Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधवस्तुस्थितीचा स्वीकार

वस्तुस्थितीचा स्वीकार

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

- Advertisement -

मागील लेखात आपण शालेय, महाविद्यालयीन जीवनात अयशस्वी झालेले पण जीवनात यशाचे शिखर गाठणार्‍या प्रसिद्ध व्यक्तींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बर्‍याचशा परीक्षांचे जवळ जवळ जून-जुलैत निकाल लागलेत. परीक्षांचे निकाल तर लागलेत. कुठे आनंद तर कुठे दुःख असा हा खेळ चालू होता. यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी या गुणांची खूप गरज असते याची प्रथमेशला जाणीव झाली होती. इयत्ता दहावीत प्रथमेशने यावर्षी प्रवेश करताच नियमितपणे अभ्यास करण्याची सवय लावून घेतली होती. आज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी प्रथमेश आईला म्हणाला, मी रितेशकडे जाऊन येतो आणि सायकल घेऊन धूम ठोकली. थोड्याच वेळात तो परत आला आणि दणकन सायकल स्टॅण्डवर लावली. तो घरात येताच आईने विचारले, आज शाळेत जायचा विचार आहे की नाही? काय करायचे शाळेत जाऊन! कितीही अभ्यास करा, मार्कस् मिळवा. तरीही मनासारखे कॉलेज कुठे मिळते? आईला प्रथमेशचा बदललेला नूर पाहून शंकाच आली. तिने स्पष्टच विचारले, काय झाले ते सांगशील का? आई, मी तुला सांगितल्याप्रमाणे रितेशकडेच गेलो होतो. मग तुझा मूड बिघडायला काय झाले? काही नाही गं आई, रितेशच्या घरी गेलो तर सगळ्यांचे चेहरे उतरलेले दिसले. मी घाबरलोच! नेमके काय झाले असेल? असा विचार करतच रितेशला हळूच विचारले, काय झाले? काका-काकू, तुम्ही सर्वजण नाराज का आहात? रितेशने बाहेर आल्यावर सांगितले, माझ्या ताईला बारावीला 92 टक्के गुण मिळूनही तिला पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून सगळ्यांचा मूड गेला. आई, मला आणि रितेशला तर टेन्शनच आले. आपल्याला यावर्षी परीक्षेत चांगले गुण नाही मिळाले तर काय करायचे? आम्ही कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? प्रथमेशचे बोलणे ऐकल्यावर प्रथमेशच्या आईला धस्स झाले! नववी-दहावीत शिकणारी ही मुले-मुली कसला-कसला विचार करून ताण घेत असतात. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांचे परिणाम मुलांवर किती वेगवेगळे रूप धारण करून येत असतात.

आईने विचारले, प्रथू, शेजारचा सौमित्र कोणत्या कंपनीत आहे? अगं आई तुझ्या त्या आवडत्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘इन्फोसिस’ कंपनीत आहे ना! हो का, तुला माहीत आहे तर… मग ऐक, सुधा मूर्तींचे पती नारायण मूर्ती यांना आयआयटी (खखढ) कानपूर या भारतातल्या नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला होता; परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते त्या संस्थेत प्रवेश घेऊ शकले नाहीत. वडिलांनी सांगितल्यानुसार त्यांनी स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.ई. केले; परंतु मनाशी बाळगलेल्या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी ‘इन्फोसिस’ या कंपनीची स्थापना करून नावारूपाला आणली आणि जगभर स्वतःचे नाव कमावले.

एका छोट्याशा खेड्यात, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून, कलेक्टर होणारे राजेंद्र भारूड यांना यशासाठी कोणत्या शाळेत व महाविद्यालयात शिक्षण घेतले हे महत्त्वाचे नसून आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत कसा मार्ग काढला हे महत्त्वाचे ठरले. त्यामुळे जे आपल्या हातात नाही त्या भविष्यातील गोष्टीमध्ये वेळ घालवण्याऐवजी, आज मी काय नवीन शिकलो यावर विचार करायचा. निरर्थक गोष्टींवर विचार करण्यापेक्षा जे समोर आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. आईने असे सांगताच प्रथमेश म्हणाला, अगं आई, तू तर क्षणात माझा ताण घालवला. तुझ्याशी बोलल्यावर खूप छान वाटले. प्रथमेशने असे म्हणताच त्याच्या आईचाही ताण दूर झाला.

चला तर मग विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, तुम्हीही ताणापासून दूर राहून नियमितपणे अभ्यास करून यशाकडे वाटचाल करा. पुढच्या भागात आपण पुन्हा आपला करिअरच्या खेळाचा पुढचा टप्पा खेळणार आहोत.

तुमची ताई.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या