Friday, December 6, 2024
Homeनगरऊसतोड मिळेना म्हणून शेतकरी त्रस्त, कारखानदार निवडणूक कामात व्यस्त

ऊसतोड मिळेना म्हणून शेतकरी त्रस्त, कारखानदार निवडणूक कामात व्यस्त

शहरटाकळी |वार्ताहर| Shahartakali

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी व परीसरातील दहिगावने, भावीनिमगाव, देवटाकळी, ढोरसडे आदी गावांतील ऊसपीक 16 ते 18 महिन्यांचे झाले तरीही तोड मिळत नाही.

- Advertisement -

त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ग्रामपंचायत व कारखान्यांच्या निवडणुका चालू असल्याने कारखानदार याकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीत व्यस्त आहेत. शेतकरी मात्र ऊसतोड मिळेना म्हणून त्रस्त झाला आहे.

शेतकर्‍यांच्या प्रपंचाशी आणि भावनेशी खेळत आहे. याकडे कोणी लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. उसाच्या उत्पादनात घट होत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यावर्षी जोरदार झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या हातून खरीप हंगाम गेला. उरल्यासुरल्या पिकांची परतीच्या पावसाने धूळदाण उडाली. शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था कोलमडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शिवाय लागवड केल्यापासून 15 ते 18 महिन्यांचा ऊस झाला तरीही तोड मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे.

उसाचे आयुर्मान जास्त झाल्याने अनेक ठिकाणी उसाला तुरे फुटलेले पहावयास मिळत आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे याबाबत पुढे येऊन बोलण्यास शेतकरी हिंमत करत नाहीत.

शहरटाकळी व परिसरातील गावात ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, गंगामाई, प्रवरा आदी कारखान्यांच्या टोळ्या दाखल झालेल्या आहेत. काही कारखान्यांकडून मात्र गावागावांतील ठराविक पुढार्‍यांच्या व कार्यकर्त्यांच्या तसेच त्यांच्या मर्जीतील लोकांच्याच उसाला योग्यवेळी तोड मिळाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य शेतकरी मात्र यात भरडला जात असून मेटाकुटीला आला आहे.

सामान्य शेतकरी व कार्यकर्ता ऊस तोडीसाठी सर्वच कारखान्यांकडून हुकला जात आहे. कामगारही चिरीमिरी घेऊन अर्थपूर्ण हालचाली करत असल्याची शेतकर्‍यांमध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र कोणताही शेतकरी उघडपणे बोलण्यास तयार नाही.

त्यामुळे कारखान्याची मनमानी सुरू असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. यापुढे ऊसतोड मजुरांची संख्या वाढवून सामान्य शेतकरी वर्गाला लवकरात लवकर ऊसतोड मिळेल की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या