नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
नाशिकरोड परिसरात विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर हल्ला करून त्यांना चावा घेतल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रविवारी चार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामध्ये देवंशी सोरे या बालिकेसह मनसेना शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित, सतीश चंदनशिवे, राज पिंजारी यांचा समावेश आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.
नाशिकरोड येथील डावखरवाडी, पंचम सोसायटी, सद्गुरु नगर आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिक व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले असून यापूर्वी सुद्धा भटक्या कुत्र्यांनी जेलरोड परिसरात थैमान घातले होते. तसेच जेलरोड परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे रात्री आठ वाजेनंतर घराबाहेर सुद्धा निघत नव्हते . आता पुन्हा डावखरवाडी व परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
या संदर्भात महापालिकेला वेळोवेळी कळवून देखील महापालिका कार्यवाही करत नसल्याचा नागरिकांची आरोप आहे. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळी क्लासला जाणारी मुले, फिरायला जाणारे नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा जाच होत आहे.