नागपूर | Nagpur
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. या शपथविधीनंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य दिसून आले. दरम्यान यावेळी अनेक जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. केंद्राने सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करुनच मंत्रिमंडळात घेतलं नसेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केले आहे. पण यावेळी त्यांनी कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केले हे मला माहिती नाही अशी शंकाही उपस्थित केली.
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, “मी नाराज असण्याचे कारण नाही. मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष जे पद देते त्या पदासाठी मी काम करतो. फक्त इतकीच इच्छा आहे की, मंत्रिमंडळात माझे नाव आहे असे सांगण्यात आले आणि काल ते नव्हते इतकाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केले हे मला माहिती नाही. बाकी मला याबद्दल काही माहिती नाही. मंत्री म्हणून मी कॅबिनेटमध्ये मी गोरगरिंबाचे विषय मांडायचे, आता विधानसभेत मांडेन,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दुसरे असे की तिथे अनेक जण भेटतील, अनेक प्रश्न विचारतील, त्यांना उत्तर देत बसण्यापेक्षा ‘मौनं सर्वार्थ साधनम्’. मला मंत्रिमंडळात स्थान नाही याची कोणतीही कल्पना नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत नियमीत बोलणे होत होते. माझे नाव मंत्रिमंडळासाठी पाठवण्यात आल्याचेही मला सांगण्यात आले होते, मी कुठेही नाराज नाही. गेली 15 वर्ष आम्ही विरोधात होतो. जी जबाबदारी मला देण्यात आली ती निष्ठेने मी पार पाडली आणि पुढेही पाडेल, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मी नाराज कधीच राहत नाही. काल जे आपल्याकडे होते ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्याकडे नाही ते परवा येणार आहे याची मला जाणीव आहे. ज्यांच्या कुटुंबातील मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो, आपण त्यांना मंत्री करु शकतो. आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही”.
जेव्हा वेळ देतील तेव्हा देवेंद्र फडणवीसांची भेट होईल. अजून आमचे काही बोलणे झालेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आता मी कोणाशी बोलण्याचे कारण नाही. सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करत आहे. विधानसभेत विदर्भाच्या प्रशानासाठी काय मांडायचे याची पूर्वतयारी करत आहे. मी मंत्री नाही, आमदार आहे. ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांच्यासाठी लढाई सुरु राहणार आहे, असेही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्रात वर्णी लागण्याची दूरपर्यंत नाही असे ते म्हणाले आहेत.