Sunday, May 19, 2024
Homeनगरअखेर राज्यात मान्सूनची सलामी

अखेर राज्यात मान्सूनची सलामी

मुंबई/अहमदनगर |प्रतिनिधी| Mumbai | Ahmednagar

राज्यात सर्वत्र प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर सक्रीय झाला आहे. कोकण विभागानंतर मान्सूनने महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. आता मान्सूनची प्रगती सुरू झाली असून राज्यात येत्या 5 दिवसांत सर्वत्र मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, नगर शहरासह जिल्ह्यात शनिवारी दुपारी 3 वाजेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. आषाढसरी बरल्याने सर्वत्र गारवा निर्माण झाला. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असल्याने बळीराजाने अखेर सुटेकचा नि:श्वास सोडला आहे.

राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आगमण केली. कोकणात रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला असून शनिवारी पावसाने विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. तसेच पुण्यातही मान्सूनसरी जोरदार बरसल्या. अशात पुढचे 5 दिवस हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी यासंबंधित ट्वीट करून माहिती दिली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या 3 आठवड्यापासून राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. अशात शुक्रवारी रात्रीपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बहुतांश भागात पुढील 5 दिवसांत मान्सून सक्रिय होईल.

होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह नगर जिल्ह्यातील वातावरणात बदल पहावसाय मिळाला. शुक्रवारी उन आणि सावलीचा खेळ सुरू होता. शनिवारी सकाळी हिच परिस्थिती होती. मात्र, त्यानंतर आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आषाढीच्या सरी बरसल्या. अनेक दिवसांपासून गायब झालेला पाऊस अवतरल्याने शेतकर्‍यांमधून आनंद व्यक्त होत आहे. पावसाला सुरूवात झाल्याने आता लवकरच शेतीच्या कामाला सुरूवात होणार आहे.

आधी मृग कोरडा गेला. त्यानंतर आद्रा नक्षत्रातील काही दिवस वाया गेली. मात्र, शनिवारपासून पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता आहे. नगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 6 लख 39 हजार हेक्टरवर पेरण्यांचे नियोजन केले होते. मात्र, पाऊस नसल्याने पेरण्या ठप्प होत्या. मात्र आता पाऊस सुरू झाल्याने शेतकरी शेतीच्या कामासाठी सज्ज होणार असून लवकरच पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरूवात होवून शेतीवाडीचे चक्र सुरळीत होणार आहे.

आढळा खोर्‍यात दमदार

आर्द्रा नक्षत्रातील पावसाने काल दुपारनंतर अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात हजेरी लावली. राहाता तालुक्यात काही भागात शिडकावा तर काही भागात काही काळ दमदार पाऊस झाला. काल सायंकाळी 5 वाजेनंतर शिर्डीत पावसाचे आगमन झाले. दीड तासात तेथे 25 मिमी पावसाची नोंद प्रमोद गोंदकर यांच्या पर्जन्य मापकावर झाली. राहुरी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या काही भागात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. अकोले शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील आढळा खोर्‍यात दमदार पाऊस झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या