Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याबोगस बियाणांच्या विरोधात कडक कायदा करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोगस बियाणांच्या विरोधात कडक कायदा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील शेतकऱ्यांबद्दल (Farmers) केवळ विरोधकांनाच चिंता आहे असे नाही, तर सरकारलाही गांभीर्य आहे. अपुऱ्या पावसामुळे (Rain) शेतकरी हवालदिल झाला असला तरी सरकारचे सर्व परिस्थितीकडे लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणार, असल्याची ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी विधानसभेत (Assembly) विरोधकांची टीका खोडून काढली. तसेच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून यासंदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले…

- Advertisement -

विधानसभेत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्या, त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावर फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. अपुऱ्या पावसासंदर्भात रविवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला आहे. काही भागात पाऊस कमी आहे. काही भागात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत, हे खरे आहे. गेल्यावर्षी या काळात पेरण्या झाल्या होत्या, त्याच्या ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

नाशिक, पुणे विभागातील काही भागात पेरण्या कमी आहेत. पुढचा आठवडाभर पाऊस होणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा (Indian Meteorological Department) अहवाल आहे. त्यामुळे पेरण्या योग्यप्रकारे होतील, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात एक समिती देखील स्थापन करण्यात आली असून पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, पीक हातून गेले किंवा दुबार पेरणीची वेळ आली तर त्यासंदर्भात आराखडाही तयार केला असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तर गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी १० हजार कोटी रूपये देण्यात आले. यामध्ये नियमित कर्ज भरणारे शेतकरीही आहेत. यातील साडेसोळा लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ५० हजार शेतकरी बाकी आहेत. केवायसी न झाल्यामुळे त्यांना मदत मिळालेली नाही. बाकी सर्वांना मदत दिलेली आहे. त्यामुळे विरोधकांना फक्त शेतकऱ्यांची चिंता आहे आणि सरकारला चिंता नाही असा आव आणू नका, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

तसेच बोगस बियाणांची (Seed) विक्री रोखण्यासाठी कायदा अधिक कडक करण्यात येणार आहे. राज्य सरकारने बीटी बियाणाच्या बाबतीत कायदा केला आहे. त्यानुसार बियाणे फुकट गेल्यास कंपन्यांवर थेट कारवाई करता येते आणि शेतकऱ्यांना पैसेही देता येतात. त्याचप्रकारे इतर बियाणांकरता देखील आपण कायदा करत आहोत. सध्याच्या कायद्यात बोगस बियाणात आरोपीला जामीन मिळतो. आता बोगस बियाणांचा विषय जीवनावश्य्क कायद्यात आणून हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या