नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कापड बाजार येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे (नवरात्रोत्सव) आयोजन करण्यात आले आहे. या ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज रविवार (दि.१५) रोजी सायंकाळी सुदर्शन दिग्विजय परिक्रमा रथ यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रेखीव लाकडी रथात सुदर्शन चक्र प्रतिमा स्थापन करून संध्याकाळी ६ वाजता श्री बालाजी मंदिर कापडपेठ येथून रथयात्रेला आरंभ होतो.
घंटानाद, शंखनाद, ढोलताश्यांच्या गजरात पारंपरिक वेशातील भक्तांकडून रथ ओढला जातो.. बालाजी मंदीर – बालाजी कोठ – गंगाघाट – दिल्ली दरवाजा – नेहरू चौक – सोमवार पेठ – तिवंधा – टेक – शिवाजी चौक – जुनी तांबट लेन – पार्श्वनाथ लेन – हुंडीवाला लेन – पगडबंध लेन – सराफ बाजार या पारंपरिक मार्गाने रथयात्रा पुन्हा मंदिरात येते.
रथाच्या मार्गात ठिकठिकाणी सुवासिनींद्वारा औक्षण, फटाक्याची आतिषबाजी याद्वारे रथाचे स्वागत आणि पूजन होते. ३०० हुन अधिक वर्षांपासून होत असणारी हि रथयात्रा नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे. तरी सर्व नाशिककरांनी या रथोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी ऍडव्होकेट हर्षवर्धन बालाजीवाले यांनी केले आहे.