संदीप जाधव | 9225320946
नाटकाचे सादरीकरण बहारदार होण्यासाठी संहिताही तितकीच दमदार हवी असते. स्पर्धेत उतरायचं असेल तर तयारीही तितक्या जोमाने करावी लागते. अन्यथा गंभीर प्रसंगही अनेकदा विनोदी ठरतात, हीच स्थिती सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाली. राहुरीच्या नटेश्वर कला व क्रीडा मंडळाने सादर केलेल्या ‘रिप्लेसमेंट’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन राजेंद्र क्षीरसागर यांनी केले. ही दुहेरी भूमिका साकारतानाच त्यांनी नाटकात पात्रही निभावले आहे. अनेक नवखे कलाकार या नाटकात होते. त्यांनी आपल्या परीने चांगला प्रयत्न केला. काही पात्रांनी तर खरोखर चांगल्या टाळ्या घेतल्या. अनेक त्रुटी या नाटकात होत्या. उत्तरार्धातील प्रसंगात स्त्रीची होणारी घुसमट दाखविण्याचा प्रयत्न मात्र चांगला वाटला.
एका मध्यमवर्गीय कुटुंबात अचानक आलेल्या एका महिलेच्या प्रवेशाभोवती कथानक फिरते. सेवानिवृत्त वडील व मुख्याध्यापक आई असलेला डॉ. गौतम नोकरीनिमित्त परदेशात गेलेला. विभा ही त्याची मुलगी, तर पत्नी शुभांगी ही मरण पावलेली. विभा आणि आजी-आजोबा हे तिघेही घरात राहत असतात. विभाला झालेल्या एका दुखापतीनंतर एक महिला त्यांच्या घरात घुसून विभाची सेवा करते. ती स्वतःला विभाची आई म्हणवते. गौतमची पत्नी असल्याचे सांगते. मात्र, हे मान्य नसल्याने विभाचे आजोबा पोलिस तक्रार करतात. घरात घुसलेली ती महिला प्रेमळ असते. विभाची काळजी घेते. स्वयंपाक बनवते. तिच्याबद्दल अनेक संशय विभाच्या आजी-आजोबांना असतात. पण पोलिस तपासात काहीच निष्पन्न होत नाही. गौतमवर प्रेम असलेली मैत्रीण डॉ. मैथिली व शेजारीण सुगंधा काकू यांचेही नाटकात प्रवेश होतात.
घरात घुसलेल्या त्या महिलेवरून डॉ. गौतमवर त्याचे आई-वडील संशय घेतात. नंतर परदेशातून घरी आल्यानंतरही गौतमला काहीच उमगत नाही. मग ती महिला स्वतःबाबत सांगते. कल्पना नाव असलेली ती महिला सर्वसाधारण घरातील असते. होस्टेलवर शिकत असताना अस्थिर मनःस्थितीमुळे आत्महत्या करायला जाते. पण तिथे सापडलेल्या एका बॅगमुळे व त्यातील डायरीमुळे आत्महत्येचा विचार सोडते. ती बॅग डॉ. गौतमच्या पत्नीची असते. त्यानेच विरह सहन न झाल्याने ती बॅग नदीत टाकलेली असते. डायरीतील लिखाणावरून ती गौतमच्या घरात आलेली असते. शेवटी पोलिस तिला दोषी ठरवून पकडायला येतात. पण विभावरील प्रेमापोटी आजी-आजोबा तक्रार मागे घेतात व सून म्हणून तिला स्वीकारतात. असे कथानक दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न होता.
संहितेत असलेल्या अनेक त्रुटींमुळे नाटकाने दर्जा गाठला नाही. कलाकारांचे पुस्तकी भाषेतील संवाद, न जुळलेले अनेक प्रसंग खटकले. काही कलाकारांनी चांगल्या प्रकारे संवाद सादर केले. पण त्यांच्यात असलेली कला दिग्दर्शकाला बाहेर काढता आली नाही. काही कलाकार संवाद विसरले. बहुधा सराव कमी पडला असावा. विभाच्या आजीची भूमिका शुभांगी त्रिभुवन हिने केली. त्यांचे हावभाव आणि वेगवान हालचाली काही प्रसंगांत चांगल्या वाटल्या. आवाजातील चढउतारही त्यांना छान जमले. मात्र त्यांना अभिनय अधिक फुलविता आला असता. आजोबांची भूमिका प्रशांत सूर्यवंशी यांनी केली. अनुभव पाठिशी असूनही अनेक संवादांत ते अडखळले. विभाचे विसरलेले टेबलावरील पुस्तक व इन्स्पेक्टरची विसरलेली छडी याबाबत त्यांची समयसूचकता दिसली. योग्य हावभावांच्या आधारे त्यांना आपले पात्र रंगवता आले असते.
विभा हे पात्र चुणचुणीत असलेल्या भैरवी केळकर हिने उत्तमरित्या साकारले. स्पष्ट संवाद आणि प्रसंगानुरूप हावभावही सुंदर. पहिल्याच प्रसंगात ती मनापासून रडली! सुगंधा काकू हे पात्र अनुष्का कोरडे हिने रंगमंचावर आणले. मुरडत चालत प्रवेश करणार्या या काकूंनी चांगली धमाल केली. नाटकात हावभावांच्या आधारे प्रेक्षकांना हसविणारे एकमेव पात्र तिने पार पाडले. तिचा अभिनयातील आत्मविश्वास प्रेक्षकांना भावला. डॉ. मैथिली हे पात्र पूजा कुमावत यांनी एकाच प्रसंगात रंगमंचावर आणले. प्रारंभी बर्यापैकी अभिनय करत असतानाच त्या संवाद विसरल्या. त्यामुळे बाहेर जाताना ‘सुटले बाई एकदाची’ असे भाव त्यांच्या चेहर्यावर दिसले!
डॉ. गौतम हे पात्र सचिन पाटोळे यांनी निभावले. कोणतेही हावभाव त्यांच्या चेहर्यावर दिसले नाही. वाट्याला आलेले संवाद ते आठवून आठवून म्हणत होते. इन्स्पेक्टर ही भूमिका आनंद कांबळे यांनी केली. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव दिसला. चेहर्यावर बर्यापैकी गंभीरता दिसली. एका प्रसंगात ते स्वतःची छडी विसरून गेले. नाटकात मध्यवर्ती असलेले कल्पना हे पात्र प्राची बधे हिने पेलले. स्पष्ट उच्चार व पाठांतर ही जमेची बाजू. पण चेहर्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार यावर तिने लक्ष द्यायला हवे होते. अनेक प्रसंगांत तिची नजर प्रेक्षकांमध्ये फिरत होती. अन्यथा तिचे पात्र उठावदार झाले असते. सर्वच कलाकारांच्या तोंडी असलेले पुस्तकी संवाद सयुक्तिक वाटले नाही.
प्रकाश योजना संजय वाणी यांची होती. त्यांनी अनेक प्रसांगात चांगले लाईट दिले. नेपथ्य दत्तात्रय साळवे यांचे होते. किचनमधील भांडे, जीना चांगला वाटला. मात्र सोफासेटची रचना खटकली. त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या पात्राचे तोंड प्रेक्षकांना दिसत नव्हते. रंगभूषा विशाल तागड यांंनी केली. सुगंधी काकू खूपच तरुण वाटली! वेशभूषा विजय साळवे यांची होती. पार्श्वसंगीत सई सूर्यवंशी यांचे होते. काही प्रसंगांत त्यांचे संगीत चांगले वाटले. रंगमंच व्यवस्था सविता खळेकर यांनी पाहिली. नवख्या कलाकारांना अधिक चांगले मार्गदर्शन मिळाले असते आणि प्रसंगांची सलगता व्यवस्थित राखता आली असती तर नाटक चांगले झाले असते. पण अनेक त्रुटी आणि उणिवांमुळे ‘रिप्लेसमेंट’ विस्कळीत झाली. नाटकातील नवख्या कलाकारांना मात्र भविष्यात चांगली संधी आहे, हे मात्र नक्की.