Saturday, May 4, 2024
Homeनाशिकअफवा पसरवल्यास कठोर कारवाई

अफवा पसरवल्यास कठोर कारवाई

देवळा । प्रतिनिधी Deola

चुकीच्या अफवा पसरवून (spreading false rumours) सामाजिक एकता अथवा शांततेचा भंग करणार्‍यांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कळवण पोलीस उपअधिक्षक अमोल गायकवाड यांनी दिला आहे. तालुक्यातील सावकी येथे आयोजित पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या संवाद बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

- Advertisement -

सावकी येथे चार-पाच दिवसांपूर्वी दोन गटात वाद झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला. गावात शांतता राहावी तसेच गणेशोत्सव देखील निर्विघ्नपणे पार पडावा या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमोल गायकवाड, पो.नि. दिलीप लांडगे यांनी गावात बैठक घेत ग्रामस्थांशी संवाद साधला.

शहर-गावात विविध जात, धर्म, पंथांचे नागरीक एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. सामाजिक एकोप्याने सर्व धर्मीयांचे सण साजरे केले जातात. परंतु काही असामाजिक व्यक्ती हे सामाजिक एकता भंग कशी होईल, असा प्रयत्न करत असल्याने असे कृत्य करणार्‍यांपासून ग्रामस्थांनी सावध राहत गावातील सर्वधर्मीय एकता कशी अबाधित राहिल याची दक्षता घेतली पाहिजे.

पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर असून कुणीही अफवा पसरवल्यास अथवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरूध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍यांची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना द्यावी तसेच जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करत समाजात फूट पाडणार्‍या शक्तींना दूर ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपअधिक्षक गायकवाड यांनी यावेळी बोलतांना केले.

समाजात शांतता राहावी या विचाराचे लोक असतात. मात्र काही जणांना शांतता रूचत नाही म्हणून ते विविध मार्ग शोधून भांडणे काढत असतात. अशा लोकांवर मात करण्यासाठी सर्वधर्मीय एकतेचे अनुकरण करणार्‍या ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. समाज माध्यमांव्दारे होणार्‍या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. तसेच आपल्या गावात जातीय व धार्मिक वाद निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरीकाने घ्यावी, असे आवाहन पो.नि. दिलीप लांडगे यांनी यावेळी बोलतांना केले.

याप्रसंगी उपनिरीक्षक विक्रांत कचरे, सरपंच जिजाबाई वाघ, उपसरपंच रोहिणी निकम, तलाठी नितीन धोंडगे, पोलीस पाटील अश्विनी बच्छाव, पोलीस नाईक ज्योती गोसावी आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या