Wednesday, June 26, 2024
Homeनगर4 हजार विद्यार्थ्यांचा ‘आधार’चा प्रश्न

4 हजार विद्यार्थ्यांचा ‘आधार’चा प्रश्न

शिक्षण विभाग || दीड हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध

ज्ञानेश दुधाडे | अहमदनगर | Ahmednagar

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी शिक्षण विभागाने वेळोवेळी सूचना देऊनही शाळांनी टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे. परिणामी, अजूनही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती जुळत नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात 4 हजार विद्यार्थ्यांचा ‘आधार’ चा प्रश्न असून दीड हजार विद्यार्थ्याचे आधार अवैध असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने आता आधार कार्डनुसारच शाळांची संचमान्यता करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आधार प्रमाणित विद्यार्थी गृहीत धरले जाणार आहेत. त्याच माध्यमातून संचमान्यता केली जाणार आहे. मात्र, ज्या आधार कार्डमध्ये तफावती आढळल्या आहेत, त्यांची माहितीही या संचमान्यतेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पटसंख्या कमी झाल्याने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे रखडलेले समायोजन करण्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यमाच्या शाळामधील 3 लाख 20 हजार 416 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 16 हजार 328 विद्यार्थ्यांची आधाराची माहिती व्हेरिफाय करून ती अपलोड करण्यात आलेली आहे. 4 हजार 88 विद्यार्थ्याचे आधारची माहिती अद्याप भरण्यात आलेली आहे. या माहितीबाबत प्रश्न चिन्ह असून शिक्षण विभागने त्यावर चुप्पी साधण्यात धन्यता मानली आहे.

दुसरीकडे शिक्षण विभागाच्या माहितीनूसार जिल्ह्यात पहिले ते आठवीपर्यंत सर्व माध्यमाच्या शाळांमधील 3 लाख 10 हजार 830 विद्यार्थ्याचे आधारकार्ड हे व्हॉलीड आहेत. यामुळे उर्वरित विद्यार्थ्याच्या आधारचे काय असा प्रश्न आहे. शिक्षण विभागाने सरल पोर्टलवर 14 मे 2024 अखेर जिल्ह्यातील 4 हजार 56 शाळांमधील 96.43 टक्के विद्यार्थ्यांची माहिती सरल पोर्टलवर अपलोड केलेली आहे. शालेय शिक्षण विभागाने देखील आधारकार्ड संदर्भात काही तफावती आढळल्यास संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी शहानिशा करून निर्णय घ्यावा. मात्र, त्यासाठीची सर्व प्रकरणे ही आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. मात्र, त्यावर काय कार्यवाही झाली याचा तपाशील दिला जात नसल्याचे या प्रकरणातील संशय वाढत आहे.

पाच लाख आधार बोगस
राज्यात पाच लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बोगस दाखवून अनुदान लाटल्याची चर्चा शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात आहे. शिक्षकांची पटसंख्या कमी होवू नयेत, यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात आधारकार्ड नसतांना 5 लाख 16 हजार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला असून आधारकार्ड सक्ती केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याबाबत काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वाचे लक्ष असून शिक्षण विभाग दरवर्षी 500 कोटी रुपये शिक्षणावर खर्च करत असल्याचे सांगण्यात आले.

आधार नसणारे आणि कंसात बोगस आधार असणारे
अकोले 150 (48), जामखेड 228 (79), कर्जत 256 (44), कोपरगाव 382 (100), महानगर पालिका 300 (153), नगर 306 (182), नेवासा 353 (92), पारनेर 277 (130), पाथर्डी 235 (73), राहाता 295 (106), राहुरी 127 (92), संगमनेर 362 (154), शेवगाव 293 (60), श्रीगोंदा 137 (91), श्रीरामपूर 387 (125) असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या