ज्योत्स्ना पाटील
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
बहिणीने त्याची आवड लिहिली, याचा प्रथमेशला आनंद वाटला. आधी भाव खाणार्या प्रज्ञाने चक्क त्याच्या चार आवडींविषयी लिहिले आणि प्रथमेशला स्वतःच्या आवडीचा खेळ खेळण्यात मजा वाटू लागली. तो स्वतःशीच म्हणाला, मी तर या गोष्टींचा कधी विचारच केला नाही की, मला किती गोष्टी करायला आवडतात! मला हे इतरांनी सांगितल्यावर कळाले. खरेच, गंमत आहे ना! पण तरीही मला एक प्रश्न पडला की, प्रज्ञाने मी ‘मार्गदर्शक’ होणार म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तिला? अर्थात, हे कोडे प्रज्ञालाच विचारायला हवे; म्हणून तो प्रज्ञाकडे गेला तर आजोबा आणि प्रज्ञा दोघे बुद्धिबळ खेळत होते. प्रथमेश प्रज्ञाला पाहून म्हणाला, प्रज्ञा तू मार्गदर्शक लिहिले म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुला? मी इतरांना मार्गदर्शन करण्याइतका मोठाही नाही आणि ज्ञानीही नाही. प्रथमेशचे उद्गार ऐकून प्रज्ञाला त्याला चिडवायची आयतीच संधी मिळाली. ती हसू दाबतच म्हणाली, ते कळाले आम्हाला की तू किती ज्ञानी आहेस! हो की नाही हो आजोबा! आजोबांचे नाव घेताच आजोबा म्हणाले, प्रज्ञा तू मला मध्ये गोवू नकोस. तुम्ही बहीण-भाऊ बघा काय करायचे ते! आजोबांनी तटस्थ राहायचे ठरवताच प्रज्ञा म्हणाली, मार्गदर्शक म्हणजे गाईड, समुपदेशक अशा वेगळ्या क्षेत्रात तू करिअर करू शकतोस. तितक्यात प्रथमेश म्हणाला, मला काही गाईड वगैरे व्हायचे नाही. तितक्यात आजोबा त्याला मध्येच थांबवत म्हणाले, गाईड म्हणजे फक्त वाटाड्या असे मुळीच समजू नकोस. प्रज्ञा, प्रथमेश आज गाईडचे क्षेत्र खूप विस्तारले आहे. आज ‘गाईड’ या शब्दाची परिभाषा बदलून गेली आहे. एक गाईड, टूर मॅनेजर ते टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकापर्यंतचा करोडो रुपयांचा व्यवसाय उभा करू शकतो. टूर मॅनेजर म्हणजेच आजच्या गाईडची आधुनिक ओळख. देश-विदेशात भ्रमण करत एक रुपयाही खर्च न करता संपूर्ण जग पालथा घालताना पैसे कमवणारा एकमेव प्राणी! अरे वा, आजोबा! टूर मॅनेजरचे करिअर तर फारच मजेशीर आहे. आजोबा म्हणाले, मजेशीर आहे, पण त्याकरता देशाचा व जगाचा इतिहास, भूगोल माहीत असावा लागतो. विविध संस्कृतींचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर समयसूचकता, व्यवस्थापन असावे लागते. सुसंवाद साधणे आवश्यक असते. सर्व वयोगटातल्या व भिन्न स्वभावाच्या भिन्न आवडीनिवडी असणार्या पर्यटकांना एकत्रित बांधून ठेवण्याची कला अवगत करावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून या व्यवसायातले एक एक टप्पे गाठून स्वतःची ट्रॅव्हल्स कंपनी स्थापणे सहज शक्य होते. तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष, मोठी स्वप्ने साकार करताना त्याचा सतत पाठपुरावा केल्यावरच पूर्ण होत असतात. आजोबांनी ‘गाईड’ या शब्दाची व्याप्ती प्रथमेश व प्रज्ञाला उलगडून दाखवली. तुमच्याही ती लक्षात आलीच असेल. याचा पुढचा भाग म्हणजेच मार्गदर्शकाची दुसरी बाजू म्हणजेच समुपदेशक. ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीचा शोध घेत राहा आणि स्पर्धेच्या युगात स्वतःला अपडेट करत राहा.
तुमची
ताई