Wednesday, May 29, 2024
Homeब्लॉगऐका दिव्यांनो तुमची कहाणी ...

ऐका दिव्यांनो तुमची कहाणी …

विनय मधुकर जोशी

आटपाट अश्मयुग होते.माणूस दिवसा उजेडी कामे करी ,रात्री घाबरून गुहेत लपे. गुहेत मिट्ट काळोख होई , माणूस कसा बसा रात्र काढी . आगीचा शोध लागला .पण हि आग गुहेत आणावी कशी. जाळायला नको पोळायला नको..

- Advertisement -

माणसाने दगडाची खोबणी केली, प्राण्यांच्या चरबीचे तेल घातले, कातडीची वात घातल, वणव्याच्या आगी वर पेटवला, पहिला दिवा गुहेत आणला, सगळी कडे प्रकाश झाला, कोणाला जाळले नाही कि पोळले नाही. समुद्र किनारी शिंपल्याचे दिवे केले, डोंगरी मातीचे दिवे केले , या प्रकाशात माणूस सुखी झाला, परिवार एकत्र गाणी गाई ,गुहेत चित्रे काढी, माणसाचे जीवन उजळले.

पुढे ताम्रयुग आले, लोहयुग आले,धातूंचा शोध लागला .माणसाने धातूचे सुबक दिवे बनवले. कापसाची वात घातली, बियांचे तेल घातले, माणूस घरात राहू लागला,अधिक प्रगत झाला. दिवे देखील प्रगत झाले सुबक झाले, माणसाचे जीवन उजळले

दिवे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले. दिव्यांनी अनेक रूप घेतली. दिवे देवघरात नंदादीप झाले औक्षणाला निरंजन झाले .लग्नाला शकुनदीप झाले , दारापुढची पणती झाले, बैठकीत समई झाले, माजघरात दिवटी झाले. दिवे सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळेचे, मातीचे अनेक रूपात सजले. दिवा लावल्या शिवाय पूजा होईना , लग्न लागेना , माणूस जन्मला तरी पाचवीला जिवतीची दिवा पेटे. माणूस मेला तरी पिठाचा दिवा पेटे. माणसाने दिव्यांना देवत्व दिले.. दिव्यांचा सण दिवाळी झाला ,आषाढी अमावास्येला दीप पूजन होई लागले माणसाचे जीवन उजळले.

पुढे केरोसीन चे दिवे आले .चिमण्या आल्या , कंदील आले, पेट्रोमॅक्स आले, सहजपणे अधिक प्रकाश मिळू लागला तरी दिव्यांचे महत्व राहिले,मग वीज आली,एका बटणवर घर उजळू लागले. हॅलोजन आले, हायमास्ट आले आता रात्री सुद्धा दिवसाइतका प्रकाश मिळे माणसाचे जीवन अधिकाधिक उजळून गेले.

पण आता घरात दिवे दिसेना, दिव्यांना कोणी पुसेना, दिव्यांची पूजा कोणी करेना दिवाळीला लाइटिंग आली, दीपअमावास्येची गटारी झाली, दिवे बिचारे दुखी झाले.

आटपाट नगरात एक”आर्यन “ होतात्याला इंटरनेट वर ‘दिपअमावस्येची माहिती दिसली त्याने आई ला विचारले ..

मॉम दिव्याची अवस म्हणजे काय ? मला काय माहित आजीला विचार …

ग्रँडमा दिव्याची अवस म्हणजे काय ?

आमच्या वेळी कि नाही आम्ही घरातले सगळे दिवे शोधायचो ..घासायचो ..पुसायचो ..त्यांची पूजा करायचो

Wow किती cool ..आपण करूया का ??

या वर्षी करशील पुढे उतशील ,,मातशील घेतला वसा टाकशील

उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.

आजीने वसा सांगितलं ,आर्यनने घरातले दिवे शोधले ,त्याची पूजा करून फोटो सोशल मीडियावर टाकले

हा वसा पार्थने पहिला , स्पृहाने पहिला, रिशान ने पहिला,गार्गीने पहिला त्यांनी पण हा वसा केला दिव्याचीअवस ट्रेंडिंग झाले.

दिवे आंनदले ,माणसाची प्रगती झाली, जीवन उजळले तरी भारतीय माणूस उतला नाही मातला नाही संस्कृतीचा वसा टाकला नाही.

दिवे प्रसन्न झाले,अत: दीपो भव |या परंपरा जपणऱ्या दिव्यांमुळे भारतीय म्हणजे संस्कृतीचा प्रकाश नित्य तेवत राहो!!त्यांचे जीवन आनंदाने उजळो!!

ही साठा उत्तराची कहाणी तुळशीच्या पणती, निरंजनाच्या वाती ,नंदादिपाच्या ज्योती सुफळ सम्पूर्णम्

- Advertisment -

ताज्या बातम्या