मुंबई | Mumbai
तब्बल ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेल्या महाराष्ट्राच्या ‘राज्य माशा’ची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज, सोमवारी केली. सिल्व्हर पापलेट (Silver Pomfret) हा यापुढे ‘राज्य मासा’ म्हणून ओळखला जाईल.
मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भात मुंबईत आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. पालघर जिल्ह्याच्या सातपाटी येथील मच्छीमार सहकारी संस्थांनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन सिल्व्हर पापलेटला राज्य मासा म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यावर गांभीर्याने विचार करून सरकारने हा निर्णय घेतला.
सिल्व्हर पापलेट किनाऱ्यापासून थोडे दूर आणि ३५ ते ७० मी. खोलीपर्यंत व पाण्याच्या चिखलमय तळ असलेल्या ठिकाणी थव्याने राहतात. मुंबई सागरी क्षेत्रात हे मासे पकडण्याचा हंगाम ऑक्टोबर–फेब्रुवारी या काळात जोरात चालतो. फेब्रुवारीनंतर हे मासे दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करतात. त्यांचे मांस लुसलुशीत व स्वादिष्ट असल्याने पापलेट मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. पापलेट हा मासा परकीय चलन मिळवून देणारा असल्याने त्याचे विशेष मह्त्त्व आहे.