Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंध‘ई’ कचर्‍याचा असाही वापर

‘ई’ कचर्‍याचा असाही वापर

अलीकडच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदके तयार करण्यासाठी लागणारे धातू लोकांनी दान केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मिळवण्यात आले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच रिसायकलिंग केलेल्या ई-कचर्‍याच्या मदतीने पदके तयार करण्यात आली. ई कचर्‍याच्या प्रचंड निर्मितीप्रती सजगता आणि त्याच्या पुनर्वापराप्रती धोरणे म्हणून या अनोख्या उपक्रमाकडे बघता येईल.

डॉ. दीपक शिकारपूर

बराच काळ ठाण मांडून बसलेल्या करोना विषाणूने आपल्या जीवनचर्येत आमूलाग्र बदल घडवून आणला. या विषाणूच्या उद्रेकामुळे जगभरातल्या काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भूतो न भविष्यती’ असा परिणाम दिसून आला. अद्यापही ही स्थिती निवळलेली नाही. थोड्या थोड्या दिवसांनंतर करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूची चर्चा गाजते आणि भविष्यातही हा धोका कायम राहण्याचे संकेत मिळतात. त्यामुळेच नजिकच्या भविष्यात तरी ही परिस्थिती पालटण्याची आशा बाळगणे व्यर्थ ठरणार आहे. साहजिकच पुढील काळातही लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडलेले पाहायला आणि अनुभवायला मिळणे कठीण आहे. त्यामुळेच कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे जगातल्या जवळपास सर्वच देशांचा कल दिसून येत आहे. येत्या काळात तो वाढतच जाणार आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना आवडो वा न आवडो, आता अनेकांच्या हळूहळू अंगवळणी पडली आहे. इंटरनेट, वेब आणि संगणक यांच्या संयोगाने नानाविध दैनंदिन व्यवहार पार पाडण्याचा सोपा मार्ग आता बहुतेकांना सापडला आहे. अनेकांनी तो अवलंबण्यास सुरुवातही केली आहे. ई-ट्रेडिंग, ई-कॉमर्स, ई-पेमेंट आदींसारख्या अनेक बाबींमागील ‘ई’ हे अक्षर आता परिचयाचे होऊ लागले आहे. परंतु ग्राहकोपयोगी वस्तूंची रेलचेल करणार्‍या अशा आधुनिक, विकसित (खरे तर चंगळवादी) जमान्यात (नष्ट न होणार्‍या) कचर्‍याचा भस्मासूरही जागा होऊ लागला असून दुर्दैवाने तिथेही ‘ई’ने आपला शिक्का उमटवला आहे.

- Advertisement -

सध्याच्या व्हर्च्युअल जीवन पद्धतीत आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या क्षेत्रात होणार्‍या अभिनव संशोधनामुळे सतत नवनवीन उपकरणे बाजारात येत आहेत. साहजिकच जुन्या उपकरणांची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आता सर्वांनाच भेडसावत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून निर्माण होणार्‍या या संगणकीय कचर्‍याने जगभर भयावह रूप धारण केले आहे. आजघडीला तरी फार थोड्या देशांमध्ये या कचर्‍याचे विघटन अथवा पुनर्वापर करण्यासंबंधीची स्पष्ट धोरणे किंवा नियम आहेत. अगदी हा भंगार माल वेचणार्‍यांपासून उच्चपदस्थ धोरणकर्त्यांपर्यंत कोणालाही त्याचे पुढे काय करायचे हे माहीत असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचर्‍याने वेगळीच समस्या निर्माण केली आहे. पूर्वीदेखील विषारी किरणोत्सारी द्रव्ये, औद्योगिक रसायने आणि दूषित पदार्थ आदींमुळे (अगदी मैला पाण्यामुळेही) पर्यावरण संतुलनासंबंधीच्या विविध समस्या उद्भवत असत. त्या समस्या अद्याप आहेतच परंतु त्या प्रकारच्या कचर्‍याच्या तुलनेमध्ये गेल्या दहा वर्षांमध्येच ई-कचर्‍याचे प्रमाण भयानक स्वरुपात वाढले आहे. मुख्य म्हणजे ही कोणा एका-दुसर्‍या देशाची समस्या नसून जगभराची डोकेदुखी बनली आहे. हा कचरा फक्त जुने संगणक, मोबाईल फोन आणि त्यांचे मोडके किंवा निरुपयोगी सुटे भाग एवढ्यापुरता मर्यादित राहिला नसून त्यामध्ये फ्रीज, मिक्सर, म्युझिक सिस्टिम्स आदींसारख्या ग्राहकोपयोगी घरगुती वस्तूंचाही समावेश करावा लागत आहे.

इलेक्ट्रॉनिक कचर्‍याची विल्हेवाट लावताना ऊर्जेचा कमीत कमी वापर, प्रत्यक्ष वापरकर्त्याचे समाधान होणे आणि एखाद्या उद्योगाने त्या उत्पादनांच्या खरेदीसाठी गुंतवलेल्या रकमेचा योग्य मोबदला मिळणे आदी बाबींचा विचार व्हायला हवा; त्याचबरोबर नवीन उत्पादन खरेदी करण्यापूर्वी आणि खरेदीनंतर ते वापरताना आपण पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्याचा विचार करणेही गरजेचे आहे. वस्तूच्या उत्पादनाच्या वेळी आणि ती निरुपयोगी झाल्यानंतर फेकून देतानाही प्रदूषणाची जाणीव सतत राखली जाणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर ही फेकून दिलेली वस्तूही काही वेगळ्या रूपाने पुन्हा वापरता येईल का? याचाही विचार असायला हवा. जपान या विकसित राष्ट्राने यादृष्टीने एक अभिनव उदाहरण जगापुढे ठेवले आहे. जपान हा टाकाऊपासून टिकाऊ या मोहिमेला प्रोत्साहन देणारा देश म्हणून ओळखला जातो. अगदी सामान्य साहित्यापासून विविध कलाकृतींची निर्मिती करण्यासाठी इथले सर्जनशील लोक जगभर नावलौकिक राखून आहेत. याचीच कडी पुढे जोडत अलीकडेच त्यांनी ‘ऑलिम्पिक’मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एक अनोखे उदाहरण समोर ठेवले. अलीकडच्या ‘ऑलिम्पिक’मध्ये विशेषत्वाने प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला गेला. करोनाचे दाट सावट असताना या देशाने खेळाडूंच्या आरोग्य रक्षणाची खबरदारी घेत हे भानही नेमकेपणाने राखल्याचे जाणवले.

ऑलिम्पिकमध्ये खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की आपण सुवर्ण वा कुठले तरी पदक जिंकावे. पण ही पदके नेमकी कशी तयार केली जातात, हे अनेक जणांना माहीत नसते. ऑलिम्पिकची अतिप्राचीन परंपरा पाहता विजेत्यांना दिल्या जाणार्‍या पदकांची ही प्रथा जाणून घेणे रंजक आहे. स्पर्धांच्या सुरुवातीच्या काळाचा आढावा घेतला तर त्याकाळी विजेत्यांच्या गळ्यात ऑलिव्हच्या फुलांचा हार गळ्यात घालून विजेत्यांचा सन्मान केला जात असल्याचे संदर्भ मिळतात. त्यानंतर काळ पुढे सरकला तसतसे पदकांच्या निर्मितीमध्ये बदल केले जाऊ लागले. त्यामध्ये विविध धातूंच्या वापरातून होणारी पदकनिर्मिती, विद्युत उपकरणांच्या पुनर्निर्मितीतून होणारी पदकनिर्मिती असे टप्पे बघायला मिळतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंना दिल्या जाणार्‍या सुवर्णपदकात शंभर टक्के सोन्याचा वापर केला जातो, असादेखील अनेकजणांचा गैरसमज होता. काही अंशी तो खराही असेल. मात्र अलीकडे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदके तयार करण्यासाठी लागणारे धातू लोकांनी दान केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मिळवण्यात आले होते हे अनेक वाचकांना माहीत नसेल. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच रिसायकलिंग केलेल्या ई-कचर्‍याच्या मदतीने पदके तयार करण्यात आली. ई-कचर्‍याच्या प्रचंड निर्मितीप्रती सजगता आणि त्याच्या पुनर्वापराप्रती ठोस धोरणे म्हणून या अनोख्या उपक्रमाकडे बघता येईल.

‘टोकियो मेडल प्रकल्प 2020’च्या अंतर्गत ई-कचर्‍याचा वापर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांच्या निर्मितीसाठी करण्यात आला आणि ही बाब जगाने उचलून धरली. यासाठी जपान ऑलिम्पिक समितीद्वारे 2017 ते 2019 दरम्यान 78 हजार 900 पेक्षा अधिक टन ई-कचरा संकलित करण्यात आला. ही पदके तयार करण्यासाठी ई-कचर्‍यासमवेत 32 किलो सोने, 3500 किलो चांदी आणि 2200 किलो ब्राँझ धातूचा वापर करण्यात आला. म्हणूनच विजेत्यांना दिल्या गेलेल्या पदकांची तकाकी आणि मूल्य कमी झालेले बघायला मिळाले नाही. पदकांच्या निर्मितीसाठी लागणारे धातू मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रिसायकलिंग करण्यात आले हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. हे कामही अतिशय काटेकोरपणे आणि पर्यावरणाचा तोल ढासळणार नाही याची दखल घेत पार पडले. यासाठी जपानमधून 78 हजार 985 टन वजनाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे गोळा करण्यात आली होती. यामध्ये 62 लाख मोबाईल फोन्सचा समावेश होता, ही बाब विशेष नोंद घेण्याजोगी आहे. अशा पद्धतीने तयार केलेल्या प्रत्येक पदकाचा व्यास 8.5 सेंटीमीटर इतका होता तर त्यावर युनानमध्ये यशाची देवता असणार्‍या नाईक देवीची प्रतिमा अंकित केली होती. म्हणजेच या माध्यमातून या देशाने ऑलिम्पिकसारख्या प्राचीन खेळाचा आब राखलाच आणि आधुनिक काळात शाप बनू पाहणार्‍या समस्यांपासून मुक्त होण्याचा एक मार्गही दाखवून दिला. अशा प्रकारे काळाची गरज लक्षात घेऊन, जगजागृतीची आवश्यकता निदर्शनास आणत जागतिक पातळीवर ओळखल्या जाणार्‍या आयोजनांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. तरच त्या प्रती जनमत तयार होणे आणि या समस्यांची जागतिक स्तरावर दखल घेतली जाणे शक्य होईल.

[email protected]

(लेखक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या