Tuesday, March 25, 2025
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : ‘प्रियंका आणि दोन चोर’

राज्य नाट्य स्पर्धा : ‘प्रियंका आणि दोन चोर’

संदीप जाधव | 9225320946

समाजातील प्रत्येक घटकांच्या मानसिकतेत भिन्नता असते. प्रत्येकाच्या अपेक्षाही वेगवेगळ्या असतात. मात्र या सर्व अपेक्षा पूर्ण होतीलच असे नाही. जशी परिस्थिती तशी त्यांची स्वप्ने. या इच्छा-अपेक्षा पूर्ण होण्यापासून नियती अटकाव करते. मनुष्य स्वभावातील विसंगतीवर बोट ठेवून समाजातील भिन्न वर्गातील मानसिकता दर्शविण्याचा प्रयत्न करणारी ‘प्रियांका आणि दोन चोर’ ही नाट्यकृती राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी पाहायला मिळाली.

- Advertisement -

विशिष्ट लेखनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्याम मनोहर यांनी लिहिलेल्या या नाटकाचे सादरीकरण अहिल्यानगरच्या स्व. गिरीधारीलाल चौधरी अभिनव ग्राम प्रबोधिनीने यांनी केले. मानशास्त्रीय विसंगतीवर आधारित असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन कृष्णा वाळके यांनी केले. प्रत्येक वेळी वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन राज्य नाट्य स्पर्धेत उतरणार्‍या वाळके यांनी या वेळी वैचारिक मानसिकतेवर आधारित नाटक करण्याचे धाडस केले. विना ‘फेडआऊट’ सादरीकरण हे या नाटकाचे वैशिष्ट्य. पात्रांनी केलेले अभिनय आपापल्या परीने चांगला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाटकात असलेला गंभीर आशय ठळकपणे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही.

श्रीमंत लोकांच्या घरकामं करणारी प्रियंका ही मोलकरीण. काम चालू असलेल्या इमारतीच्या चौकादाराची पत्नी. तिने काही रकमेच्या मोबदल्यात दोन चोरांना इमारतीच्या टेरेसवर आश्रय दिलेला असतो. केवळ आठवड्याभराचा किराणा भरला म्हणून आनंदून गेेलेल्या प्रियंकाची स्वप्न मोठी नाहीतच. मोलकरीण असलेली प्रियंका श्रीमंत मालकिणींच्या अपेक्षा आणि मानसिकतेवर बोट ठेवते. त्यांचे संवाद चोरांना ऐकवते. इकडे चोरांच्याही अपेक्षा फार मोठ्या नाहीत. एक चोर सोन्याची चेन मिळाली नाही म्हणून खिन्न असतो, तर पैशांअभावी साध्या गरजाही पूर्ण करता न आल्याबद्दल दुसरा चोर नियतीला दोष देत असतो. चोरांच्या मनात आलेले वाईट विचार प्रियांकाला आनंदी पाहून विरून जातात. चोरांच्या संवादातून भ्रष्टाचार, अत्याचार, हिंसाचार, कुपोषण सामाजिक, राजकीय दोषांवरही चर्चा होते. स्वप्नांची पूर्ती होत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेली प्रियंका झोपेच्या गोळ्या खावून आयुष्य संपवते. हे पाहून दुःखी झालेले चोर सैरभैर होतात. असे या नाटकाचे कथानक.

फेडआऊट नसलेलं हे नाटक दिग्दर्शक वाळके यांनी सादर केलं. तीनच पात्र असल्याने त्यांच्यातील संवादांत एकसुरीपणा आला. नाटकाने शेवटपर्यंत वेग घेतला नाही. भिन्न वर्गातील मानसिकतेवर आधारित असलेल्या गंभीर आशयावर विना फेडआऊट नाटक सादरीकरणाचे मात्र कौतूकच करावे लागेल. पण काहीतरी ट्विस्ट येईल अशी अपेक्षा रसिकांना होती. मात्र, दिग्दर्शनाबरोबरच चोराची भूमिका करत असलेल्या वाळकेंनी केलेला अभिनय कसदार वाटला. संवादफेकही उत्तम. हावभावही समर्पक होते. दुसर्‍या चोराची भूमिका प्रतीक अंदुरे यांनी केली. जंटलमन अवतारातील चोर त्यांनी रंगमंचावर आणला. अनेक प्रसंगांत त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटला. सोन्याची चेन मिळाली नसल्याचे खंत आणि प्रियंकाबाबत असलेला कावेबाजपणा त्यांच्या हावभावातून दिसला. आणखी मेहनतीच्या जोरावर त्यांना आपले पात्र आणखी फुलवता आले असते.

मोलकरीण असलेली प्रियंका रेणुका ठोकळे यांनी बिनधास्तपणे वठवली. छोट्या आनंदात सुखावणारी मोलकरीण त्यांनी आपल्या हावभावांनी आणि संवादांनी खुलवली. त्यांच्यात आत्मविश्वासही कमालीचा जाणवला. प्रकाश योजनेची जबाबदारी तुषार बोरूडे यांच्याकडे होती. पहिल्या अंकात पात्रांवर उशिराने लाईट पडले. ही चूक मात्र दुसर्‍या अंकात झाली नाही. पार्श्वसंगीत राकेश इंगवले यांचे होते. अनेक जुनी गाणी ट्रान्झिस्टरवर ऐकायला मिळाली. योग्य पार्श्वसंगीताच्या आधारे अनेक प्रसंग परिणामकारक करता आले असते. नेपथ्य हर्षद पगारे यांचे होते. अर्धवट भिंती, खाली पडलेले बांधकाम साहित्य, पाण्याचा सिमेंटने भरलेला ड्रम यामुळे अपूर्ण इमारतीचे दर्शन होत होते. वेशभूषा भारत पवार यांनी सांभाळली. जंटलमन अवतारातील चोरांचा पोषाख छान वाटला. मोलकरणीला शोभेल असे प्रियंकाचे कपडेही समर्पक वाटले. रंगभूषा प्रेरणा मोहिते यांनी केली.

दिग्दर्शक वाळके यांनी नाटकातील पात्रांचा अभिनय व तांत्रिक बाबींकडे चांगले लक्ष दिल्याचे दिसले. मात्र, गंभीर आशयावर आधारित असलेल्या या नाटकात फेडआऊट न घेतल्याने सलग संवादांमुळे प्रेक्षकांत चलबिचल जाणवली. पुढे काही तरी वेगळे घडेल अशी अपेक्षा ठेवून बसलेले प्रेक्षक वाटच पाहत राहिले. मात्र, केवळ तीनच पात्र असल्याने अभिनयाचा आणि संवादांचा सामना कलाकारांनी बिनदिक्कतपणे केला. त्यात कुठल्याही उणिवा जाणवल्या नाहीत. वैचारिक शैलीतील नाटके अनेकदा प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत. गंभीर विषय हाताळण्यात हातखंडा असलेल्या दिग्दर्शक वाळकेंकडून यावेळी प्रेक्षकांच्या आणखी अपेक्षा होत्या की काय, असे वाटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...