शिर्डी | प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रमा अंतर्गत शिर्डी शहरामध्ये विद्यार्थी, नागरीकांनी तिरंगा रॅली काढली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरमच्या’ जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून शिर्डी आणि परिसरातील प्रत्येक नागरीकाने घरावर तिरंगा उभारुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. मतदार संघातील प्रत्येक शहर, गाव आणि वाड्या वस्त्यांमध्ये नागरीकांना तिरंगा झेंडा देवून या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. शिर्डी शहरामध्ये या निमित्ताने तिरंगा रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये शहरातील साई निर्माण विद्यालय, आदर्श विद्यालय, उर्दु हायस्कुल, साई गुरुकुल या संस्थांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी आणि नागरीकांनी हातामध्ये तिरंगा झेंडा घेवून भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष केला. या तिरंगा रॅलीचे नागरीकांनी फुलांची उधळण करुन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणा आणि गितांनी अवघी साईनगरी राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेली. माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके, सचिन शिंदे, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, ताराचंद्र कोते, रवि गोंदकर, राम कोते, शाबीरभाई शेख, गजानन शिर्वेकर, तान्हाजी गोंदकर, मधुकर कोते, गफ्फार पठाण, विजय गोंदकर, योगेश गोंदकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.