Friday, December 13, 2024
Homeनगरमोफत गणवेशाची शिलाई यंदा महिला बचत गटाच्या हाती

मोफत गणवेशाची शिलाई यंदा महिला बचत गटाच्या हाती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकार मार्फत राबवण्यात येणार्‍या मोफत गणवेश योजना 2024-25 साठी राज्य स्तरावरून कापड येणार आहे. प्रत्येक गावातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी ते कापून त्यातून गणवेश शिवून देणार आहेत. यासाठीचे नियोजन सुरू झाले असून नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेसह सर्व शासकीय शाळेत शिक्षण घेणारी 2 लाख 30 हजार विद्यार्थी यासाठी लाभार्थी आहेत. मोफत गणवेश योजना राबवण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून ही समिती मोफत गणवेशाचे काम पाहणार आहेत.

- Advertisement -

जूनमध्ये सुरू होणार्‍या शैक्षणिक सत्रात राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश शिवून मिळणार आहेत. त्यासाठी राज्य स्तरावरून ठराविक मापात कापलेला कापड पुरविला जाणार असून गावातील बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. याबाबतचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. दरवर्षी मोफत गणवेश योजनेत शाळा पातळीवर असणार्‍या शाळा व्यवस्थापन समितीला पैसे देवून त्यानूसार गणवेश खरेदी करण्यास सांगण्यात येत होते. मात्र, यंदापासून योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्यात आला आहे. यंदापासून राज्य पातळीवरून कापड पूरवण्यात येणार असून हे कापड महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने चालवण्यात येणार्‍या महिला बचत गटांच्या प्रतिनिधी यांच्यामार्फत ते शिवून घेण्यात येणार आहे.

यासाठी संबंधीत बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना शाळेच्या इयत्ता आणि विद्यार्थ्यांच्या वयानूसार ठराविक माप कळवून त्यानूसार गणवेश शिवून घेण्यात येणार आहे. शिवून घेण्यात येणार्‍या या गणवेशात एक नियमित गणवेश तर दुसरा हा स्काऊट गाईडचा असणार आहे. यातील एक गणवेश 1 जूनपर्यंत तर दुसरा गणवेश 15 जून अथवा शाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत शिवून घेण्यात येणार असून शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात गटशिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून ही समिती मोफत गणवेश विषयावर नियंत्रण आणि देखरेख ठेवणार आहे.

नगर जिल्ह्यात 3 हजार 545 सरकार शाळांतील, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 1 लाख 553 विद्यार्थी तर 1 लाख 3 हजार 617 विद्यार्थीनी यासह अन्य शासकीय यंत्रणेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तालुका पातळीवर असणार्‍या प्रत्येक बीआरसी, सीआरसी केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 64 स्वतंत्र बॉक्स उपलब्ध होतील. प्रत्येक बॉक्समध्ये 100 गणवेशासाठी कटाई केलेले कापड (मायक्रो कटिंग केलेले) असतील. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी चार आणि प्रत्येक विद्यार्थिनींसाठी चार बॉक्समध्ये हे कापडाचे तुकडे असतील. त्या तुकड्यांमधून बचत गटांना एक गणवेश तयार करून द्यायचा आहे. गणवेश शिवण्यापूर्वी महिला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची मापे स्टैंडर्ड मापानुसार आहेत की नाही, याची खात्री करतील.

असा असेल गणवेश
2024-25 या सत्रासाठी दोन गणवेश पुरविले जाणार आहेत. यात एक गणवेश नियमित तर दुसरा स्काउट गाईडचा असेल.गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट/पँट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) अशा स्वरूपात गणवेशाची रचना असावी. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप व दोन खिसे असणे आवश्यक आहे. नियमित गणवेशामध्ये मुलांसाठी आकाशी शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट. मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. आठवीच्या विद्यार्थिनींसाठी ओढणीसाठीही कापड पुरविला जाणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या