Saturday, July 27, 2024
Homeनाशिकझेरॉक्स सरपंचाची लुडबुड थांबवा

झेरॉक्स सरपंचाची लुडबुड थांबवा

निफाड । प्रतिनिधी Niphad

ग्रामपंचायतीच्या कामकाजात झेरॉक्स सरपंच लुडबुड करीत असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या चौकशीसाठी निफाड पंचायत समितीकडून तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सावरगाव येथे झेरॉक्स सरपंच कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सावरगाव येथील संजय यशवंत कुशारे व इतर ग्रामस्थांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ.संदीप कराड यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. सावरगावला महिला सरपंच असताना त्यांचे पतीच कामकाजात लुडबुड करीत असल्याचे अर्जात नमूद केले होते. सरपंच हिराबाई बाबाजी कुशारे प्रत्यक्ष ग्रामपंचायतीचे कामकाज करीत नसून त्यांचे पती बेकायदेशीर कामकाज बघत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी 8 ऑगस्टला तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पाठक यांची नेमणूक करण्यात आली असून, शाखा अभियंता (इ.व.द.) गोपाळ गायकवाड, विस्तार अधिकारी (पंचायत) प्रशांत बोरसे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीने 15 दिवसांत सावरगाव ग्रामपंचायतीला समक्ष भेट देऊन स्थळपाहणी करून अहवाल सादर करावा, असे गटविकास अधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

…तर कारवाई होणार!

महिला सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर महिला आरक्षण लागू केले आहे. जिल्हा परिषद महिला सदस्य स्वतः कार्यालयात जाऊन कामकाज पाहतात. त्याप्रमाणे ग्रामपंचायत महिला सदस्यांनी देखील ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज पहावे. त्यांचे कामकाज त्यांचे पती पाहत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही नवीन काढलेल्या शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कारवाई करा

सावरगाव ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच असताना त्यांचे पती कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत. याबाबतची तक्रार गटविकास अधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार चौकशी समिती नेमण्यात आली असून, कसून चौकशी व्हावी.

रमेश कुशारे, ग्रामस्थ, सावरगाव

हस्तक्षेप थांबवा

नव्या आदेशानुसार सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांनी त्यांची कामे स्वतः करणे गरजेचे आहे. गावचा कारभारी म्हणून सरपंचाचा लौकिक असतो. मात्र, महिला सरपंच असलेल्या सावरगावला पतीच कामकाज बघत आहे. याप्रकरणी कारवाई व्हावी.

बाळासाहेब कुशारे, सावरगाव

प्रशासनाने दखल घ्यावी

कोणत्याही महिला सरपंचाचे पती अथवा अन्य कोणीही नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करु शकत नाही. मात्र, सावरगावला तसा प्रकार असल्याने प्रशासनाने दखल घ्यावी.

गोपाळ कुशारे, सावरगाव

लवकरच अहवाल सादर करणार

सावरगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पती हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर आमची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यावर लवकरच चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल.

प्रशांत बोरसे, विस्तार अधिकारी (पंचायत)

- Advertisment -

ताज्या बातम्या