Tuesday, May 5, 2026
HomeनगरCrime News : स्टेरॉईड्स व महिलांकडे पाहण्याच्या आरोपांवरून हाणामारी

Crime News : स्टेरॉईड्स व महिलांकडे पाहण्याच्या आरोपांवरून हाणामारी

जिममधील वादातून घडली घटना || परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कोहिनूर मॉल येथील जिममध्ये सुरू झालेला वाद अखेर एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादींमुळे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या फिर्यादीत विवेक दामोदर आहिरे (वय 31, रा. इंदीरा कॉलनी, तारकपुर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिम ट्रेनर सद्दाम हुसेन इद्रीस शेख व इतर सात ते आठ अनोळखींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहिरे यांच्या म्हणण्यानुसार, जिममध्ये व्यायाम करत असताना शेख याने बॉडी स्टेज शो करण्यासाठी स्टेरॉईड्स घेण्याचा दबाव टाकला होता. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती.

- Advertisement -

यामुळे त्रस्त होऊन त्यांनी 31 मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रारीचा राग मनात धरून त्याच दिवशी रात्री शेख आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी आहिरे यांना राधाबाई कॉलेजसमोर अडवले. माझ्याविरूध्द अर्ज का दिला? असा जाब विचारत शेख याने पिस्तूलाच्या बटाने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला, तर साथीदारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. या झटापटीत आहिरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही लंपास करण्यात आल्याचा आरोप आहे. जखमी आहिरे यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, जिम ट्रेनर सद्दाम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेक आहिरे व पोलीस अंमलदार अंकुश जाधव (रा. तोफखाना) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्या म्हणण्यानुसार, जिममध्ये येणार्‍या महिलांकडे एकटक पाहण्याबाबत काही सदस्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी पोलीस अंमलदार अंकुश जाधव आणि विवेक आहिरे यांना जाब विचारला होता. याचा राग आल्याने दोघांनी त्यांना धमकावले. 31 मार्चच्या रात्री कोठला चौक परिसरात संशयित आरोपींनी शेख यांना अडवून जबरदस्तीने वाहनात बसवले, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि कुरेशी हॉटेलच्या मागे नेऊन मारहाण केली. तेथून सुटून जात असताना नटराज हॉटेलसमोर पुन्हा त्यांना अडवून मारहाण करण्यात आल्याचे शेख यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

पोलीस अंमलदाराचा सहभाग
या घटनेत एका पोलीस अंमलदाराचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तो साथीदारासह जिममध्ये महिलांकडे एकटक बघत असल्याचा आणि त्याला जाब विचारल्यानंतर ‘खाकी’च्या जीवावर धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे जिममध्ये स्टेरॉईड्सचा सर्रास वापर होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर जिम ट्रेनरने मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एकाच दिवशी रोखले 10 बालविवाह

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात 11 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित...