Friday, September 20, 2024
Homeनाशिकआदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री दादा भुसे

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दादा भुसे

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

जागतिक आदिवासी गौरव दिन व क्रांती दिनाच्या माध्यमातून आदिवासी बाधंवाची संस्कृती, परंपरा व कलागुणांचे अद्भुत दर्शन होते. या परंपरा व संस्कृतीला जोपासण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांची माहिती होवून वाव मिळण्यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

आदिवासी गौरव दिनानिमित्त येथील कॉलेज मैदानावर जागतिक आदिवासी गौरव दिन व क्रांती दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रा, जनजागृती मेळावा व गुणगौरव सोहळा तसेच शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री दादा भुसे यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उप विभागीय अधिकारी नितिन सदगीर, तहसिलदार विशाल सोनवणे, नंदुरबारचे जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे यांच्यासह विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले की,आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ होण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील गोरगरिब विद्यार्थ्यांना जेईई या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या प्रवेश परिक्षेसाठी मोफत मार्गदर्शन, महाविद्यालय प्रवेश व राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उत्तम नियोजनामुळे व पिंप्री सैय्यद उपाध्ये कॉलेज ऑफ सायन्सचे प्राध्यापक संतोष तिवारी यांच्या मार्गदर्शनाने प्रथम वर्षी सुपर ५० योजनेंतर्गत ५० विद्यार्थ्यांना लाभ झाला. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स या परिक्षेत नैपुण्य प्राप्त करुन आयआयटी प्रवेश निश्चित झाला असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आदिवासी बांधवांच्या जमिनीच्या सातबारावरील पोटखराब शब्द काढून लागवड योग्य सातबारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिल्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शबरी घरकुल योजनेंतर्गत तालुक्यातील तीन हजार आदिवासी बांधवांना घरकुल वाटप करण्यात येणार आहे. ज्या आदिवासी बांधवाना घरकुलाची आवश्यकता आहे, अशा लाभार्थ्यांनी गावातील ग्रामसेवकाकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन ही पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी केले.

प्रारंभी पालकमंत्री भुसे यांनी भगवान वीर एकलव्य महाराज पुतळ्यास व क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शहरात आदिवासी महापुरुषांची भव्य मिरवणुक काढण्यात आली व पारंपरिक आदिवासी नृत्य तसेच सांस्कृतिक उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते.

आयआयटीमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सुपर ५० जेईई मेन अ‍ॅ‍ॅडव्हान्स परिक्षेत नैपुण्य प्राप्त करुन आयआयटी प्रवेश निश्चित झालेल्या हर्षदा वाटाणे, सागर जाधव, मंगेश इम्पाळ, निरंजन बहीराम यांच्यासाह विविध शालेत परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या आरती नाईक, अजय माळी, जितेंद्र माळी, करण पवार, रवीन पवार, बन्सी सोनवणे, जयश्री मोरे, स्नेहा नाईक, आकाश कुवर, वंचिका माळी, आदित्य सोनवणे, गणेश सोनवणे, लक्ष्मण बोरसे, बिंदू सोनवणे, शिवम पगारे, प्रियंका माळी, देवेंद्र तलवारे, शुभम गायकवाड, ममता पवार व प्रियंका पवार या विद्यार्थ्यांचा व गिरणा नदी पात्रात अडकलेल्या मच्छिमारांना अन्न पाकिट पुरवणारे मोतीराम सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या