संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
पुणे जिल्ह्यातील निरगुडसर (ता. आंबेगाव) मधून 12 वर्षीय मुलाचे अपहरण करणार्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी 9 वाजेच्या सुमारास ढोलेवाडी परिसरात घडली. राजेश रोहिदास जंबुकर (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) असे त्याचे नाव आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना व नागरिकांना दरवाजा उघडण्यासाठी वेळ लागला. तोपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता. तर या तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून ती पोलिसांच्या हाती लागली आहे. यामधून काही उलगडा होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निरगुडसर ता. आंबेगाव (जि.पुणे) येथील 12 वर्षीय आर्यन विक्रम चव्हाण या विद्यार्थ्याचे पंडीत जवाहरलाल नेहरू या विद्यालयातून आरोपी राजेश जंबुकर या तरुणाने दि. 11 डिसेंबर 2024 रोजी अपहरण केले होते. त्यावरून पारगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून तो पसार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पारगाव पोलिसांनी संगमनेरात तळ ठोकले, पण राजेशचा शोध पोलिसांना लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फोटो व नाव टाकून त्याची माहिती सोशल मीडियावर टाकली तरी देखील तो मिळून आला नाही.
दरम्यान, काल मंगळवारी सकाळी राजेश जंबुकर हा आपल्या घरी आला. तो कोणाशी फारसे न बोलता दुसर्या मजल्यावर गेला आणि घराचे दोन्ही दरवाजे बंद करून त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घराचे दरवाजे तो उघडत नसल्याने घरच्यांना संशय येऊ लागला. तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. पोलिसांना तत्काळ कळवले असता ते घटनास्थळी आले. मात्र, दरवाजा उघडेपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता. त्याला खाली घेतले असता त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
अनेक संशयितांची चौकशी सुरु
पुणे जिल्ह्यातील निरगुडसर गावातून 12 वर्षीय आर्यन चव्हाण याचे मयत राजेश जंबुकर याने अपहरण का केले? जंबुकर आणि चव्हाण कुटुंबाचे काही वैर होते का? कारण आरोपी भरशाळेतून 11 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आर्यन चव्हाणचे अपहरण करतो, त्यानंतर पसार होतो, घरी येऊन आत्महत्या करतो त्यानंतर अपहरण केलेल्या आर्यनचा मृतदेह सापडला त्यामुळे अनेक संशयितांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
आंबेगाव येथून अपहरण झालेल्या मुलाचा खून, मृतदेह विहिरीत
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून अपहरण झालेल्या बारा वर्षाच्या विद्यार्थ्यांचा खून करून पडलेल्या विहीरीत टाकला. जेव्हा या अपहरण झालेल्या बारा वर्षीय विद्यार्थ्याला विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्याचा संपूर्ण चेहरा हा जळालेल्या अवस्थेमध्ये आढळला. आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला ्. पोलिसांच्या तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा मुलगा आणि जंबुकर हा आरोपी एका हॉटेलमध्ये नाश्ता करत असल्याचे दिसत असून बारा दिवसांपूर्वी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे चित्र समजले. यानंतर काल रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात जळालेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे.