Wednesday, May 22, 2024
Homeनगरमहाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांकडून एकास फायटरने मारहाण

महाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांकडून एकास फायटरने मारहाण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहात्यातील 12 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यास त्याच महाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांनी फायटने मारहाण करून दुखापत केल्या प्रकरणी राहाता पोलिसात या 4 विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारहाणीमुळे पालक व विद्यार्थी भयभीत झाले आहे.

- Advertisement -

याबाबत पियुष भगवान वाघमारे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी वर्गात झालेल्या वादाच्या कारणावरून रोहित गायकवाड, विर यादव, यश पठारे, शुभम अजबे यांनी मला व माझा मित्र अमन सय्यद यास राहाता बस स्टँडसमोर आडवून तुम्ही जास्त शहाणे झाले काय असे म्हणून अमनच्या कानाखाली मारून त्याच्या ओठावर बुकीने मारले.

तेव्हा मी त्यांचे वाद सोडवण्यासाठी गेलो असता वीर यादव याने त्याच्या हातात असलेल्या फायटरने माझ्या डोक्यात व पाठीमागून मारून मला दुखापत केली. तसेच त्याच्या सोबत असलेल्या यश पठारे व शुभम आजबे यांनी मला व माझ्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून तुमच्याकडे बघतो अशी धमकी दिली, अशी फिर्याद पियुष वाघमारे यांनी राहाता पोलिसात दिली.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी रोहित गायकवाड, वीर यादव, यश पठारे, शुभम आजबे या चौघांविरोधात भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार तुपे करीत आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी महाविद्यालय सुटल्यानंतर अनेकदा रोडवर उभे राहून वादविवाद करतात. परिणामी विद्यालय व महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनात भीती व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. टारगटपणा करणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वेळीच समज द्यावी, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या