अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बोल्हेगाव परिसरात एका निर्दय इसमाने झाडाची फांदी वापरून एका बेवारस कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून ठार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्राणीमित्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित इसमाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन मंजाबाप्पू कोहक (रा. राघवेंद्र स्वामी नगर, फेज 2, बोल्हेगाव) असे त्या इसमाचे नाव आहे.
प्राणीमित्र सुमित संतोष वर्मा (वय 34 रा. माणिकनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. वर्मा हे मित्र हर्षद रमेश कटारीया यांच्यासोबत सोमवारी (14 एप्रिल) रात्री रस्त्यावर भटकणार्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी फिरत होते. रात्री 11:30 वाजेच्या सुमारास ते बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराजवळ पोहोचल्यावर त्यांना गर्दी दिसली आणि चौकशी केल्यावर माहिती समोर आली. सचिन कोहक या इसमाने एका झाडाच्या फांदीने कुत्र्याच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केल्याने त्या कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याने भुंकल्यामुळे सचिन कोहक याने त्याला मारल्याचे सांगितले. या घटनेची माहिती वर्मा यांनी डायल 112 वर कॉल करून पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून, तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, प्राणीप्रेमींमध्ये या अमानुष घटनेमुळे तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित संशयित आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.