आपल्या अवतीभवती शिक्षकांचा मोठा समूह आहे. महाराष्ट्रात सुमारे साडेसात लाख प्राथमिक शिक्षक आहे. त्या पलिकडे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचाही समूह आहे. शिक्षक होण्यासाठी विविध पदव्या त्या समूहाने धारण केल्या आहेत. त्या पदव्यांमुळे नोकरी मिळाली आणि त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षक होण्याची संधी मिळाली. पदवी घेतलेला प्रत्येकजन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहात असतो आणि प्रत्येकांने असे स्वप्न पाहाणे साहजिक आहे. मिळालेल्या पदवी वरती आपण शिक्षक होऊ शकतो, पण शिक्षक म्हणून समाजाला आणि विचारवंताना अपेक्षित असलेली उंची मात्र प्राप्त करता येत नाही.
पुस्तकांने आपणाला माहिती संपन्नता आणता येते. मात्र त्यातून शहाणपण येईलच असे मात्र नाही. खरेतर ज्यांच्यामध्ये शहाणपण सामावलेले असते तोच खरा शिक्षक. शहाणपणाच्या वाटेने चालणारा शिक्षक होण्याच्या प्रवासासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात आणि बरेच काही सोसावे लागते. शिक्षक होणे ही केवळ नोकरी नाही. सामाजिक परीवर्तनाच्या लढाईत शिक्षक हा महत्वाचा अग्रदूत आहे. समाजमनावर प्रभाव टाकायचा असेल तर केवळ पुस्तक वाचून माहितीच्या आधारे परीक्षा देऊन, पदवी घेऊन निर्माण झालेला शिक्षक प्रभावहीन व कणाहीन असण्याची शक्यता अधिक आहे. ज्यांनी जीवनात शहाणपण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे तीच माणसं शिक्षकी पेशावरती आपली मुद्रा उमटवू शकली आहेत. अशी संख्या मात्र बोटावरती मोजावी इतकीच.. कारण ती वाट कठिण आहे.
मुलं खरचं शिक्षक असतात…
भारतीय स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक संघर्षातील संघर्ष गाथा समजावूऩ घेतली तर विविध सामाजिक राजकिय चळवळीत शिक्षकांनी मोठया प्रमाणावर योगदान दिल्याचे अधोरेखित होते. शिक्षक होणे जगातील अत्यंत पवित्र पेशाचा प्रवास मानला जातो. स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान लोकमान्य टिळकांना विचारण्यात आले, की स्वातंत्र्यांचे समर थांबले तर पुढे काय? तेव्हा ते म्हणाले मी शिक्षक होईल. सावरकरांना विचारले स्वातंत्र्याच्या लढाईनंतर पुढे काय? तेव्हा तेही म्हणाले मी अध्यापनाचे काम करेल. अगदी अलिकडचा इतिहास समजून घेतला तर माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांनी म्हटले, की माझा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर पुन्हा मी शिकविण्याचे काम करेल. मुळात शिक्षकी पेशा हा समाजाला योग्य दिशेने घेऊन जातानांच समाज घडविणारा आणि राष्ट्र निर्माण करणारा पेशा आहे. त्यामुळे स्वातंत्र्य युध्द संपले तरी त्यानंतर त्याच दिशेचा प्रवास घडावा या करीता अनेक स्वातंत्र्य सैनिक शिक्षक होण्यास तयार होते.
जगात जी राष्ट्र प्रगत आहेत त्या देशातील शिक्षक अधिक प्रगत आहेत. शिक्षकांची जितकी उंची तितकीच राष्ट्राची उंची असते. समाजमनात स्वप्न पेरण्याचे काम तर शिक्षक करीत असतात. इराकमध्ये अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा दौ-यावरती गेले होते. त्यावेळी त्यांचे भाषण तेथील सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणार होते. ते भाषण त्या देशातील प्राध्यापक, शिक्षक यांच्यासाठी नियोजित करण्याचे आदेश स्थानिक नेतृत्वाच्या वतीने देण्यात आले. कोणत्याही परीस्थितीत त्या भाषणासाठी त्या देशातील मंत्री, खासदार वगैरे उपस्थित राहाणार नाही असे सक्त आदेश देण्यात आले होते.
आपण काय पेरतो आहोत..?
शिक्षकांसाठी आयोजित करण्यामागे त्या देशाच्या नेतृत्वाचे द्रष्टेपण होते. शेवटी उद्याचे राष्ट्र निर्मितीसाठी लागणारे मनुष्यबळ हे त्या देशातील शाळा, महाविद्यालयातून निर्माण होणार असते. त्यामुळे शिक्षक हे किती महत्वाचे आहे हे त्यांना माहित होते. शिक्षक जे स्वप्न पाहातो ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या देशाच्या इतिहासात चाणक्यांने घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यातून सत्ता संपुष्टात आल्याचा इतिहास आहे. त्यामुळे शिक्षकांची मस्तके अधिक ज्ञानसंपन्न असायला हवीत. देश केवळ राजकिय व्यवस्था आणि नेतृत्व घडवित नसते तर ख-या अर्थाने कोणत्याही देशाची जडणघडण ही त्या देशाची शिक्षणव्यवस्था उभारत असते. ती जितकी मजबूत असेल तितका देश प्रगतीचे पावले वेगाने टाकत असतो.
समाजाला अपेक्षित उंचीचा शिक्षक हा मुळात केवळ पुस्तके वाचून घडत नाही. पुस्तके वाचून फार तर माहिती मिळेल, पण माहिती मिळवून तो समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना माहिती देईल. त्या माहितीचा परीणाम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांवरती होण्याची शक्यता नाही. शिक्षकांची प्रतिमा ज्ञानसंपन्न अशी असेल तरच प्रभाव पडत असतो.त्याकरीता ज्ञानाची निर्मिती करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे कृतीशीलता हेच आहे, म्हणूनच शिक्षक अनुभव संपन्न असायला हवा. अनेकदा शिक्षण शास्त्राच्या पदव्या घेतांना आदर्श शिक्षकांची लक्षणे शिकवली जातात. पण ती शिकविणा-या माणसांत देखील ती लक्षणे नसतात. ती प्राप्त करण्यासाठी अनेकदा आय़ुष्य व्यतीत करावे लागते. शिक्षक होण्यासाठी लागणारे कौशल्य कदाचित दोन वर्षाच्या पदवी कालावधीत प्राप्त होतील, त्याने माहितीचे संप्रेषण होईल. मात्र शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवरती प्रभाव नाही पडणार.
घर हीच शाळा…
शिक्षक म्हणून अपेक्षित दृष्टीकोन येण्यासाठी जीवनात स्वतःला गाढून घ्यावे लागते. स्वतःला गाढून घेतल्याशिवाय शिक्षक होता येणार नाही. शिक्षक म्हणून नोकरी करता येईल पण मुलांच्या हदयातील शिक्षक होता येणार नाही. पुस्तक वाचून होणारा शिक्षक हा नोकरी करतो. मुलांच्या हदयांवरती संस्कार करण्यासाठी, जीवनाचे धडे गिरविण्यासाठी पुस्तकी शिक्षक फारसा उपयोगी ठरत नाही. विनोबा भावे म्हणाले तसे.. कागदाची होडी कोणालाही पाण्याच्या प्रवाहातून वाचू शकणार नाही. मुलांच्या हदयात स्थान प्राप्त करण्यासाठी मुलांनाच वाचावे लागेल. मुलं वाचण्यासाठी माणसांला हदय असावे लागतील. माणूस वाचायला निवळ डोळे उपयोगाचे नाही. त्या करीता हदय असावी लागतात. एकमेकाला हदयाची भाषा समजावी लागते. ती किती समजली यावरच शिकणे अवलंबून असते.
साने गुरूजी हे “गुरूजी” होते. त्यांचा समाजमनावर आज देखील प्रभाव आहे. शिक्षण असा शब्द उच्चारल्यानंतर ज्यांचे नाव त्याच्याशी जोडले जाते ते केवल साने गुरूजी यांचेच. त्यांनी आपल्या जीवनात पुस्तके वाचलीच पण त्याबरोबर मुलांचे मने वाचली होती. मुलांना नेमकी कशाची गरज आहे ते जाणत होते. मुलांच्या प्रति कळवळा होता. समाजा प्रति तळमळ होती. मुलांच्या जगण्यातील प्रक्रिया आणि त्यांचे जीवन यां संदर्भाने अनुभव होता. राष्ट्राप्रति त्यांचे काही स्वप्न होती. त्यामुळे आपण कोणत्या वाटेने जाण्याची गरज आहे हे त्यांना माहित होते. गुरूजी पहाटे उठून मुलांसाठी काही लिहित असायचे. मुले गुरूजींनी लिहिलेले वाचत होते. पहाटे उठून लिहिणा-या माणसांला अतिरिक्त कामाचे मानधन कोण बरे देत असेल..? गुरूजींनी ते का बरं कधी मागितले नाही.. आणि त्यांनाही कोणी दिले नाही.
तुम्ही फक्त इतकेच करा..!
साने गुरूजी हे पेशाने शिक्षक नव्हते तर अंतकरणाने शिक्षक होते हे कसे विसरता येईल. आपल्या मुलांसाठी आपण कार्यरत राहातांना घडयाळ्याकडे पाहून कसे चालेल..? घड्याळ म्हणजे नोकरी आणि घडयाळाशिवायचा प्रवास म्हणजे सेवा. मुलांचा उध्दार आणि प्रगती यातच राष्ट्राचे कल्याण सामावलेले असते.. मुलांच्या विकासासाठी स्वतःला झोकून देऊन काम केले जात असते तेव्हा त्यात घडयाळ आडवे येत नाही. स्वामी विवेकानंद हे ज्या दिवशी मृत्यू पावले त्या दिवशी देखील आश्रमात असलेल्या गुरूबंधूचा दुपारी तास घेतला होता. संस्कृतचे व्याकरण त्यांनी शिकविले होते. त्यानंतर आपल्या खोलीत गेले आणि झोपले.. ते पुन्हा उठलेच नाही. किती ही निष्ठा.
न्यूटन 17 वर्ष कोणत्याही विद्यार्थ्यांची उपस्थिती नसताना अध्यापन करीत होता. ही माणसं आपल्या कामाशी प्रामाणिक होती. शिक्षकांसाठीची ही निष्ठा म्हणजेच देशभक्ती आहे. अर्थात त्या माणसांची हदय ही गुरूजींची होती. त्यामुळे पुस्तके वाचून शिक्षक होणारी माणसं समाज व राष्ट्र घडू शकणार नाहीत. आपल्याला समाजात खरोखर परीवर्तन करायचे असेल तर आपण मुलांना वाचण्याची गरज आहे. गिजूभाई म्हणतात की पुस्तकाचे वाचन करणारी माणसांची झेप फारतर शिक्षक पदापर्यंत असेल. मात्र जी माणसं मुलांच्या मध्ये राहातात, रमतात, त्यांच्याशी संवाद करीत त्यांना समजावून घेतात. त्यांच्याकडून शिकण्याची तयारी ठेवतात ती माणसं अनुभव घेत शहाणे बनतात. शिक्षकीपेशात शहाणपणाचा प्रवास निंतात गरजेचा असतो. शहाणपणाचा प्रवास हा विवेकाचा असतो. विवेकाच्या पातळीवर जाणणे असते. तो प्रवास बालकांना स्वातंत्र्य देतो. त्यांना जाणून घेता येते. त्यामुळे शिक्षणाच्या प्रक्रियेत केवळ पुस्तके वाचून चांगल्या शिक्षकाचा प्रवास सुरू करता येत नाही. अनेकदा शिक्षक होताना आपल्याला मुलांकडून शिकावे लागते. त्यांच्याकडून देखील थडे शिकणे महत्वाचे आहे. विद्यार्थी हे आपल्यासाठी शिक्षक असतातच.. पण त्यांच्याकडून शिकण्याचा प्रवास आपल्याला शहाणपणाच्या दिशेने घेऊन जाण्यास मदत करणारा ठरणार आहे.
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..
खरतेर शिक्षणात काय आणि समाज व्यवस्थेत काय पुस्तकांनी माणूस पूर्णतःशहाणा होत नाही. मात्र तरी सुध्दा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी पुस्तके मदत करीत असतात. शहाणापणाचा प्रवास हा माणसं वाचूनच होत असतो. माणसं वाचनं हा अनुभव असतो. त्या अनुभवातून शहाणपणा आपोआप येतो. पुस्तके वाचल्याने फार तर माहितीसंपन्नता येते. मात्र ती संपन्नता ज्ञानापर्यंतचा प्रवास घडवत नाही. त्यामुळे ज्ञानासाठी आपल्याला अनुभवावरती अवंलबून राहावे लागते. ज्ञान मिळाले तर शहाणपण मिळेल. त्या शहाणपणाच विवेक असतोच.त्या विवेकाने जगण्याचे भान येते.त्यामुळे विवेकी असलेल्या शिक्षकासाठी प्रत्येक मुलं म्हणजे असामान्य असे जीवंत पुस्तकच असते. त्या मुलाचे आय़ुष्य वाचत जाणे आणि त्याच्या या प्रवासात असणारे अडथळे दूर सारणे, समृध्दतेची वाट निर्माण करणे महत्वाचे आहे. कारण प्रत्येक मुलं म्हणजे असामान्य असे जीवंत पुस्तक आहे.
आपण मुलांना गृहित का धरतो?
पुस्तके वाचून जे शिकतात ते शिक्षक होतात.
मुलांकडून जे धडे घेतात ते शहाणे होतात.
आणि प्रत्येक शहाण्यासाठी एक मूल हे असामान्य जीवंत पुस्तक आहे.
_संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)