संगमनेर |वार्ताहर| Sangamner
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी 2024-25 मध्ये वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी- 2 नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत सत्र 2 च्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. तसेच राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाचवेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-1 व संकलित मूल्यमापन चाचणी-2 अशा तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबत चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 9 वीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी संकलित मूल्यमापन- 2 साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल. त्यासाठी प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा. दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस होईल याची दक्षता घ्यावी. तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी.
विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसर्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. संकलित चाचणी – 2 च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. 1 मे रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर 02 मे 2025 पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल. सदर सूचना राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत. संकलित चाचणी- 2 आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांची असेल.
त्यांनी सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल, याची दक्षता घ्यावी.उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल. याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा, असेही नमूद केले आहे.