Monday, May 27, 2024
Homeशब्दगंधसज्ज व्हा!

सज्ज व्हा!

– ज्योत्स्ना पाटील

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

- Advertisement -

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

मागील लेखात आपण ‘पद्मावत’ या चित्रपटातील गाण्याचा जो अभ्यास केला तो फक्त वरवरचा अभ्यास होता. ज्याप्रमाणे तुम्ही पुस्तकातील मूळ धडा किंवा पाठ न वाचता, समजून न घेता, त्यावर विचार न करता फक्त प्रश्नांची उत्तरे पाठ करतात त्याप्रमाणेच. आपण ‘घुमर घुमर घुमे’ या गाण्याविषयी वरवरची माहिती जाणून घेतली म्हणजे आपल्याला त्या गाण्यावर नृत्य करता येईल का? नाही ना! त्यासाठी तुम्हाला नृत्यातले बारकावे जाणून पुनःपुन्हा त्या स्टेप्स करून सराव केल्यानंतरच उत्कृष्टपणे, सफाईदारपणे नृत्य सादर करता येईल. मग अभ्यासाचेही तसेच आहे. पुस्तकातला पाठ वाचून त्यातील अवघड बाबींचा उदाहरणार्थ भाषा विषयाचा पाठ वाचल्यावर त्यातील अवघड शब्द, कठीण शब्द, वाक्प्रचार, वाक्प्रचारांचे अर्थ वहीत लिहून पुनःपुन्हा वाचून सरावाने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास वाक्यरचना करणे सुलभ जाते आणि मग भाषा विषय असो किंवा विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र अशा कोणत्याही विषयाचे आकलन सुलभपणे होत असते. विचारलेला प्रश्न कशाही पद्धतीने विचारला तरी त्याचे उत्तर स्वतःच्या भाषेत लिहिता येते.

विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना गणित, भूमिती या विषयांविषयी भीती वाटत असेल; परंतु एखाद्या गोष्टीची जर भीती वाटत असेल तर काय करायचे? यावर उपाय म्हणजे ती गोष्ट पुनःपुन्हा करून पाहणे. एखाद्या भीतीदायक गोष्टीचा सराव केल्याने भीती तर नाहीशी होतेच, पण ती गोष्ट करण्याचा आनंदही अधिक असतो.

‘घुमर घुमर घुमे’ या गाण्यातील गोल गोल फिरताना पायांच्या स्टेप्स करण्यासाठी दीपिका पदुकोणला दीड महिने पुनःपुन्हा सराव करावा लागला, तेव्हा कुठे त्या नृत्यात नजाकत आली. यावरून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेणे जरूरी आहे की, कोणताही विषय तुम्हाला आवडो किंवा न आवडो; परंतु तुम्ही जर पुनःपुन्हा सराव केला तर ती गोष्ट साध्य होत असते. याचाच अर्थ पुस्तकातील प्रत्येक पाठ पुनःपुन्हा वाचत राहिल्यास तुमच्यासमोर असलेले कोणत्याही विषयाचे पुस्तक तुम्हाला ज्ञानाचे भांडार खुले करून यशस्वी करेल यात शंकाच नाही.

चला तर मग मुलांनो (मुले-मुली), ‘पद्मावत’मधील दीपिकाचे फूटवर्क आठवून रीडिंग वर्क करायला सज्ज व्हा.

तुमची ताई

- Advertisment -

ताज्या बातम्या