Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते उदघाटन

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने नाशिकमध्ये १४ वर्षे मुले आणि मुली या गटाच्या महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम, पंचवटी, नाशिक येथे आयोजित या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद नाशिकचे अध्यक्ष जलज शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त साहेबराव पाटील, नरेंद्र छाजेड, आनंद खरे, अविनाश खैरनार, संजय होळकर, विभागीय क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अविनाश टिळे, रवींद्र नाईक क्रीडा अधिकारी महेश पाटील, भाऊसाहेब जाधव, संदीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी क्रीडा विश्वातील महान खेळाडू मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून या स्पर्धेचे उदघाटन केले. तसेच प्रत्यक्ष मैदानात जाऊन क्रीडांगणाची पूजा करून आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.

यावेळी खेळाडूंना संबोधित करतांना त्यांनी सांगितले की, खेळाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे खेळाडूंनी या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास घडवावा असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तिविक केले. सर्व मान्यवरांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब जाधव यांनी केले.

या राज्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या नागपूर, लातूर, अमरावती, मुंबई, पुणे, संभाजी नगर आणि नाशिक विभाग अश्या आठ विभागातील १९२ खेळाडू सहभागी झाले आहेत. तर निवड चाचणीसाठी ८० खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांची निवास आणि भोजन व्यवस्था विभागी क्रीडा संकुल येथील वसतिगृह येथे करण्यात आली आहे. उदघाटनानंतर स्पर्धांना सुरुवात झाली.

मुलांच्या गटात कोल्हापूर आणि लातूर विभागाच्या संघांनी उत्तम कामगिरी करून आपले दोन सामने सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. तर मुलीच्या गटात कोल्हापूर, नागपूर, लातूर आणि पुणे या संघांनी सुंदर खेळ करून विजयी सुरवात केली.

आज खेळल्या गेलेल्या मुलांच्या सामन्यात छत्रपती संभाजी नगर संघाने यजमान नाशिक संघाला ३-१ असे पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबई संघावर विजय मिळवून आपला पहिला विजय साजरा केला. मुलांच्या तिसऱ्या सामन्यात लातूर विभागाच्या संघाने सुंदर खेळ करून अमरावती संघाला पराभूत केले.

चौथ्या सामन्यात नागपूर संघाने पुणे संघावर मात करून विजय प्राप्त केला. त्यानंतर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघाने छत्रपती संभाजीनगर संघाला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली.तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात लातूर संघाने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून नागपूर संघावर 3-१ असा विजय मिळवून अंतीम फेरीत आपले स्थान पक्के केले.

मुलींच्या गटात कोल्हापूर संघाने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाला पराभूत केले तर उपांत्य फेरीत नागपूर संघावर विजय मिळवून अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. अन्य सामन्यात पुणे संघाने लातूरला पराभूत केले, आणि उपांत्य फेरीत लातूर संघाला २५-२०, २५-१८ आणि २५-१६ असे ३-० फरकाने पराभूत करून अंतीम फेरीत प्रवेश मिळविला.उद्या मुले आणि मुली यांचे अंतीम सामने खेळविले जातील अशी माहिती आयोजकांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या