मुंबई । प्रतिनिधी
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिला.
आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू आहे. सामान्य जनता चहुबाजूंनी संकटात असताना महाविकास आघाडीकडून आरोपांचे राजकारण चालू आहे. परंतु, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रेमडिसिवर औषधाबाबत काल केलेला आरोप बालीश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडिसिवर विकण्यास सोळा कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत, असे पाटील म्हणाले.
जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार ‘आरोप करा आणि पळून जा’, असा प्रकार चालू आहे. पण आता आम्ही हे प्रकरण धसास लावल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा किंवा माफी मागावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.