धुळे । Dhule
क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील गरुड मैदानावर राज्यस्तरीय स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे (Khashyaba Jadhav Cup Wrestling Tournament ) आज सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 25 फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा सुरू राहतील. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी जि.प. अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, खा. डॉ. सुभाष भामरे, सिनेकलाकार देवदत्त नागे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, क्रीडा विभागाच्या नाशिक विभागीय उपसंचालक सुनंदा पाटील, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, प्रमुख स्पर्धा निरिक्षक संदिप भोंडवे, तांत्रिक समिती प्रमुख दिनेश गुंड, कुस्तीगीर परिषदेचे सदस्य उमेश चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, सुनील चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात या स्पर्धा होतील. या तीन प्रकारच्या स्पर्धा दहा वजनी गटात होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 30 संघ आणि 650 पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी तीन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले असून 10 हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारण्यात आली आहे. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते बजरंगबलीचे पुजन करून व स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
त्यानंतर गणेशवंदना, मल्लखांबची प्रात्यक्षिके, मारूतीस्तवन, रिदमिक जिम्नॅस्टिक्स प्रात्यक्षिके आणि फ्युजन नृत्य आदि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांनी केले.
यावेळी बोलतांना खा. डॉ. भामरे म्हणाले, धुळ्यास कुस्तीची परंपरा आहेत. राज्य शासनाने आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या स्पर्धा आयोजनाचा मान धुळे जिल्ह्यास दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले. त्याचबरोबर अशा स्पर्धामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. असेही ते म्हणाले. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, सिनेकलाकार देवदत्त नागे यांनी मनोगतात सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, की धुळे जिल्ह्यास क्रीडा संस्कृतीचा इतिहास आहे. याच मैदानावर खो- खो आणि कुस्ती स्पर्धा यापूर्वी भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे संयोजन यशस्वीपणे करण्यात आले आहे. त्यानुसार खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धाही निश्चितपणे यशस्वी होतील, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनी आपले कौशल्य पणास लावत राज्य, देश आणि जागतिक पातळीवर आपला नावलौकिक मिळवीत महाराष्ट्र राज्याचाही नावलौकिक उंचवावा. या स्पर्धेत सहभागी कुस्तीपटूंनी आपले कौशल्य पणास लावत यश मिळवावे. त्यांच्यापासून स्थानिक मल्लांनी प्रेरणा घेत आपला खेळ विकसित करावा. अशी अपेक्षाही व्यक्त केली.