अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगरच्या भरारी पथकाने कर्जत तालुक्यातील धालवाडी शिवारात कारवाई करून तीन लाख 45 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कळविले.
कर्जत तालुक्यातील धालवाडी शिवारात अवैधरित्या हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अहिल्यानगरचे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एक अहिल्यानगरचे निरीक्षक सुरज कुसळे, दुय्यम निरीक्षक आनंद जावळे, दुय्यम निरीक्षक एस. व्ही. शिंदे, जवान सुरज पवार, दीपक बर्डे, महिला जवान यांनी शनिवारी (26 ऑक्टोबर) धालवाडी येथे जात छापेमारी करून एकुण तीन लाख 45 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकुण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती, वाहतुक, विक्री व अवैध धाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे निरीक्षक कुसळे यांनी सांगितले.