अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील मल्हार चौकात झेरॉक्स काढण्याच्या निमित्ताने एका तरुणाने विद्यार्थिनीचा मोबाईल हातात घेत तिचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले आणि नंतर इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली. या प्रकारामुळे धक्कादायक अनुभव आलेल्या विद्यार्थिनीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अर्शद नाज हसन सय्यद (रा. सावजी थ्रेड जवळ, आशा टॉकीज चौक, अहिल्यानगर) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. 11 एप्रिल) दुपारी घडली. उच्च शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मल्हार चौकातील झेरॉक्स दुकानात आपल्या आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी गेली होती.
झेरॉक्ससाठी पीडीएफ पाठवण्यासाठी तिने संबंधित तरूणाच्या मोबाईल नंबरवर फाईल पाठवली. मात्र, फाईल प्रिंट होत नसल्याचे कारण देत संबंधित तरुणाने ब्लूटूथद्वारे फाईल पाठवा असे सांगितले. विद्यार्थिनीला तांत्रिक अडचणीमुळे ब्लूटूथद्वारे फाईल शेअर करता आली नाही. त्यामुळे संबंधित तरुणाने स्वतः तिचा मोबाईल हातात घेतला. बराच वेळ मोबाईल त्याच्याकडेच होता. काही वेळानंतर मोबाईल आणि झेरॉक्स कागदपत्रे तिला परत देण्यात आली. घरी परत जात असताना तिच्या मोबाईलवर इंस्टाग्रामवरून एक रिक्वेस्ट आली. संबंधित रिक्वेस्ट तपासल्यानंतर झेरॉक्स काढणार्या व्यक्तीचीच असल्याचे तिला लक्षात आले. तसेच तिच्या फोनमधील काही फोटो फॉरवर्ड झाल्याचेही तिला जाणवले. या प्रकारामुळे मानसिक त्रास झालेल्या विद्यार्थिनीने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.