Monday, November 25, 2024
Homeअग्रलेख‘कादवा’चे दमदार पाऊल!

‘कादवा’चे दमदार पाऊल!

हकार क्षेत्राने महाराष्ट्राला नवी दिशा दिली. ग्रामीण विकासाचे नवे पर्व सुरू झाले. सहकारी तत्वावर सुरू झालेल्या साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्तेचे स्वप्न दाखवले. स्वप्न केवळ दाखवलेच नाही तर कित्येकांनी ते अनुभवलेही. मात्र मधल्या काळात सहकारी साखर कारखानदारीला घरघर लागली. जिल्ह्या-जिल्ह्यांतील साखर कारखान्यांवर आर्थिक संकटे ओढवली. अनेक कारखाने कर्जाच्या खाईत रुतले. काही कारखाने तोट्याच्या गाळात जाणीवपूर्वक रूतवले गेले. त्यामुळे कितीतरी बंद पडले. काही अवसायानात निघाले. पाहता-पाहता राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला घरघर लागली, पण प्रामाणिकपणे आणि ध्येयवादाने काम करणार्‍या काही संचालक मंडळांनी आपापल्या कारखान्यांचे अस्तित्व टिकवून ठेवले. अडचणींतून मार्ग काढला. तोटा कमी करून कारखाने सावरण्यासाठी वेगवेगळे पर्याय आजमावले. ते कारखाने आजही तग धरून यशस्वी वाटचाल करीत आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडीचा कादवा सहकारी साखर कारखाना अशा काही कारखान्यांपैकी एक! या कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्याच हस्ते नुकतेच झाले. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी हजर होती. कारखान्याच्या वाटचालीबद्दल पवार यांनी प्रशंसोद‍्गार काढले. नाशिक जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीबद्दल सध्या फारसे आशादायक चित्र नसताना कादवाच्या संचालक मंडळाने अडचणींपुढे हतबल न होता परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच हा कारखाना आजही टिकून यशस्वी वाटचाल करीत आहे. कारखान्याचे नेतृत्व अनेक वर्षांपासून श्रीराम शेटे यांच्या हाती आहे. चांगला मार्गदर्शक मिळाला की प्रतिकूलतेवर मात करता येते आणि यशाचा मार्गही गवसतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन शेटे आणि कादवा कारखान्याला वेळोवेळी मिळते, असे कारखान्याचे संचालक अभिमानाने सांगतात. कारखान्याचा कारभार पारदर्शीपणे चालवणारे शेटे कारखान्याचे अध्यक्ष असले तरी त्यांच्यासाठी अथवा संचालकांसाठी कारखान्याची गाडी नाही. म्हणजे कारखान्याच्या खर्चाने गाड्यांची हौस कारखान्याचे संचालक भागवत नाहीत. काटकसर करायची, पण ती कशी त्याचे कादवा अध्यक्ष आणि संचालकांनी राज्यातील कारखान्यापुढे ठेवलेले हे एक अनुकरणीय उदाहरण म्हणता येईल. खुद्द शरद पवार यांनाही त्याचे कौतुक वाटते. देशातील साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याचे साखरेला पुरेसा उठाव नाही. साखरेलाही चांगले भाव नाहीत. परिणामी साखर उत्पादन करून  कारखाने अडचणीत आलेले आहेत. जगातील साखर कारखाने केवळ साखर उत्पादनच नव्हे तर इथेनॉलसह विविध उपपदार्थ उत्पादित करून अडचणींवर मात करीत आहेत. कादवा कारखान्यानेही इथेनॉल प्रकल्प सुरू करावा, असे पवार यांनी सुचवले होते. शेटे यांनी पवारांचा सल्ला शिरसावंद्य मानला. कारखान्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आणि त्याला मंजुरीही मिळाली. कमी वेळेत कादवाचा इथेनॉल प्रकल्प आकारास आला आहे. या एका निर्णयाने कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पुढील काही वर्षांत किमान शंभर रूपये जादा भाव निश्‍चित मिळेल, असा विश्‍वास पवार यांनी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. अनेक कारखाने आर्थिक संकटामुळे शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे वेळेवर देऊ शकत नाहीत. याउलट कादवा मात्र ऊसाला किमान शंभर रूपये जादा भाव देणार, ही कारखाना कार्यक्षेत्रातील  शेतकर्‍यांसाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे. कारखाना तोट्यात असल्याचे रडगाणे सार्वत्रिक सुरू असताना कादवा कारखान्याने प्रगतीच्या दिशेने टाकलेले पाऊल कौतुकास्पद आणि आशादायक आहे. त्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या