अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगर पालिकांच्या निवडणूका पुढील दोन महिन्यांत पारपडणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून याबाबतचा आढावा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांकडून गुरूवारी घेतला. नगर जिल्ह्यातील मतदान यंत्रे, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ, मतदान केद्रांवर मतदारांना देण्यात येणार्या सुविधांसह निवडणुकीसाठी आवश्यक तयारीची माहिती राज्य निवडणूक आयोगाने यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून जाणून घेतली.
नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 75 गट आणि पंचायत समितीच्या 150 गणांसह 11 नगर पालिका व एका नगर परिषदांसाठी लवकच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. यासाठी टप्प्याने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणेसह राज्य निवडणूक आयोगाकडून व्यस्त दिसत आहे. यासाठी आधी प्रभाग रचना त्यावर हरकती आणि सुनावणी घेवून हे काम पूर्ण करण्यात आले असून आता प्रारूप मतदार याद्या, गट आणि गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांनी ऑनलाईन निवडणूक तयारीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हानिहाय मतदार याद्यावर आलेल्या हरकती, दुबार नावे असणार्यांची नावे वगळण्यासाठी करण्याच्या उपाययोजना, मतदान केंद्र आणि त्या ठिकाणी आवश्यक असणारी मतदान यंत्रे, त्यांची पुरेशी संख्या आहे की नाही. संबंधीत यंत्रांची तपासणी पूर्ण झालेली की नाही. मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक, मतदान केंद्रावर मतदारांना देण्यात येणार्या आवश्यक सुविधांचा आढावा काल राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे.
जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग गट क्रमांक 1 ते 75, तसेच पंचायत समिती क्षेत्रातील निर्वाचक गण क्रमांक 1 ते 150 यांच्या प्रारूप मतदार याद्यांबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करून, अधिप्रमाणित अंतिम मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या अंतिम मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये पाहणी व निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल), अहिल्यानगर यांनी दिली आहे.
आधी पालिकांचे नंतर झेडपी पंचायत समित्या
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच पालिका यांच्यापैकी आधी पालिकांच्या निवडणूक होणार असल्याचे चित्रजवळपास स्पष्ट होतांना दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या आढाव्यात याबाबतचे चित्र स्पष्ट होत असल्याचा अंदाज अनेकांना आला आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीने मोठी हानी झालेली आहे. या ठिकाणी शेतकर्यांसह अन्य बाधीतांना शासकीय योजना आणि भरपाईचा लाभ मिळावा, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील निवडणूका या पालिकांनंतर होणार असल्याचे दिसत आहे.




