Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधमनाची ताकद

मनाची ताकद

ब्रह्मकुमारी वीणादीदी

हार्वर्डचे सुप्रसिद्ध न्यूरो सायंटिस्ट डॉ. अल्वारो पास्कल लिऑन यांनी एक प्रयोग केला. त्यांनी दोन ग्रुप केले. त्यांना सांगितले की, मी तुम्हाला पियानो वाजवायला शिकवेन. त्यापैकी एका ग्रुपला पियानोसमोर बसवले. हाताने पियानो वाजवायला शिकवले. दोन आठवडे त्यांना प्रशिक्षण देत राहिले आणि तो ग्रुप प्रत्यक्ष शिकत होता.

- Advertisement -

दुसर्‍या ग्रुपला पियानोचे फक्त चित्र दाखवले. पियानो कसा वाजवतात याचा व्हिडिओ दाखवला. परंतु प्रत्यक्षात त्यांना पियानो वाजवायला दिला नाही. त्यांना फक्त कल्पना करायला सांगितले. त्यामुळे दुसरा ग्रुप फक्त कल्पना करत होता की, ते पियानो वाजवत आहेत. दोन आठवडे त्यांनी हा पण प्रयोग रोज केला. दोन आठवड्यांनंतर या दोन्ही ग्रुप मेंबरच्या मेंदूचा एमआरआय केला.

मेंदूचा जो भाग पियानो वाजवणार्‍या बोटांना कंट्रोल करतो त्यावर याचा काय परिणाम होतो, हे त्यांना पाहायचे होते. त्यांना आढळले की, जो ग्रुप प्रत्यक्षात पियानो वाजवत होता आणि ज्यांनी फक्त कल्पना केली होती त्या दोन्ही ग्रुप मेंबरच्या मेंदूमध्ये झालेले बदल समान होते. म्हणजे दुसरा ग्रुप पियानो वाजवत नव्हता केवळ कल्पना म्हणजे फक्त विचार करत होता आणि केवळ विचारांद्वारे त्यांनी आपल्या मेंदूच्या रचनेत परिवर्तन घडवून आणले. ही आहे मनाची शक्ती.

म्हणजे आपल्या विचारांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आपल्या शरीराची संरचना जर बदलायची असेल तर कृतीपेक्षाही महत्त्वाचे आहेत ते आपले विचार. आपण जेव्हा म्हणतो मी आजारी आहे, मी सारखी आजारी असते, मला नाही वाटत मी यशस्वी होईल, मला तर अपयशी होण्याची सवय झाली आहे, माझी मुले अभ्यास करत नाहीत, नेहमी व्यर्थ गोष्टींत वेळ वाया घालवतात.. तेव्हा आपला एक एक शब्द आतमध्ये रेकॉर्ड होत असतो आणि आपला मेंदू त्याला तथास्तू…तथास्तू….तथास्तू म्हणत स्वीकारत असतो. कारण मेंदूकडे चांगले- वाईट ओळखण्याची शक्ती नाही. आपण जे विचार करू ते आपला मेंदू स्वीकारतो. म्हणून आपल्याला जे हवे आहे तेच विचार जर आपण वारंवार केले, रोज केले तर 21 दिवसांत किंवा जास्तीत जास्त तीन महिन्यांत ती गोष्ट आपल्या जीवनात प्रत्यक्षात घडू लागते. जी गोष्ट आपण मनात तयार करतो म्हणजे कल्पनाशक्तीने मन बुद्धीने जी आपण बघतो ती बाहेरही घडते .

एकदा एक राजा आपल्या राजपुत्राला यात्रेत फिरायला घेऊन जातो. यात्रेतील गंमतीजमती बघण्यात राजपुत्र खूप दंग होऊन जातो. परंतु ते बघत असताना त्याने राजाचा पकडलेला हात केव्हा सुटून जातो हे त्याच्या लक्षात येत नाही आणि तो यात्रेत हरवतो. राजाच्याही हे लवकर लक्षात येत नाही. काही काळाने राजाला हे समजते परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. राजा खूप शोधतो पण इतक्या मोठ्या यात्रेत राजपुत्र सापडत नाही. तो राजपुत्र एका भिकार्‍याला सापडतो. भिकारी त्या छोट्याशा राजकुमाराला घेऊन जंगलात जातो. परंतु भिकार्‍यासोबत राहत असताना त्या राजपुत्राचीही उपासमार होऊ लागते त्यामुळे त्याचे शरीर खंगते. त्यालाही आंघोळ मिळत नाही, कपडे खूप मळतात, फाटतात. एकूणच त्याचे पूर्ण स्वरूप एका भिकार्‍यासारखे बनते. इकडे राजाचे सर्व शिपाई राजपुत्राला नगरभर शोधत असतात. हा राजपुत्र भीक मागायला नगरातही जायचा.

शोधणार्‍या शिपायांच्या समोरूनही हा जात असेल पण त्याच्या या अवतारामुळे शिपायांना तो ओळखू येत नव्हता. पण एक शिपाई जरा चाणाक्ष होता आणि राजपुत्राच्या डोळ्यांवरून त्याला तो ओळखतो की बाह्य स्वरूप जरी बदललेले असले तरी हाच राजपुत्र आहे. मग त्याला पुन्हा राजमहालात घेऊन जातात. आंघोळ वगैरे घालतात. नवीन वस्त्र परिधान करायला देतात. राजपुत्राला पुन्हा आपले पूर्वीचे मूळ स्वरूप प्राप्त होते. जशी गोष्टीतल्या राजपुत्राची आणि राजाची ताटातूट झाल्यामुळे राजपुत्राची अवस्था हीन दीन झाली होती त्याचप्रमाणे आपलीही स्वतःशीच ताटातूट झाली आहे. त्यामुळे आपण स्वतःला आणि पर्यायाने आपल्या सर्व शक्तींना विसरलो आहोत. या सृष्टीचा राजा परमात्मा आहे आणि ते आपले पिता आहेत. त्यांच्याशीही आपली ताटातूट झाल्यामुळे आज आपण सुखाच्या, शांतीच्या शोधात भटकत आहोत. आपल्यावर अशांतीची, चिंतेची, तणावाची आणि नकारात्मकतेचे अनेक पुट चढली आहेत. परमपिता म्हणतात, तुम्ही म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेले हाडा मांसाचे शरीर नाही आहात तर या शरीराला चालवणारे चैतन्य शक्ती, अजर, अमर, अविनाशी आत्मा आहात आणि मन ही आत्म्याची एक सूक्ष्म शक्ती आहे.

जी विचार करते. जशी ब्रह्माने संकल्पानी सृष्टी रचली तशीच प्रत्येक व्यक्ती म्हणजे आत्मा आपल्या शुद्ध संकल्पने म्हणजे विचारांनी आपल्याला हवी तशी आपली सृष्टी म्हणजे आपले जीवन बनवू शकतो. आज प्रत्येक माणूस प्रयत्न करतोय तो सुख, शांती, आनंद, प्रेम मिळवण्यासाठी. परंतु परमात्मा सांगतात की, सुख, शांती, प्रेम, पवित्रता, आनंद, शक्ती, ज्ञान हे तर आत्म्याचे अविनाशी गुण आहेत. मूळ संस्कार आहेत. त्यांचे आपण चिंतन केले तर आपल्याला अंतरंगात त्यांची अनुभूती होते. उदाहरणार्थ, मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शक्तिशाली आत्मा आहे, मी पवित्र आत्मा आहे, मी सदा आनंदी आत्मा आहे असे रोज चिंतन केल्यास आणि आपल्या बुद्धीची तार त्या शांतीचा सागर, सुखाचा सागर, आनंदाचा सागर, सर्व शक्तिमान परमात्म्याशी जोडल्यास आपल्याला नक्की सुख शांतीची प्राप्ती होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या