पूर्वीच्या काळी एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले उमेदवार परस्परांचा आदर करत होते. जवळ पैसा नसताना विरोधकांकडून मदत घेण्यास नकार देण्याचा बाणेदारपणा त्यांच्याकडे होता. ‘मी चुकीचा उमेदवार दिला असेल तर त्याला पाडा,’ असे पक्षाध्यक्षच सांगत असे. असे असंख्य अनुभव आहेत. असेच काही किस्से.
बांसगाव मतदारसंघातील तत्कालीन खासदार फिरंगी प्रसाद यांच्या प्रचारार्थ 1977 मध्ये चौधरी चरणसिंह आले होते. चौरीचौरा रेल्वेस्थानकासमोर त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी मंचावर बसलेले फिरंगी प्रसाद यांचा हात पकडून त्यांना उठवले आणि म्हणाले, जर माझा उमेदवार अप्रामाणिक असेल तर त्याला जरूर पराभूत करा. त्यावर गर्दीतून आवाज आला, यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. फिरंगी प्रसाद यांनी ती निवडणूक जिंकली होती. मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मते त्यांना मिळाली. हा एक विक्रम मानला जातो. आज मात्र राजकारणात गुन्हेगारांचा जास्तच बोलबाला आहे. परंतु एक काळ असाही होता जेव्हा एखादा व्यक्ती कलंकित असूनही त्याला चुकीने तिकीट दिले गेले असेल तर त्याला पराभूत करा, असे त्याच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षच सांगत असे. आझमगढमध्ये 1989 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी लोकदलाचे श्याम करण यादव हे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारार्थ मेहता पार्कमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. चौधरी चरणसिंह यांचे भाषण होणार होते.
ते सभेत बोलण्यासाठी आले आणि लोकांसमोर आपली मतेही मांडली. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. परंतु भाषणादरम्यान त्यांनी असेही सांगितले की, जर मी तिकीट देण्यात चूक केली असेल तर तुम्ही मात्र चूक करू नका. त्यांचे हे शब्द ऐकून श्रोत्यांना धक्का बसला. चरणसिंह एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी असेही सांगितले की, माझा उमेदवार चोर, लुटारू किंवा गुंड असेल तर त्याची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे. त्यांच्याच सारखे आणखी एक नेते त्याकाळी होते ते म्हणजे बाबू विश्राम राय. ते जमीनदार घराण्यातील होते. विधानसभा निवडणूक लढवून ते विजयीही झाले. त्यांनी कधीच पेन्शन घेतली नाही. आज मात्र धनबळ आणि बाहुबळाचे सर्रास प्रदर्शन केले जात आहे. संपूर्ण निवडणूकच अशा व्यक्तींभोवती केंद्रित झाली आहे. मिळणारा लाभ सोडण्यास आज कोणीच तयार नाही.
बिहारच्या सुपौल जिल्ह्यात लहटन चौधरी आणि परमेश्वर कुंवर हे दोन नेते होते. राजकीय मैदानात दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. परंतु दोघांमध्ये असलेल्या व्यक्तिगत प्रेमात कधीच कटुता निर्माण झाली नाही. एकदा निवडणूक काळात लहटन चौधरी यांची गाडी नादुरूस्त झाली होती. त्याचवेळी तेथून परमेश्वर कुंवर निघाले होते. त्यांनी हे चित्र पाहिले तेव्हा आपल्या मोटारीवरील पक्षाचा झेंडा काढला आणि ती गाडी लहटन चौधरी यांना दिली. कुंवर पायी प्रचाराला चालले आहेत आणि लहटन यांनी त्यांना मोटारीतून सोडले, अशाही घटना घडल्या. बिहारचे समाजवादी नेते शिवशंकर यादव यांनी 1977 मध्ये जनता पक्षाच्या लाटेतसुद्धा त्या पक्षाचे तिकीट घेण्यास नकार दिला होता.
त्यांनी असे करण्याचे कारण म्हणजे 1971 मधील लोकसभा निवडणुकीत खगडिया मतदारसंघातून खासदार बनल्यानंतर त्यांना आलेला अनुभव चांगला नव्हता. 1971 मध्ये संयुक्त सोशालिस्ट पक्षाच्या निवडणूक चिन्हावर विजयी झालेल्या देशभरातील अवघ्या तीन उमेदवारांपैकी शिवशंकर यादव हे एक होते. 1977 च्या जनता लाटेत शिवशंकर यादव यांना खगडिया मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांचे उत्तर होते, मी तिकीटही घेणार नाही आणि निवडणूकही लढवणार नाही. निवडून आल्यानंतर लोक आपल्या चुकीच्या कामांचे समर्थन करण्यासाठी भेटायला येऊ लागले तर खासदार बनून काय उपयोग? एकदाच खासदार झालो, पण अशा कामांवर शिक्कामोर्तब करण्यास नकार देऊन-देऊन मी वैतागलो. असा वैताग यापुढे नकोच, असे माझा विवेक मला सांगतो.
उत्तराखंडचे हरिवंश कपूर हे 1985 मध्ये भाजपच्या तिकिटावर डेहराडून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना काँग्रेसचे उमेदवार हिरासिंह बिष्ट यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यांची ती पहिलीच निवडणूक होती. परंतु त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला. हिरासिंह बिष्ट सांगतात की, निवडणूक प्रचारादरम्यानही आम्ही एकाच चहाच्या दुकानात बसत होतो आणि चेष्टामस्करी करत होतो. एखाद्याला मदत करण्याची वेळ आलीच तर दोघे मिळून मदत करत होतो. हरिवंश कपूर यांनी कधीच कोणत्याही उमेदवारावर व्यक्तिगत प्रहार केले नाहीत. 1967 च्या निवडणुकीदरम्यान तेजसिंह भाटी नावाचे एक नेते होते. ते बुलंद शहर जिल्ह्याचे रहिवासी होते. तेजसिंह हे नेहमी एकटे आणि पायी निवडणुकीचा प्रचार करत असत. त्यांचे वैशिष्ट्य असे होते की, प्रचार करता-करता ज्या गावात संध्याकाळ होईल तिथेच ते मुक्कामाला थांबत असत.
त्या गावात मतदारांच्याच घरी भोजन करत असत. आपले कपडेही ते सोबत ठेवत असत. ज्या घरी ते मुक्कामाला थांबत तिथेच सकाळी कपडे धूत असत. गावातील लोकांसमोर सभा घेईपर्यंत कपडे वाळत असत. मग ते कपड्यांना इस्त्री करत असत.1977 मध्ये रिवा येथील महाराज मार्तंडसिंह हे प्रचार सुरू करण्यापूर्वी त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे समाजसेवक यमुनाप्रसाद शास्त्री यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेत असत. संपूर्ण प्रचारात ते त्यांच्याविरोधात एक शब्दही बोलत नसत. त्याचे कारण म्हणजे यमुनाप्रसाद शास्त्रींचे व्यक्तिमत्त्व. ते खरेखुरे समाजसेवक होते आणि गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झालेले होते.
नव्वदीच्या दशकापूर्वीच्या राजकारणातील आणखी एक उदाहरण म्हणजे घाटमपूर येथील काँग्रेस उमेदवार पंडित बेनीसिंह अवस्थी आणि सोशालिस्ट पक्षाचे प्रतिस्पर्धी कुंवर शिवनाथसिंह कुशवाहा. बेनीप्रसाद यांची जीप पाहून शिवनाथसिंह हे सायकलवरून खाली उतरत असत. पाया पडून बेनी बाबूंचे आशीर्वाद घेत असत. बेनी बाबूही त्यांना सांगत असत, शिवनाथ, तुमच्या अमूक एका बूथवर थोडी गडबड आहे. जरा लक्ष घाला. या दोघांनी 1962, 1967, 1969 आणि 1974 च्या निवडणुकांमध्ये भाग घेतला होता.
दोघांना एकमेकांबद्दल वाटणारा आदर इतका महत्त्वाचा वाटत असे की, चारही निवडणुकांमध्ये शिवनाथसिंह हे बेनीप्रसाद यांच्या मूळ गावी म्हणजे बिरसिंहपूरमध्ये मते मागायला कधीच गेले नाहीत. सोशालिस्ट पक्षाच्या समर्थकांनी अतिउत्साहीपणे जर बेनी बाबूंच्या विरोधात आक्षेपार्ह नारेबाजी केली तर शिवनाथसिंह कार्यकर्त्यांना रागवत असत. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचीही आठवण आजच्या संदर्भात केली जाणे आवश्यक ठरते. राजकारणात एवढा मोठा प्रवास केल्यानंतर जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा आपल्या कुटुंबियांना वारसा हक्काने देण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे घरसुद्धा नव्हते.
पाटण्यात किंवा आपल्या मूळ गावात एक इंच जमीनसुद्धा त्यांच्या नावावर नव्हती. कर्पूरी ठाकूर जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे दूरचे मेहुणे नोकरीसाठी त्यांना भेटले. कुठेतरी शिफारस करून मला नोकरी मिळवून द्या, अशी त्यांना विनंती केली. परंतु त्यांचे ऐकून घेतल्यानंतर कर्पूरी ठाकूर यांनी खिशातून पन्नास रुपये काढून त्या व्यक्तीच्या हातावर टेकवले आणि म्हणाले, जा, आपला पारंपरिक व्यवसाय सुरू करा. जेव्हा कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या गावातील काही जमीनदारांनी त्यांच्या वडिलांचा अपमान केला. जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा जिल्हाधिकारी स्वतः कारवाई करण्यासाठी गावात पोहोचले. परंतु कर्पूरी ठाकूर यांनी जिल्हाधिकार्यांना रोखले. त्यांचे म्हणणे होते, मागास समाजातील लोकांचा अपमान तर गावागावांत होत आहे. रोखायचेच असतील तर प्रत्येक गावात जाऊन असे प्रकार रोखा.
लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांना मिळालेली सरकारी गाडी एकदा त्यांचे चिरंजीव सुनील शास्त्री घेऊन कुठेतरी गेले. परत आल्यावर शास्त्रीजींनी त्यांना सांगितले की, सरकारी गाडी ना पंतप्रधानांसाठी आहे ना अन्य कोणासाठी. यापुढे कुठेही जायचे असल्यास घरच्या गाडीचा वापर करावा. गाडी किती किलोमीटर चालली आहे, हे त्यांनी चालकाला विचारले आणि तेवढी रक्कम सरकारी कोषात जमा केली. समाजवादी विचारवंत नंदकिशोर यांचे नाव लोकांनी फारसे ऐकलेले नसेल. उन्नाव जिल्ह्यातील ओसिया गावात जन्मलेले नंदकिशोर हे डॉ. राममनोहर लोहिया यांचे सचिव होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जावई फिरोज गांधी यांच्याविरोधात डॉ. लोहिया यांनी 1957 मध्ये नंदकिशोर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी समाजवादी पक्षाला फारसे गांभीर्याने घेतले जात नसे.
देणग्याही मिळत नसत. नंदकिशोर जेव्हा दिल्लीहून निघाले तेव्हा लोहियांनी खिशात हात घातला. तीनशेच रुपये निघाले. याहून अधिक देणे माझ्या हातात नाही. फिरोज गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नंदकिशोर यांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. उमेदवारीसाठी पाचशे रुपये भरावे लागणार होते आणि नंदकिशोर यांच्याकडे अवघे तीनशे होते. मी फिरोज गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवू इच्छितो आणि माझ्याकडे फक्त तीनशे रुपये आहेत. मला दोनशे रुपयांची गरज आहे, असे त्यांनी संबंधित कार्यालयासमोर जमलेल्या लोकांना सांगितले. लोक पैसे देऊ लागले. त्यावेळी फिरोज गांधी यांनी त्यांना बोलावले आणि दोनशे रुपये दिले. त्यावेळी नंदकिशोर हात जोडून म्हणाले, नको, मी तुमच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहे. तुमच्याकडूनच पैसे घेतले तर उमेदवार बनणे मला शोभणार नाही. कसेबसे दोनशे रुपये जमल्यानंतरच नंदकिशोर यांनी अर्ज भरला.
असे असंख्य किस्से आपल्याला भूतकाळात आढळतात. म्हणजेच, ही उज्ज्वल परंपरा आपल्याकडे आहे. प्रश्न असा की, आज आपण ती जपतो का? असे किस्से आजच्या काळात ऐकायला मिळतील का? आज संपूर्ण लोकशाही केवळ यशस्वीतेच्या निकषावर टिकून राहिली आहे. पण तरीही जे नाही त्याचे शल्य कुणालाच नाही. ही रिक्ततेची जाणीव जीवघेणी आहे.
योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक