचे समजताच मानव पुढाकार घेऊन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करतो. आरोपी पकडले जातात. ते तिघेही आरोपी वेगवेगळ्या धर्माचे असतात. धर्मकार्य करणार्‍या या आरोपींना सोडविण्यासाठी तक्रार घ्यावी म्हणून त्या आरोपींचे म्होरके मानवला धमकावतात.

पण त्या म्होरक्यांना त्यांच्या धर्माचे मर्म पटवून देण्याचा प्रयत्न मानव करतो. गुन्हेगार ही एक वृत्ती असते, तिला जात, धर्म नसतो हे समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना ते मान्य नसते. घरी आलेल्या त्या पीडित मुलीला (माणुसकी) व तिच्या वडिलांना मानव धीर देतो. नंतर न्यायालय या तिनही आरोपींना शिक्षा देऊन माणुसकीला न्याय मिळतो. असे नाटकाचे कथानक. दिग्दर्शक व नाटकातील पात्र या दुहेरी भूमिका प्रा. काळे यांनी खणखणीत वाजविले. मानव ही मध्यवर्ती भूमिका प्रा. काळे यांनी केले. आत्मविश्वासू देहबोली व आवाजातील योग्य चढउतार हे त्यांच्या अभिनय वैशिष्ट्यांमुळे त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. नाटकाचा पहिल्याच प्रसंगाने त्यांनी नाटकास बहारदारपणे सुरुवात केली. त्यांचा परिपक्व अभिनयाने प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या.

प्रा. गगन हे पात्र अ‍ॅड. माधव भारदे यांनी केले. वाट्याला आलेली भूमिका त्यांनी पार पाडली. एका प्रसंगात त्यांच्या चेहर्‍यावरील करूण भाव खूपच भावले. भूमी हे पात्र शुभदा पटवर्धन यांनी वठवले. त्यांनी केलेले नृत्य भाव खाऊन गेले. अभिनयही उत्तम. अ‍ॅड. सन्मित्र ही भूमिका रियाज पठाण यांनी केली. तेही या नाटकाचे दिग्दर्शक. आपली भूमिका त्यांनी ठामपणे उभी केली. रॉबर्ट ही भूमिका जयदेव हेंद्रे यांनी केली. त्यांच्या डोळ्यांचा अभिनय विशेष आवडला. अब्बासला मंगेश शिदोरे यांनी उभे केले. रघु हे पात्र महेश काळे यांनी रंगविले. आपल्या दमदार संवादांनी त्यांनी गुंडाला रंगमंचावर आणले. त्यांच्या अभिनयात कमालीचा आत्मविश्वास होता. ही भूमिका त्यांनी सहज पार पाडली. माणुसकी हे पात्र हर्षदा वाघमारे यांनी केल. रडण्याचा व भेदरलेला अभिनय त्यांनी छानपैकी केला. वडीलांची भूमिका राजकुमार मोरे यांनी व्यवस्थितपणे पार पाडली. त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव नैसर्गिक वाटले.

नेपथ्य उमेश गोसावी व परवीन पठाण यांचे होते. सोफा, पुस्तकांचे कपाट, भिंतीवरील सूचक चित्रे सुंदर. गॅलरीतून दिसणार्‍या दृश्यावरून ते घर फ्लॅट असल्याचा अंदाज येत होता. प्रकाश योजना गणेश लिमकर यांची होती. रंगीबेरंगी स्पॉटमुळे प्रसंग परिणामकारक झाले. मानव विविध धर्माविषयी बोलतो तेव्हा भिंतीवरील हातातील हृदय या चित्रावर स्पॉट कल्पकतेने टाकला गेला. एका फेडआऊटमध्ये चुकून लाईट सुरू झाल्याने कलाकारांत चलबिचल झाली. फॉगचा वापर केलेला वापर काही प्रसंगांत अनावश्यक वाटला. संगीत वेदश्री देशमुख व प्रा. आदेश चव्हाण यांचे होते. त्यांनी दिलेल्या संगीतामुळे प्रसंग प्रभावी वाटले. मानव कविता व गझल म्हणताना दिलेले पार्श्वसंगीत समर्पक वाटले.

रंगभूषा सोहम सैंदाणे यांनी सांभाळली. मानव, रॉबर्ट, अब्बास यांची रंगभूषा उत्तम होती. वेषभूषा अविनाश डोंगरे, बाबासाहेब डोंगरे यांच्याकडे होती. मानवचा कुर्ता व जॅकेट चांगला वाटला. मात्र, एका प्रसंगांत मानवने जॅकेट उलटे घातले. अब्बासचाही पोषाख चांगला वाटला. नाटकासाठी प्रा. आदेश चव्हाण यांनी समधूर गायन सादर केले. ते प्रेक्षकांना भावले.
नाटकापूर्वी राष्ट्रगीत झाले. मानवतेचे ‘मर्म’ हा सामाजिक विषय ठळकपणे समजावून सांगण्यासाठी केलेले सादरीकरण प्रेक्षकांना भावले. यासाठी दिग्दर्शक प्रा. रवींद्र काळे व रियाज पठाण यांनी मोठी मेहनत घेतल्याचे दिसले. नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचला. पहिल्या अंकात मानवच्या कार्याबाबतचे गूढ जसे भूमी व गगनला वाटले, तसेच ते प्रेक्षकांना वाटले. त्याची उत्सुकता नाटकाने ताणली. नाटकात प्रभावीपणे सादर झालेल्या अनेक प्रसंगांनी भरभरून टाळ्या घेतल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...