नाशिक । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत कामात एसटी महामंडळाची चांदी झाली असून नाशिक जिल्ह्यातून बस सेवेपोटी एसटी महामंडळाला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. तर खासगी वाहतूकदाराच्या छोट्या वाहनांवर तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रशासकीय कामासांठी कर्मचाऱ्यांवर साडेतीन कोटींचा खर्च झालेला असताना आता मतदान साहित्य वाहतुकीवर सुमारे पाच कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचवण्यात आले. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी नियुक्त होते. त्यांच्यासह बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, विविध प्रकारचे फॉर्म असलेल्या पुस्तिका, शाई, पेन्सील, पेन, टाचनपीन आदी पोतेभर साहित्य केंद्रावर पाठवले. त्याचे काटेकोर नियोजन निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्यामुळे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेत निर्विघ्नपणे पार पडली.
हे ही वाचा : अग्रवाल पिता-पुत्रास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा, पण…
बिघडलेल्या मतदान यंत्रांना तातडीने बदलून देत प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात प्रशासनाला यश आले. मतदान होईपर्यंत आणि मतदान झाल्यानंतर सर्व साहित्य ज्या वाहनांतून पाठवण्यात आले त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाला पाच कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. एसटी महामंडळाच्या ५२४ बसेस व ९२ मीनी बसेस या ५५ रुपये प्रती किलो मीटरप्रमाणे भाडे तत्त्वावर वापरात आल्या.
खासगी जीप, कार व ट्रक या ४५ ते ५० रुपये प्रती किलोमीटर दराने त्यांना भाडे मिळाले. महामंडळाच्या बसेसपेक्षा खासगी वाहनांची संख्या अधिक होती. त्यामुळे त्यावर जास्त खर्च झालेला दिसतो. या व्यतिरीक्त ड्रायव्हरला भत्ताही देण्यात आला. ज्या ठिकाणी बसेस पोहोचणे शक्य नाही, अशा ठिकाणी खासगी जीप, कारचा वापर करण्यात आला. तालुकास्तरावर संकलित झालेले साहित्य ट्रकद्वारे नाशिकमधील मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचवण्यात आले. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी तीन ट्रकची व्यवस्था केलेली होती.
हे ही वाचा : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; मुर्तींसह सापडला पुरातन ठेवा…
दिंडोरी व नाशिक लोकसभेत आदिवासी बहुल गावे आणि पाड्यांचा समावेश आहे. डोंगरदर्यामध्ये वसलेल्या या वाड्या वस्त्यांवर आजही बसेस पोहोचणे शक्य नाही. त्याठिकाणी जीप, कारनेच जाणे शक्य असल्यामुळे त्या ठिकाणी खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला. यात दिंडोरी लोकसभेत जास्त गाड्यांचा वापर झाल्याचे दिसून येते.